आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडांशी संवाद साधणारा ज्ञानतपस्वी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद कुंभार - Divya Marathi
आनंद कुंभार

हयातमहंमद पठाण

बहुतांश जणांना श्रवणबेळगोळ येथील आद्य मराठी शिलालेखाची माहिती असते. मात्र, नंतर उजेडात आलेल्या त्यापेक्षा जुन्या ताम्रपटाची माहिती खूप कमी लोकांना आहे. त्या ताम्रपटालाही बाजूला सारणारा स्पष्ट काळोल्लेख असलेला शिलालेख आनंद कुंभार यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे शोधला. 

पंढरपुरात एका घरापुढे गटार ओलांडण्यासाठी एक दगड टाकलेला. त्याच्या आयताकृती रेखीव आकाराने आनंद कुंभार यांना खुणावले. त्यांनी तेथल्या लोकांना विनंती करून तो उलटा करण्यासाठी सांगितले. तो उलटा केल्यानंतर लक्षात आले की खाली असलेला भाग प्रत्यक्षात सुलटा होता. त्यावर मध्ययुगीन कन्नड लिपीतील लेख कोरलेला होता. असे अनेक गमतीशीर अनुभव, किस्से आनंद कुंभार यांच्याकडून ऐकलेत. ऐतिहासिक शिलालेखांचे अभ्यासक म्हणून आनंद कुंभार हे महाराष्ट्रात मोठे नाव. पदवीचेही शिक्षण नसलेल्या कुंभारांनी इतिहासात पीएचडी करणाऱ्या अनेक संशोधकांना मार्गदर्शन केले. २८ नोव्हेंबर रोजी कुंभार वयाच्या ७८ वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. दगडांशी संवाद साधत इतिहासाचा शोध घेणारा हा ज्ञानतपस्वी आता स्वतःच इतिहासाचा भाग बनला आहे.


सडपातळ शरीरयष्टी, पण काटक. हा बुजुर्ग सावकाश सायकलवर रस्त्याच्या कडेने निघालेला. आपल्या ठरल्या मार्गाने, ठरल्या गतीने आणि काही ठरावीक वेळी हा माणूस दिसायचा. सोलापुरातील प्रसिद्ध पार्क चौक ते अशोक चौक परिसरातील राहते घर असा मार्गक्रम असायचा. या चौकातील तसेच पुढल्या सरस्वती चौकातील रद्दीचे दुकान, हिराचंद नेमचंद वाचनालय ही डेस्टिनेशन असायचीत. अनेक वर्षांचा हा क्रम. पुढे त्यांना प्रा. श्रीराम पुजारी यांच्या काळात वाचनालयाच्या कार्यकारिणीत स्थान मिळाले. ते शेवटपर्यंत कायम होते.

साधारण सत्तरच्या दशकात कुंभार यांना इतिहासाची गोडी निर्माण झाली. इतिहास संशोधक महामहोपाध्याय वा. वि. मिराशी, ग. ह. खरे, शं. गो. तुळपुळे आदींचे लेखन वाचून कुंभार प्रभावित झाले. या मंडळींना इतिहासाची साधने, शिलालेख, ताम्रपट आदी सापडतात आणि त्यातून शतकांची नवी माहिती पुढे येते, हे कुंभार यांना रोमॅन्टिक वाटले. अशी साधने आपल्याला सापडतील काय, असा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला. तेथूनच त्यांचा इतिहासाशी रोमान्स सुरू झाला. ते इतिहास संशोधनाची पुस्तके वाचू लागले. अधिकाधिक माहिती गोळा करू लागले. दुर्मिळ, वेगळ्या वस्तू-वास्तू, शिल्पांकडे लक्ष जाऊ लागले. या काळात ते लष्करातून निवृत्त होऊन सोलापूरला परतले होते. वीज मंडळाच्या पदरी कारकून म्हणून सेवा सुरू केली होती. ग्रामीण भागात नियुक्ती होती. मीटरच्या नोंदी घेणे, वीज बिले वाटणे आदी कामे करण्यासाठी गावोगावी फिरायचे. हे करत असताना त्यांची वेधक नजर ऐतिहासिक अवशेषांचा शोध घेत होती. त्यांना काही गावांत धडकी- पडकी मंदिरे, परिसरात शिलालेख सापडले. सोलापुरातील शिलालेख आधीच प्रसिद्ध झाले आहेत वा नाहीत, याची त्यांना माहिती नव्हती. ते मिराशी, खरे यांना भेटले. त्यांना अभ्यासण्यासाठी मिराशी यांनी काही पुस्तके सुचवली. तर खरे यांनी शिलालेखाचे ठसे घेण्याची विद्या शिकवली. इतिहासाच्या या गोडीचे रूपांतर कधी ध्येयवेडात झाले हेही कुंभार यांच्या लक्षात आले नसावे.

एव्हाना कुंभारांना कळून चुकले होते की सोलापूरची माती इतिहास संशोधनासाठी अद्याप नांगरली गेलेली नाही. आपल्यासाठी रान मोकळे आहे. साधारण १९६८ला सुरू झालेले त्यांचे संशोधनाचे कार्य हे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे ५० वर्षे शांतपणे चालू होते. या काळात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि पंढरपूर या चार तालुक्यात सर्व गावे पिंजून काढली. या चारही तालुक्यांतील प्रत्येक गावात एकदा नव्हे तर, कित्येक वेळा जाऊन आले. जिल्ह्यातील उरलेल्या तालुक्यांतील गावांत इतर संशोधकांनी, विद्यार्थ्यांनी शोध घ्यावा, असे त्यांना मनापासून वाटत होते. तसे ते वेळोवेळी सांगायचेही. त्यांची चिकाटी जबरदस्त होती. सोलापुरातील मधला मारुती (मदला, कानडी अर्थ पहिला) मंदिरातील मूर्तीच्या पाठमोऱ्या भागावर लेख असल्याचे त्यांना सुरुवातीला कळले. त्याचा ठसा घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण, ते शक्य झाले नाही. चिकाटी सोडली नव्हती. त्यांच्या कार्याची चांगली ओळख झाल्यानंतर अलीकडे त्यांना बोलावून ठसा घेण्यासाठी सांगण्यात आले. त्या वेळी त्यांचा हर्ष गगनात मावला नव्हता. मूर्ती आणि भिंत यांच्यावर हात फिरू शकेल इतकेच काही इंचांचे अंतर आहे. ठसा घेणे अवघड असतानाही त्यांनी हार मानली नाही. हरतऱ्हेने कोशीश करत त्यांनी ठसा घेतलाच. मध्ययुगीन कन्नड लिपी व भाषेविषयी कुंभार यांनी धारवाड विद्यापीठातील संशोधक डॉ. श्रीनिवास रित्ती यांची मदत घेतली. कुंभार यांनी आणलेले ठसे वाचून ते त्याचा अर्थ सांगायचे. बऱ्यापैकी संख्या झाल्यानंतर रित्ती यांनी इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट हे पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी मदत केली. मराठी संशोधन तरंग नावाने हे पुस्तक आले. या पुस्तकांची दखल जर्मन संशोधक गुंथर सोन्थाइमर, जपानी इतिहास संशोधक हिरोशी फुकाजावा यांच्यासह रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या अनेक दिग्गज संशोधकांनी घेतली. ढेरे यांनी त्यांचे एक पुस्तक कुंभार यांना अर्पण केले आहे. प्राचीन मराठी शिलालेखासाठी कुंभारांचे नाव चर्चेत आले. (या शिलालेखाच्या सालाविषयी काहींना शंका आहे) अतिशय प्रसिद्धिपराङ‌्मुख अशी ओळख कुंभारांची. अतिशय काटेकोरपणे प्रत्येक शब्द तोलूनमापून ते लिहीत असत. लिहिलेल्या शब्दांतून गुंजभरही अर्थ जास्त किंवा कमी होणार नाही, अशी सराफी वृत्ती बाळगणारे ते संशोधक होते. साधनांमधून जे पुढे येईल ते चोहीबाजूंनी पारखून शांतपणे मांडायचे. खरे, मिराशी यांच्यासह सोलापुरातील इतिहासाचे प्राध्यापक गजानन भिडे यांच्यासोबत झालेले लेखवाद गाजले. लाखभर पगार घेऊनही मागच्या वर्षांच्या नोट्स पुढच्या विद्यार्थ्यांना वाढण्याची ‘ऐतिहासिक’ कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांच्या निराशाजनक काळात कुंभार हे आशादायी दीपस्तंभासारखे होते.   

लेखकाचा संपर्क  - 9922419053
हयातमहंमद पठाण
hayat.hp@gmail.com

बातम्या आणखी आहेत...