आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक खिडकी योजनेमुळे आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते भारताकडे आकर्षित होतील : जावडेकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात बुधवारी पणजीत अमिताभ बच्चन, रजनीकांत, मंत्री जावडेकर यांच्या उपस्थितीत झाली. - Divya Marathi
५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात बुधवारी पणजीत अमिताभ बच्चन, रजनीकांत, मंत्री जावडेकर यांच्या उपस्थितीत झाली.

नितीश गोवंडे 

पणजी  - एक खिडकी योजनेमुळे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते भारताकडे आकर्षित होतील, असे मत प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी भारतात अनेक सुंदर स्थळे आहेत. चित्रीकरणासाठी १५-१० परवानग्या घ्याव्या लागतात. ही परिस्थिती बदलावी यासाठी एक खिडकी योजनेचे काम सुरू आहे. गोवा, लेह-लडाख, अंदमान-निकोबार यासारख्या स्थळांना त्याचा फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला बुधवारी गोव्यात शानदार कार्यक्रमाने सुरुवात झाली त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत या दिग्गजांची उपस्थिती होती. शंकर महादेवन आणि जॅझचे दैवत मानले जाणारे लुई बॅन्कस यांचे बहारदार संगीतमय सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमाने गोव्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये झालेला हा उद्‌घाटन सोहळा रंगतदार ठरला. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती.फ्रेंच चित्रपटांचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री इसाबेला ह्युपर्ट यांचा या वेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.  सिनेसृष्टीतल्या अमूल्य योगदानाबद्दल सुपरस्टार रजनीकांत यांना आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी अमिताभ बच्चन यांचा उल्लेख आपले स्फूर्तिस्थान असा करून हा पुरस्कार आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्यासह आपल्या चाहत्यांना समर्पित करत असल्याचे रजनीकांत यांनी सांगितले. सुवर्ण महोत्सवी इफ्फीनिमित्ताने या वेळी एका विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.महानायक अमिताभ बच्चन यांनाही या कार्यक्रमात गौरवण्यात आले. आई-वडिलांचा आशीर्वाद  आणि चाहत्यांचे आभार अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी चाहत्यांनी साथ दिली, त्यांचे ऋण आपल्यावर आहे, या ऋणात आपण राहू इच्छितो, असेही ते म्हणाले. 

शंकर महादेवन यांच्या सूर निरागस वंदनाने श्रीगणेशा

प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी “सूर निरागस हो’ या गणेश वंदनाने महोत्सवाचा श्रीगणेशा केला. यानंतर त्यांनी सादर केलेले अफलातून फ्युजन, ब्रीथलेस आणि कोकण एक्स्प्रेसने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.स्व. मनाेहर पर्रीकरांच्या योगदानाची घेतली दखल
 
यंदाच्या सुवर्णमहोत्सवी इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. इफ्फी गोव्यात स्थिरावण्यासाठी महत्त्वाची भूमिका पर्रीकरांनी बजावली होती. उद्घाटनावेळी पर्रीकर यांच्यावर बनवलेला लघुपट दाखवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.