आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमच मतदान करणाऱ्या चितोड गावाचा कौल ठरणार निर्णायक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकासाचा मोठा अनुशेष आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, लोकसंग्रामचे उमेदवार रिंगणात आहेत. महापालिकेची हद्दवाढ झाल्याने या प्रभागात चितोड गावाचा समावेश झाला असून, गावातील नागरिक प्रथमच महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करतील. त्यामुळे त्यांचा कौल निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. 

 

या प्रभागात चितोड गावासह मोतीनाला परिसर, कालिकानगर, अजबेनगर, कृषीनगर, भोलेबाबा नगर, रामनगर, शास्त्रीनगर, शर्मानगर, हटकरवाडी, चितोड रोड परिसर, संभाप्पा कॉलनी, जलगंगा सोसायटी, जोरावअली सोसायटी, जयमल्हार नगर, साईबाबा सोसायटी, शांतीनगर, राजहंस कॉलनी, दक्षता कॉलनी आदी भागांचा समावेश आहे. प्रभागात १४ हजार २०० मतदार आहेत. या प्रभागात विकासाचा मोठा अनुशेष आहे. शहरातील इतर प्रभागांच्या तुलनेत या प्रभागाचा विस्तार लहान आहे. या प्रभागातून चार ऐवजी तीन नगरसेवक निवडून येतील. तीन जागांसाठी तब्बल २२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांसमोर बहुजन समाज पार्टी, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आणि लोकसंग्रामच्या उमेदवारांचा समावेश आहे. प्रभागात विविध जाती धर्माच्या मतदारांचे वास्तव्य असून त्यातही चितोड गावातील मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. प्रभागातील अ जागेसाठी भाजपच्या योगिता बागुल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या यमुनाबाई जाधव, शिवसेनेच्या विद्या खरात, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या रेखा वाघ, भारिप बहुजन महासंघाच्या सुनंदा निकम, लोकसंग्रामच्या सुरेखा भामरे यांच्यात लढत होणार आहे. याशिवाय सुरेखा गुलाले, आशाबाई त्रिभुवन या अपक्ष उमेदवारही रिंगणात आहे. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने मतविभाजन होण्याची शक्यता आहे. प्रभागात जाधव परिवाराचे प्राबल्य आहे. त्यांच्या समोर शिवसेनेच्या विद्या खरात यांचे कडवे आव्हान आहे. विद्या खरात भरत खरात यांच्या कन्या आहेत. प्रभागातील ब जागेवर भाजप आणि लोकसंग्राममध्ये सरळ लढत होत आहे. या जागेसाठी भाजपच्या रेखा सोनवणे आणि लोकसंग्रामच्या पद्मा भवरे रिंगणात आहेत.

 

क जागेवर भाजपचे संतोष खताळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदलाल अजळकर, लोकसंग्रामचे पारुजी घुमरे, शिवसेनेचे अरुण लष्कर, बसपाचे राहुल गायकवाड, अपक्ष विलास ढवळे, सतीश उघडे, अनिल थोरात, संतोष महानर, अनिल राजपूत रिंगणात आहेत. या प्रभागात भाजप, लोकसंग्राम, शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर बसप आणि अपक्षांचे मोठे आव्हान आहे. प्रभागातील सर्वच उमेदवारांनी स्थानिक समस्यांवर बोट ठेवत प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे. 


रस्ते, गटारीची समस्या 
प्रभाग क्रमांक १६ मध्ये रस्ते, पाणी, गटारी, पथदिवे आदी प्रमुख समस्या आहेत. काही वर्षांपूर्वी कृषीनगर जवळ असलेल्या नाल्यात शालेय विद्यार्थी वाहून गेला. त्यानंतर या नाल्यावरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे. अद्यापही ही मागणी पूर्ण झालेली नाही. प्रभागात भौतिक सुविधांची वानवा आहे. उन्हाळ्यात काही भागांना टँकरने पाणीपुरवठा होतो. चितोड गावातही रस्ते, पाणी, गटारीची समस्या आहे. 

 

ही कामे मार्गी 
परिसरातील काही भागात रस्त्यांची कामे झाली आहेत. त्याचबरोबर नाल्याला संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. काही भागात गटारींची कामेही करण्यात आली आहे. याच कामांच्या जोरावर विद्यमान नगरसेवक मत मागत आहेत. परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काही कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे काही प्रश्न सुटले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...