आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉसमॉस बँक लूटप्रकरणी औरंगाबादमधून एक अटकेत; कार्डद्वारे काढले ८९ लाख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/औरंगाबाद - कॉसमॉस बँकेवरील ऑनलाइन दरोड्याप्रकरणी चतुःशंृगी पोलिसांनी भिवंडी आणि औरंगाबाद येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापूर येथील विविध एटीएममधून ८९ लाख ४७ हजार ५०० रुपये काढल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. न्यायालयाने दोघांना सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. फहिम मेहफूज शेख (२७, रा. नूरानी कॉम्प्लेक्स, भिवंडी), फहिम अझीम खान (३०, रा. सीमा हॉस्पिटलच्या मागे, औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


११ ते १३ ऑगस्टदरम्यान कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटण्यात आले होते. या रकमेतील अडीच कोटी रुपये भारतातील विविध एटीएममधून काढण्यात आले होते. यात ४१३ बनावट डेबिट कार्डांच्या माध्यमातून २ हजार ८०० व्यवहार करण्यात आले आहेत, तर १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून त्यातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून गेले आहेत. मुंबई, इंदूर, कोल्हापूर येथील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली असून मोबाइलच्या माहितीच्या आधारे ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा, विरार येथील असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी शेख, खान यांना ताब्यात घेतले. या दाेघांनी इतर साथीदारांसह ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत कोल्हापूर येथील ए. यू. स्मॉल फायनान्स, सारस्वत बँक, एसव्हीसीएल बँक, द कमर्शियल को-ऑपरेटिव्ह, एचडीएफसी, अॅक्सिस, एसबीआय, युनियन बँक, पंजाब आणि महाराष्ट्र बँकांच्या एटीएममधून तब्बल ८९ लाख ४७ हजार ५०० रुपये काढले. ही बनावट एटीएम कार्डे त्यांनी कोठे तयार केली, आरोपींनी बँकेचा डाटा कसा मिळवला, त्यांच्या इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी, बँकेचे सर्व्हर हॅक होणार आहे, याची माहिती त्यांना कशी मिळाली, याचा शोध घेण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना कोठडी सुनावली. 

बातम्या आणखी आहेत...