आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेहाला परमेश्वर अन‌् स्मशानाला मंदिर मानणारा अवलिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सात्रळ- स्मशान, मृतदेह, अंत्यविधी हे शब्द उच्चारले, तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. सुखाच्या कार्यक्रमात मदतीला धावणारे अनेक जण असतात; पण अंत्यविधीसारख्या दु:खाच्या कार्यात निर्विकार भावाने हाताची घडी घालून उभे राहाणाऱ्यांची संख्या जास्त असते. समाजातील हा विरोधाभास त्यांना बोचला. म्हणून त्यांनी मृतदेहात परमेश्वर पाहिला आणि स्मशानाला मंदिर मानून आजपर्यंत शेकडो अंत्यविधी पार पाडले. दु:खात जग जेव्हा शब्दरुपी सांत्वनात गुंतते त्यावेळी कृतिशील सांत्वन करणारा अवलिया म्हणजे राहुुरी तालुक्यातील सात्रळ गावातील बबनराव विठोबा वारुळे. 


बबनराव संवेदनशील मनाचे गृहस्थ. त्यांच्यात ही संवेदनशीलता आली, ती आई- वडिलांच्या संस्कारामुळे. घरची गरिबी असली, तरी बबनरावांच्या आई-वडिलांनी संस्काराची श्रीमंती जाणीवपूर्वक जपली. म्हणून संवेदनशील मनाचे बबनराव घडले. परिस्थिती नसतानाही संघर्षाच्या जोरावर जुन्या अकरावीपर्यंत शिकले. शिक्षणामुळे समाजाचे भीषण वास्तव आणखी कळू लागले, तसे बबनराव अस्वस्थ होऊ लागले. आभाळ इतकं फाटलं, की आपण शिवण्यासाठी पुरे पडणार कुठे? या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळत नसे, म्हणून बबनराव आणखी अस्वस्थ होत असत. अशा परिस्थितीत सन १९७८ ला ते एका अंत्यविधीला गेले. अंत्यविधीसाठी नातलग, आप्तेष्ठांची गर्दी जमली; परंतु अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी कुणीही पुढाकार घेईना, हे लक्षात येताच बबनरावांनी दु:ख बाजूला ठेवत तो अंत्यविधी पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारामुळे उशिरा का होईना, अंत्यविधी पार पडला. कुटुंबीय, आप्तेष्ठांसाठी तो अंत्यविधी संपला असला, तरी तो समाजाच्या सेवेसाठी वाट शोधणाऱ्या बबनरावांसाठी नवी सुरुवात करणारा ठरला. सुखात तर सगळेच मदत करतात; पण दु:खात मदतीसाठी कुणीही लवकर पुढे येत नाही. आपण दु:खितांचे अश्रू मदतीतून पुसायचे, असे घरी आल्यावर बबनरावांनी ठरवले आणि सुरू झाली, बबनरावांची मृत कुटुंबीयांच्या दु:खावर फुंकर मारणारी कृतिशील समाजसेवा. सोनगाव, सात्रळ, पाथरे, धानोरे पंचक्रोशीत कोणाच्याही घरी दु:खद घटना घडो, बबनराव तात्काळ हजर होतात. अंत्यविधीचे सर्व सामान गोळा करतात. मृताच्या कुटुंबीयांना दु:ख आवरायला लावून विधीची माहिती देतात. अंत्ययात्रा, अंत्यविधी ते रक्षाविसर्जनापर्यंत सर्व सोपस्कार स्वत: उभे राहून पार पाडतात. मृत व्यक्तीसाठी नातेवाईक पडे आणतात. ते बहुतांश लोक अंत्यविधीप्रसंगी जाळून टाकतात. असे आणलेले कपडे बबनराव जाळू न देता गोर गरिबांना देऊन टाकतात. ज्या कुटुंबीयांच्या घरी दु:खद घटना घडली असेल, त्या कालावधीत बाजारचा दिवस आला, तर लहान मुलांसाठी पदरमोड करून बबनराव खाऊही घेऊन जातात. अंत्यविधीसाठी मदत करताना त्यांना भीती वाटत नाही. मृतदेह परमेश्वर आहे, असा आपल्या शास्त्रात उल्लेख आहे. म्हणूनच आपण पार्थिवाचे दर्शन घेतो. मग त्याला घाबरायचे कशासाठी? असा बबनरावांचा सवाल. राहिला प्रश्न स्मशानाचा. स्मशानाविषयी त्यांचे विचार अत्यंत सुंदर. सर्वांचे सारखे स्वागत करते, ते स्मशान. प्रेत परमेश्वर असेल, तर त्याचे आनंदाने स्वागत करणाऱ्या स्मशानाला मंदिर का मानू नये, स्वर्ग, नरकाविषयी त्यांचे विचार तितकेच स्पष्ट. एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीसमयी गेलेल्या व्यक्तीविषयी लोक चांगले बोलत असतील, तर तोच खरा स्वर्ग, आणि गेलेल्या व्यक्तीविषयी लोक वाईट बोलत असतील, तोच खरा नरक, असे बबनरावांना वाटते. त्यांनी गेली ४६ वर्षे शेकडो अंत्यविधी पार पाडण्यास मदत केली. 


चरितार्थासाठी आयुष्याच्या सेवानिवृत्तीकडे झुकलेले बबनराव पाथऱ्याच्या सेवा सोसायटीत कारकून म्हणून काम करतात. ते कधीच रजा घेत नाहीत. त्यामुळे एखाद्या दिवशी ते आले नाहीत, तर सोसायटीतील त्यांचे सहकारी समजून घेतात, की आज बबनराव कोणाच्या तरी अंत्यविधीसाठी गेले आहेत. इतका त्यांच्या नि:स्वार्थ समाजसेवेवर सोसायटीतील कर्मचारी व घरच्यांचाही विश्वास. स्वत:प्रमाणे दोन्ही मुलांनाही त्यांनी पैशांपेक्षा ज्ञान व संस्काराच्या श्रीमंतीने घडवले. म्हणून मी व माझे कुटुंबीय आहे, परिस्थितीत समाधानी आहोत. बबनरावांनी आयुष्यभर गितेची शिकवण आचरणात आणत ही अनोखी समाजसेवा केली. याची दखल सात्रळच्या 'निर्भय बनो मंच'ने त्यांना तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन गौरवले. जय हिंद युवा मंचच्या तरुणांनी पी. बी. कडू पाटलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक कामाला बळ देण्यासाठी उत्स्फूर्तपणे दुचाकी भेट दिली. आज छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तरुण दु:खी होतात. अशा तरुणाईला बबनरावांचा संदेश आहे की, आपलं दु:ख धरून बसणारा मरेपर्यंत स्वत:साठी जगतो. इतरांचं दु:ख कमी करण्यासाठी झटणारा खऱ्या अर्थाने समाजासाठी जगतो. तुम्हाला कुणासाठी जगायचं, हे आधी ठरवा. 


...म्हणून घातली नाही चप्पल 
एकदा बबनराव राहुरीवरून घरी येत असताना गुहा येथील गंगाधरबाबा छात्रालयातील अनाथ मुले अनवाणी पायांनी रस्त्याने चालली होती. ते पाहून बबनरावांचे डोळे भरून आले. घरी आल्यावर त्यांनी तुटपुंज्या पगारातून साठवलेल्या पैशांतून त्या अनाथ मुलांसाठी ७० चपलांचे जोड विकत घेतले, आणि आश्रमात पोहोच केले. त्या दिवसापासून बबनरावांनी चप्पल घालायचे सोडून दिले. मी फक्त ७० मुलांना चप्पल देऊ शकलो, देशात लाखो अनाथ मुलं असेच अनवाणी फिरत असतील. मग मला चप्पल घालायचा काय अधिकार आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत बबनरावांनी कधीही चप्पल घातली नाही. 

बातम्या आणखी आहेत...