आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उच्च शिक्षण प्रणालीवरचं उपहासात्मक भाष्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुरा गुरव  

आर. राज राव हे एक लेखक, कवी, इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक आणि समलिंगी हक्कांवर भाष्य करणारे कार्यकर्ते आहेत. देशातील पहिल्या समलिंगी कादंबरीचे [बॉयफ्रेंड २००३] लेखक ही त्यांची आणखी महत्त्वाची ओळख.  पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागात LGBT साठी लिहिलेल्या साहित्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू केला. ‘मॅडम गिव्ह मी माय सेक्स’ ही राव यांची उच्च शिक्षण प्रणालीवर भाष्य करणारी कादंबरी आहे.
 
मॅडम, गिव्ह मी माय सेक्स’ ही उच्च शिक्षण प्रणालीवर उपहासात्मक भाष्य करणारी कादंबरी २०१९ मध्ये ब्लूम्सबरी प्राइमतर्फे प्रकाशित झाली. या कादंबरीत घडणारी गोष्ट ही पुण्यातल्या Oxford of the East या विद्यापीठात घडते.  या विद्यापीठातले इंग्रजी विभागप्रमुख डॉ. तिवारी ह्यांना त्यांचा विभाग देशातल्या सर्वोत्तम इंग्रजी विभागांत गणला जावा अशी तीव्र इच्छा असते. परंतु प्रशासकीय राजकारणामुळे ते शक्य होत नाही. आरक्षण धोरणांमुळे इंग्रजी विभागासाठी अधिक योग्य उमेदवार निवडता येत नसल्यामुळे इंग्रजी विभाग मागे पडतोय, असं डॉ. तिवारींना वाटत असतं. विभागाची गणना सर्वाेत्तम विभागात व्हावी यासाठी ते खूप प्रयत्न करतात. मात्र त्यांना बऱ्याच अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. 

कादंबरीत केवळ संस्थेच्या अंतर्गत राजकारणावरच भाष्य केलंय असं नाही तर कथानकाच्या माध्यमातून गे समुदाय, समाजात अशा समुदायातल्या लोकांची होणारी कुचंबणा, त्यांच्या वाट्याला येणारी उपेक्षा यावरही भाष्य केलं गेलं आहे. कादंबरीत आरक्षणाच्या राजकारणाविषयी विश्लेषण केले आहे, पण कथानक तेवढ्यापुरतंच मर्यादित नाही. राज राव यांनी अशा बऱ्याच गोष्टी थोडक्यात पण स्पष्टपणे मांडल्या आहेत.

विद्यार्थी संघटना, विद्यापीठाच्या जागेत त्यांची भूमिका, त्यांची स्पेस, अंतर्गत राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा केला जाणारा वापर याबद्दलही राव बोलतात. विद्यापीठाच्या स्पेसमध्ये भाषेवरून होणारे राजकारण, काही व्यक्तींना भेदभावाला सामोरे जावं लागणं, त्याचं चित्र लेखक समोर उभं करतात. महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळावरही ते भाष्य करतात. असे सगळे गंभीर विषयदेखील राज राव रंजनात्मक पद्धतीने मांडतात. ही कादंबरी गंभीरपणे विचार करायला भाग पाडते तर कधी मनमोकळं हसायला लावते पण अशा काही घटनांचं वर्णन करून ते  हसवता हसवता हळूच चिमटा काढून जातात. अशा प्रकारे या कादंबरीत राज राव यांनी मुद्दाम एक विशिष्ट भाषिक शैली वापरली आहे.

एक प्राध्यापक म्हणून राज राव यांचा अनुभव अफाट आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेतला फोलपणा बाहेर आणण्यासाठी त्यांनी कादंबरीचा हा विषय निवडला. राव यांचं साहित्य अगदी खुलं आणि मूलगामी स्वरूपाचं आहे. राज राव यांची उपहासात्मक शैली ही या कादंबरीची विशेष बाजू आहे. उच्च शिक्षण संस्थांमधील वास्तवाचे कुरूप चित्र ते आपल्याला दाखवतात. त्याचबरोबर, लैंगिकतेमुळे मिळणाऱ्या भिन्न वागणुकीबद्दलही ते लिहितात.  

लेखिकेचा संपर्क : ९७६९७३८३१३
 

बातम्या आणखी आहेत...