आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी होता दहशतवादी, आता भारतमातेसाठी झाला शहीद; शौर्यासाठी दोनवेळा मिळाले मेडल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियान येथे रविवारी झालेल्या चकमकीत नजीर अहमद वानी शहीद झाले. एकेकाळी वानी दहशतवादी होते. पण नंतर त्यांनी आत्मसमर्पण केले. भारतीय लष्कराने त्यांना सच्चा सैनिक म्हटले आहे. त्यांना 2007 आणि यावर्षी ऑगस्टमध्ये शौर्यासाठी सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

 

लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांच्या मते, 'वानी यांना बाटागुंड येथील चकमकीत गोळ्या लागल्या होत्या. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले . पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दु:खाच्या या क्षणी संपूर्ण सेना वानी परिवारासोबत आहे. या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.  


लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
कुलगामच्या चेकी अश्मुजी येथील रहिवासी असणारे वानी दहशतवादी होते. पण नंतर त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला आणि 2004 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. त्यांनी टेरिटोरियल सेनेच्या 162 व्या बटालियनमध्ये सुरूवात केली होती. सोमवारी लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी आहेत. वानी यांच्या गावाच्या आसपास बऱ्याच दहशतवादी कारवाया होत असतात. 


हिजबुल आणि लश्कर-ए- तोयबासोबत होते संबंध
> 25 नोव्हेंबरला शोपियान येथील हिपुरा बाटागुंड भागात 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामध्ये चार हिजबुल मुझाहिदीन तर दोन लश्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. उमर मजीद गनी, मुश्ताक अहमद मीर, मोहम्मद अब्बास भट, मोहम्मद वसीम वगई, खालिद फारूक मली अशी त्यांची ओळख पटली आहे. उमर गनी बाटमालू चकमकी दरम्यान फरार झाला. त्याचा फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल झाला होता. मागील दोन वर्षांपासून  अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. 


सुरक्षारक्षकांच्या समुहावर झाली दगडफेक
सुरक्षा रक्षकांच्या कारवाईला लक्षात घेऊन शोपियान येथे मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यानंतरही काही युवकांनी चकमकीनंतर परतणाऱ्या जवानांच्या समुहावर दगडफेक केली. प्रत्युत्तरातील कारवाईमध्ये दगडफेक करणारे काही युवक जखमी झाले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...