आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नातेसंबंधांचा डोळस वेध घेणारे लघुपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संदेश कुडतरकर

युट्युबच्या माध्यमातून अनेक होतकरू दिग्दर्शकांना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. केवळ लघुपटांना वाहिलेली कित्येक युट्युब चॅनेल्स सध्या कार्यरत आहेत आणि वेगवेगळे विषय प्रगल्भतेने हाताळतही आहेत. "हमारा मूव्ही' हे अशा दर्जेदार चॅनेल्सपैकीच एक. 

ट्युबच्या माध्यमातून अनेक होतकरू दिग्दर्शकांना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. केवळ लघुपटांना वाहिलेली कित्येक युट्युब चॅनेल्स सध्या कार्यरत आहेत आणि वेगवेगळे विषय प्रगल्भतेने हाताळतही आहेत. "हमारा मूव्ही' हे अशा दर्जेदार चॅनेल्सपैकीच एक. या चॅनेलवरचे हीना डिसूझा यांनी काही स्वतः, काही इतरांसह दिग्दर्शित केलेले चार लघुपट अलीकडेच पाहण्यात आले. "विघ्न भरता', "फेडेड', "प्रेशर कुकर' आणि "सर्वगुणसंपन्न' हे ते चार लघुपट.
परदेशी कंपन्यांनी भारतात आपल्या फूड चेन्स सुरु केल्यापासून पिझ्झा, पास्ता अशा पदार्थांबरोबरच आणखी एक गोष्ट उदयास आली. इथलंच जेवण वेगळ्या, उच्चारायला कठीण अशा नावांनी खपवण्यास सुरुवात झाली. "विघ्न भरता' या लघुपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला सोना आणि पलाशचा एकत्र फोटो असलेली एक फ्रेम दिसते. त्यात नेमकं पलाशच्या तोंडाच्या ठिकाणी हळदीकुंकवाचा टिळा लागलेला दिसतोय आणि तो सुकून शेणासारखा झालेला आहे. सोनाच्या प्रेमात पडल्यामुळे त्याला रोज शेण खावं लागतंय, हे केवळ या काही सेकंदांच्या दृश्यातून आपल्याला कळतं. रिंकू आणि अवी या दोघांना भेटायला त्यांच्या घरी येतात. पलाश सोनाने बनवलेल्या वांग्याच्या चकत्या अवीला खाऊ घालतो. अवी त्या खाण्यायोग्य नाहीत हे ओळखतो आणि आपल्या मित्राचे हाल पाहून त्याचं सांत्वन करतो. सोनाही रिंकूला पलाशला कसं आपल्या जेवण बनवण्याचं कौतुक नाही, हे सांगत असतानाच त्याच्या देशी आवडीनिवडींवर यथेच्छ तोंडसुख घेते आणि आपण कसे मॉडर्न आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करते. या दोघांच्या तक्रारींना कंटाळून रिंकू आणि अवी निघून गेल्यावर मात्र पलाश आणि सोना जणू आपलं भांडण झालंच नव्हतं, अशा थाटात एकत्र येत उलट अवी आणि रिंकूपेक्षा आपलं नातं कसं घट्ट आहे, हे एकमेकांना समजावतात. या विनोदी लघुपटातून वाईट जेवण बनवणाऱ्या प्रेयसीची गोष्ट सांगताना एका अतिशय वेगळ्याच विषयावर भाष्य केलं आहे. ज्या विषयावर जोडप्यांनी एकमेकांशी संवाद साधून मार्ग काढावा, त्या विषयांवर लोक इतरांशी चर्चा करत बसतात आणि इतर लोकांच्या नातेसंबंधांविषयी एकमेकांशी. आनंदी नात्याची रेसिपी कशामुळे बिघडतेय, हे अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने हा लघुपट सांगून जातो. हीना डिसूझा आणि सुशांता भट्टाचारजी यांनी दिग्दर्शित केलेला हा लघुपट एकमेकांशी गुडीगुडी बोलत 
आपलं इन्स्टंट नातं जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक जोडप्यांचं प्रातिनिधिक चित्र आहे.
सिड आणि मेघा हे एकमेकांवर प्रेम करणारं जोडपं. मेलिसा राजू थॉमस यांनी लिहिलेल्या आणि हीना डिसूझा यांनी दिग्दर्शित केलेल्या "फेडेड' या लघुपटात या दोघांच्या प्रेमाचा प्रवास दिसतो. जिगसॉ पझलच्या तुकड्यांसारखे या दोघांच्या आयुष्यातले तुकडे आपल्याला दिसत राहतात आणि त्यांच्यातलं फिकं पडत जाणारं प्रेम दिसतं. सुरुवातीच्या दिवसांतली हुरहूर दिसते. एकमेकांवर किती प्रेम आहे, ते खरंच आहे का, हे खोडसाळपणे आजमावून पाहणं दिसतं. हळूहळू त्यात डोकावणारा संशय दिसतो आणि तरीही ते नातं टिकवण्याची तळमळही दिसते. हा लघुपट पाहताना "चलते चलते' चित्रपटाच्या शीर्षक गीतातील ओळींची हटकून आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 

"प्यार हमको भी है, प्यार तुमको भी है, 
तो ये क्या सिलसिले हो गए... 
बेवफा हम नहीं, बेवफा तुम नहीं, 
तो क्यूँ इतने गिले हो गए..."

प्रेमकथांमध्ये दिसणारं प्रेम किती ओव्हररेटेड असतं आणि खऱ्या आयुष्यात मात्र कशा सुखद शेवटाच्या संकल्पना धूसर होत पुसट होणाऱ्या संवादात मिसळून जातात, हे हा लघुपट खूप सुंदर रीतीने दाखवतो.

स्वातीचा संसार वरकरणी चारचौघांसारखाच सुखाने चालला आहे. मात्र रुटीनमध्ये अडकलेल्या नवऱ्याकडे तिला द्यायला म्हणावा तसा वेळ नाही. त्यात घरातला प्रेशर कुकर बिघडलाय. ती त्याच्याकडे नवीन प्रेशर कुकर घेण्यासाठी पैसे मागतेय. तो जुन्या कुकरमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे विचारतो, तेव्हा ती म्हणते, "काम कम और शोर ज्यादा करता है." थोडक्यात "तू जसा सतत तक्रारी करत असतोस अलीकडे आणि प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठीही तुझ्याकडे वेळ नाही, तसंच' असंच ती सूचकपणे सांगतेय. गृहिणी असल्यामुळे स्वातीचा दिवस घरातली कामं आटपतानाच रेडिओवरच्या रोमँटिक कथा आणि गाणी ऐकण्यात निघून जातो. पण अवचित उगवणारी मैत्रीण स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल सांगते आणि स्वातीच्या चित्तवृत्तीही बहरतात. नवीन प्रेशर कुकर घेण्यासाठी ती जवळच्या दुकानात जाते आणि तिथल्या देखण्या तरुण सेल्समनकडे आकर्षित होते. पुढे काय होतं? "प्रेशर कुकर' या सुंदर लघुपटाने नवीन नात्यांमधल्या गुंत्यापेक्षा मुरलेल्या नात्यात प्रेमाचा अर्थ शोधण्याचे प्रयत्नच कसे विवाहसंस्था टिकवून ठेवत असतात, हे बिघडलेल्या प्रेशर कुकरच्या कथेतून सहजसोप्या भाषेत सांगितलं आहे. पावनी वाधवान यांची कथा, पावनी आणि हीना यांची पटकथा आणि हीना डिसूझा यांचं दिग्दर्शन आपल्याला रेडिओच्या एका गाजलेल्या काळात सहजपणे घेऊन जातं. जोडीला येणारी सुमधुर गाणी मूड अधिकच रोमँटिक करतात. या लघुपटाचं पोस्टरही जुन्या काळच्या वृत्तपत्रांतल्या जाहिरातींची आठवण करून देणारं आहे.कल्याणी एकटीच जगतेय. पण आनंदात जगतेय. ती एका लग्नसमारंभातल्या मेंदीच्या कार्यक्रमात सगळ्यांशी गोड बोलतेय. कुणाला काय हवं नको, ते सगळं बघतेय. सगळ्या वयोगटातल्या सगळ्या बायका, मुली तिला आपलं गाऱ्हाणं सांगतायत आणि ती ते शांतपणे ऐकून घेत त्यावर उपायही सांगतेय. पण तरीही त्या बायकांच्या चर्चेचा विषय तीच आहे. तिचं लग्न का झालेलं नाही, यावर स्वतःचे निष्कर्ष काढून त्या मोकळ्या झाल्या आहेत. तिला स्वतःला मात्र या सहानुभूतीचं काहीही वाटत नाही. उलट सगळ्यांशी गोड बोलून, सर्वगुणसंपन्न अशी स्वतःची इमेज तयार करत ती इतरांपेक्षा कितीतरी अधिक पटींनी आरामाचं आयुष्य जगतेय. हीना डिसूझा लिखित आणि दिग्दर्शित "सर्वगुणसंपन्न' या लघुपटाला यावर्षीच्या फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट लघुपटाच्या पुरस्काराचं नामांकन मिळालं आहे. लोकांची नस जाणून त्यांच्या विश्वासाचं भांडवल करत जगणाऱ्या आजच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर भाष्य करणारा हा लघुपट एकटं जगणाऱ्या माणसांबद्दल लोकांचे काय ग्रह असतात, यावर प्रकाश टाकतो आणि पर्यायाने लग्नसंस्थेच्याच योग्यायोग्यतेवर प्रश्नचिन्ह उभं करतो. लघुपटाचं शीर्षक "सर्वगुणसंपन्न' हे त्यातल्या कथेला साजेसंच चकवणारं आहे. 

या चार लघुपटांमधला समान धागा म्हणजे प्रेम, एकटेपणा, लग्न या सगळ्या मानवी नातेसंबंधांशी संबंधित गोष्टींमधला अर्थ शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न. "फेडेड'मध्ये सिड आणि मेघाची गंभीर प्रेमकथा आपल्याला दिसते आणि "विघ्न भरता'मध्ये आपल्या उथळ नात्याचा उदोउदो करणारे पलाश आणि सोना दिसतात. स्वातीच्या मुरलेल्या संसाराची "आहे मनोहर तरी गमते उदास' अशा वळणाची कथा "प्रेशर कुकर' या लघुपटात दिसते, तर एकटं जगणाऱ्या कल्याणीचं आयुष्य इतरांपेक्षा खरं तर कसं सुखाचं आहे, हे "सर्वगुणसंपन्न' या लघुपटात दिसतं. नात्यांकडे आणि पर्यायाने माणसांच्या जगण्याकडे डोळसपणे पाहायला लावणारे हे चार लघुपट निव्वळ करमणुकीच्या पलीकडे काहीतरी नवीन पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मेजवानीच ठरावेत.
लेखकाचा संपर्क - ७७३८३९४०२३