आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीच्या वादातून पुतण्याने वकिल चुलत्यासह दोघांची हत्या; कुऱ्हाडीने केले वार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत अ‍ॅड. संभाजी ताके - Divya Marathi
मृत अ‍ॅड. संभाजी ताके

अहमदनगर - भाऊबंदकीतील शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्यासह आणखी एकाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. बुधवारी दुपारी ही घटना जेऊरहैबती शिवारात तेलकुडगाव रस्त्यावरील ताकेवस्तीजवळ घडली. अॅड. संभाजी राजाराम ताके (५७, जेऊरहैबती, ता. नेवासे, हल्ली भिंगार) व संतोष सुंदरराव घुणे (३६, बहिरवाडी) अशी मृतांची नावे असून यात अशोक शिंदे (भगवानबाबा चौक, अहमदनगर) व रवींद्र गोसावी (नवनागापूर) जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी  शरद शिवाजी ताके (३६, जेऊरहैबती) याला ताब्यात घेतले आहे.
अॅड. ताके व त्यांचा थोरला भाऊ शिवाजी यांच्यात शेतजमिनीचा वाद असून तीन वर्षांपासून तो नेवासे न्यायालयात सुरू आहे. अॅड. ताके नगरला वकिली करत. बुधवारी दुपारी अॅड. ताके तीन सहकाऱ्यांसह जेऊरला शेतावर आले होते. त्यांचा भाऊ शिवाजीशी वाद झाला. नंतर अॅड. ताके परत निघाले. वस्तीजवळ जेऊर-तेलकुडगाव रस्त्यावर शरद व अॅड. ताके यांच्यात भांडण झाले. शरदने अॅड. ताके व त्यांचे सहकारी घुणे यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. मृतदेह नेवासेफाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
 

आरोपी स्वत: हजर
आरोपी शरद कुऱ्हाड हातात घेऊनच कुकाणे पोलिस दूरक्षेत्रात हजर झाला. हवालदार फलके यांना शरद घटनेविषयी सांगत असतानाच तो दूरक्षेत्राच्या पडवीतच कोसळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.