आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत्व जागवणारी कार्यकर्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यासपीठांवरून बोलणे आणि प्रत्यक्ष कृती, यात कधीच अंतर न ठेवणारी दुर्मिळ व्यक्तिमत्त्वे अभावाने आढळतात, हे सिद्ध करणारे अत्यंत खंबीर, ठाम तरीही ऋजू, संवेदनशील असे व्यक्तिमत्त्व विद्याताई बाळ यांच्या निधनाने अस्तंगत झाले. स्त्रियांच्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी त्यांनी हयातभर झगडा दिला. विरोध पत्करला, टीका झेलली. पण आपली भूमिका बदलली नाही आणि संघर्षही थांबवला नाही. भारतीय समाजजीवनात एखाद्या सुशिक्षित स्त्रीने सार्वजनिक व्यासपीठांवरून स्त्रियांच्या समस्यांना जाहीर वाचा फोडणे, ही घटना क्वचित घडली. विद्याताईंनी अशा घटनांमध्ये सातत्य राखले. मुख्य म्हणजे जो विचार त्यांनी मांडला, त्याला पूरक कृतींची जोडही नेहमीच दिली. याबाबतीत 'बोले तैसा चाले' हे संतवचन त्यांनी प्रमाण मानलेले दिसते. मिळून साऱ्याजणी, सखी मंडळ, अक्षरस्पर्श वाचनालय, नारी समता मंच आणि साथ साथ विवाह अभ्यास मंडळ या त्यांनी स्थापन केलेल्या पाचही संस्थांचे वेगळेपण त्यांच्या नावातच आहे तसेच ते कार्यातही आहे. त्यांचा हा प्रवास व्यक्तिगत बदलातून सामाजिक बदलांपर्यंत घडत गेलेला दिसतो. त्यांनी कित्येक क्षेत्रांतली माणसं सतत जोडून घेतली. त्यामुळेच 'आपल्या घडणीत विद्याताईंचा वाटा आहे,' असं आवर्जून नोंदवणारे असंख्य जण आसपास आहेत. सगळ्यांशी विद्याताईंचं मैत्र होतं. त्यांची भूमिका कणखर, पण आविष्कार संयत असे. त्यांचा पाठिंबा बळ देणारा अाणि अस्तित्वही दिलासादायक असे. विद्याताईंना स्वत:च्या मर्यादांचीही जाणीव होती. 'माझ्यापेक्षा खूप काम करणाऱ्या अनेक जणी आहेत, पण मी माध्यमात असल्यानं मला अधिक नाव मिळालं,' असं त्या नेहमी म्हणत असत. सतत प्रवास, व्याख्यानं, चर्चा, परिषदा, आंदोलनं, मोर्चे, लेखन हे सांभाळताना आपल्या विचारांची वाट त्या अनुभवांतून समृद्ध करत गेल्या. विद्याताईंचे वेगळेपण असे की, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षात रुक्ष, रखरखीत राहतात. विद्याताई मात्र याला सन्माननीय अपवाद होत्या. उच्च दर्जाची रसिकता आणि कलांची जाण त्यांना होती. त्यामुळे पुस्तके, कविता, अभिजात गायनाच्या मैफली, कलामहोत्सव, साहित्य संमेलने, कलाप्रदर्शने, चित्रपट, नाटके, अभिवाचने, सादरीकरणे… असा सगळीकडे मुक्त संचार असे. नव्या कलाकारांचे कौतुक त्या आवर्जून करत. अनेक कलाकारांना त्यांच्या संस्थांमार्फत आमंत्रित करून, त्यांचे अभिजात कलाविष्कार रसिकांपर्यंत पोचवण्याचे त्या माध्यम बनत. महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाची रुजुवात फुले, कर्वे यांनी केली, पण स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्यात मोठा वाटा नि:संशय विद्याताईंचा आहे. त्यांनी स्त्रियांमध्ये स्वत्व जागवले. संवाद वाढवला. संघर्ष शिकवला. विचारांनुरूप कृती करण्याचं धाडस दिलं. मात्र हे सर्व ठामपणे करताना विद्याताईंची भाषा मात्र ऋजू आणि अनाग्रही होती. कृती दृढपणे पण व्यक्तिमत्त्व संवादी, शांत. त्यामुळे स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्तांचा पंथ त्यांच्याकडे नेतृत्व म्हणूनच पाहू लागला. एकेकाळी पूर्णवेळ गृहिणीपद निभावणाऱ्या विद्याताईंचा पूर्णवेळ कार्यकर्तीचा हा प्रवास अचंबित करणारा तर खराच, पण उगवत्या पिढीतल्या काही करू पाहणाऱ्या उन्मेषांना बळ देणाराही आहे.  

बातम्या आणखी आहेत...