आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेशल मीडियावर टाकला आत्महत्येचा संदेश, तीस मिनिटांत पोलिस घटनास्थळी; मग घडले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील हडपसर भागातील एकाने समाजमाध्यमात आत्महत्या करत असल्याची माहिती प्रसारीत केली. राज्य सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने या संदेशाची माहिती पोलिसांना दिली. अवघ्या तीस मिनिटांत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्या व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त केले. प्रकाश गोरे (३०) असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळ उस्मानाबादचा रहिवासी आहे. पुण्यात कॅबचालक म्हणून तो काम करत आहे.


मुंबईतील सायबर विभागाच्या पथकाला पुण्यातील एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याची माहिती समाजमाध्यमातून मिळाली. सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला दिली. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे आणि पथकाने तातडीने समाजमाध्यमातून त्या व्यक्तीविषयची माहिती संकलित केली. तांत्रिक तपासात आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेली व्यक्ती हडपसर भागातील असल्याचे समजले. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांना याबाबतची माहिती कळवण्यात आल्यानंतर पथकाने त्या व्यक्तीचे घर शोधून काढले. सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी ही घटनास्थळी धाव घेत इसमाचा शोध सुरू केला.पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले आणि आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रकाश गोरे या व्यक्तीला रोखले.