आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Sanskrit Translation Of The Constitution, Which Was The Birthplace Of The Marathi Encyclopedia

मराठी विश्वकोशाची जन्मभूमी असलेल्या वाईत झाले संविधानाचे संस्कृत भाषांतर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाई (जि. सातारा) : भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाईमध्ये केले असून त्यांच्या या कार्यामुळे ज्ञाननिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाईचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले होते, अशी माहिती मराठी विश्वकोशाचे सहायक संपादक रवींद्र डराज व सरोजकुमार मिठारी यांनी दिली.

प्रागतिक इतिहास संस्था व किसन वीर महाविद्यालय यांच्या वतीने मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्यविश्वावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र दि. २७ जानेवारीपासून वाई येथे होणार आहे. तर्कतीर्थांचे यंदाचे रौप्यस्मृती वर्ष असून २७ जानेवारी हा जन्मदिन आहे. याचे औचित्य साधून किसन वीर महाविद्यालयात हे राष्ट्रीय चर्चासत्र होत आहे. यानिमित्ताने तर्कतीर्थांनी निर्माण केलेल्या विविध साहित्यांचे संकलन केले जात असताना घोडराज व मिठारी यांना भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर वाईमध्येच झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याशी संपर्क साधून कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या साहाय्याने संसदेतून संविधानाची संस्कृत प्रत मिळविली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे येथे प्राज्ञपाठशाळा मंडळाने छापलेली ही मूळ प्रत उपलब्ध असून भारतीय संसदेच्या ग्रंथालयात दुरुस्त्यांसह तयार केलेली १९८४ ची आवृत्ती उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटनेचे संस्कृत भाषांतर करण्याचा प्रश्न जेव्हा पुढे आला, तेव्हा ती जबाबदारी तर्कतीर्थांवर सोपवण्यात आली होती. घटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार त्यावेळी १४ भाषांना राजभाषा म्हणून मान्यता देण्यात आली होती. १४ मान्य राजभाषांपैकी घटनेचे संस्कृत भाषांतर करणे अनिवार्य होते. त्यानुसार संस्कृत भाषांतर करण्यात आले.

समितीची झाली नियुक्ती

संविधान समितीने घटनेच्या मसुद्यांचे राजभाषांमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तत्कालीन लोकसभा सभापतींनी संस्कृत भाषांतरासाठी समिती नियुक्ती केली. त्या समितीचे अध्यक्ष महामहोपाध्याय पां. वा. काणे होते. प्रमुख भाषांतरकार व समितीनिमंत्रक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची, तर सहभाषांतरकार म्हणून डॉ. मंगलदेवशास्त्री (बनारस) यांची नियुक्ती करण्यात आली. समितीतील अन्य सदस्यांमध्ये डॉ. सुनीतिकुमार चटर्जी (कोलकाता), के. बालसुब्रह्मण्यम अय्यर (मद्रास), महामहोपाध्याय गिरिधरशर्मा चतुर्वेदी (बनारस), डॉ. बाबूराम सक्सेना (अलाहाबाद), पंडित राहुल सांकृत्यायन (मसुरी), डॉ. रघुवीर (नागपूर), मुनी जीनविजयजी (मुंबई ) व डॉ. कुन्हनराजा (मद्रास) या मान्यवर विद्वानांचा समावेश होता.

अवघ्या तीन महिन्यांत भाषांतर पूर्ण

तर्कतीर्थांनी घटनेच्या कलम १ ते २६३ चे आणि संविधान दुरुस्ती कलमांचे भाषांतर केले, तर डॉ. मंगलदेवशास्त्री यांनी कलम २६४ ते ३९५चे भाषांतर केले. अवघ्या तीन महिन्यांत वाईच्या प्राज्ञपाठशाळेत हे भाषांतर पूर्ण करण्यात आले. ततपासणी समितीने २१ दिवस बसून भाषांतराचे कलमवार वाचन करून दुरुस्तीसह अंतिम मसुदा लोकसभा सभापतींना सादर करण्यात आला. लोकसभेने तो मंजूर केल्यानंतर अधिकृत संस्कृत घटना अस्तित्वात आली. संस्कृत घटनेच्या भाषांतराची पहिली आवृत्ती प्राज्ञपाठशाळा मुद्रणालय, वाई येथे १९५२ ला मुद्रित करण्यात आली. हे मुद्रण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या देखरेखीखाली तयार झाले. त्याचे मुद्रितशोधन स्वत: तर्कतीर्थांनी केले. त्यानंतर वेगवेगळ्या घटना दुरुस्तींचे संस्कृत भाषांतर करत, संस्कृत घटना अद्ययावत करून प्रकाशित करण्याचा प्रघात लोकसभा सचिवालयाने ठेवला आहे. लोकसभा ग्रंथालयात भारतीय संविधानाची संस्कृत प्रत उपलब्ध आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे, तर्कतीर्थांच्या साहित्याचे अभ्यासक.
 

बातम्या आणखी आहेत...