आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यातले एकूण 10 प्रमुख उमेदवार यंदाच्या निवडणुकीत अामने-सामने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नेते व नाती असेही राजकारणाचे एक चित्र असते. एकाच घरातील अनेक सदस्य वेगवेगळ्या पक्षात असल्याचे चित्रही दिसते. विशेष म्हणजे वडील काँग्रेस किंवा समाजवादी तर मुले शिवसेनेत असेही चित्र दिसते. परंतु एकमेकांविरोधात निवडणूक लढवण्यासाठी सख्खे नातेवाईक उभे ठाकल्याचे चित्र अभावानेच दिसते. परंतु या निवडणुकीत २ पक्षांचे नातेवाईक अध्यक्षांसोबत ५ उमेदवार आपल्या नातेवाइकांसमोर निवडणुकीला एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.

उद्धव ठाकरे v/s राज ठाकरे
शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे प्रस्थ वाढल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि आपला वेगळा मार्ग निवडला. अनेक निवडणुकाही त्यांनी शिवसेनेविरोधात लढल्या. शिवसेनेच्या दादर या बालेकिल्ल्यालाही त्यांनी धडक दिली होती. यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचंड नाराज झाले होते. या वेळी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकमेकांविरोधात उभ्या आहेत. उद्धव ठाकरे सत्तेसाठी मते मागत आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी मते द्या, असे साकडे राज ठाकरे यांनी मतदारांना घातले आहे.

इंद्रनील v/s निलय नाईक
पुसदमध्ये राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक व भाजपचे विधान परिषदेचे आमदार निलय नाईक या चुलत भावांत लढत आहे. इंद्रनील हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू व राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नाही म्हणून त्यांनी सेनेत प्रवेश केला. परंतु जागावाटपात पुसद भाजपकडे गेल्याने सेनेकडूनही उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली. २०१४ मध्ये काका मनोहर नाईक यांनी निलय नाईकचा पराभव केला होता.

पंकजा मुंडे v/s धनंजय मुंडे
बीडमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे चुलत भाऊ-बहिण एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. पंकजा यांच्यासाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची लढत असल्याने त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी बोलावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा बीडमध्ये व्हावी या त्यांच्या प्रयत्नाला यश आलेले आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून धनंजय मुंडे यांनी पंकज मुंडे यांच्यावर आरोप करून त्यांना सळो की पळो करून सोडले होते.

जयकुमार v/s शेखर गोरे
साताऱ्यातील माण येथे मात्र सख्ख्या भावांमध्येच लढत होत असून विशेष म्हणजे दोघेही ज्या पक्षाकडून मैदानात आहेत त्या दोन्ही पक्षांची या वेळी युती झालेली आहे. जयकुमार गोरे हे मूळचे काँग्रेसचे आमदार असून या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिकीट मिळवले. त्यांना मतदारसंघात विरोध असल्याने त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि लढाईला तयार झाले. राज्यात युती परंतु येथे मात्र दुफळी आणि सख्खे भाऊ मैदानात असे चित्र येथे आहे.
 

जयदत्त v/s संदीप क्षीरसागर
बीडमध्ये काका जयदत्त क्षीरसागर व पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात लढत आहे. जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचेच आमदार होते. परंतु धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे पटेनासे झाल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मंत्रिपदही मिळवले. मंत्रिपदासाठी त्यांनी ५० कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी केला होता. राष्ट्रवादीने जूनमध्येच संदीप यांना काकाच्या विरोधात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. काका-पुतण्याच्या या लढाईत कोण विजयी होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.

संभाजी v/s अशोक निलंगेकर
निलंगा, लातूर येथील संभाजी पाटील निलंगेकर हे राज्याचे कौशल्य विकास मंत्री असून त्यांच्याविरोधात त्यांचे काका अशोक पाटील निलंगेकर काँग्रेसकडून उभे आहेत. अशोक पाटील हे काँग्रेसचे प्रदेश चिटणीस व माजी जि. प. अध्यक्ष असून २०१४ मध्येही या दोघांत लढत झाली होती. तेव्हाही पुतण्याने काकाचा पराभव केला होता. संभाजी यांनी २००४ मध्ये आजोबा व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांचा पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत नातवाला हार पत्करावी लागली होती.

बातम्या आणखी आहेत...