accident / मुलाला भेटून गावी परतणारी महिला धडकेत ठार 

कांचनवाडीजवळ कंटेनर-रिक्षाची धडक 

प्रतिनिधी

Aug 25,2019 10:30:00 AM IST

औरंगाबाद : सुसाट धावणाऱ्या कंटेनर व रिक्षाच्या धडकेत रिक्षातील एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी तीन वाजता पैठण लिंक रस्त्यावरील कांचनवाडी येथे घडला. लीलाबाई प्रल्हाद दावरे (५०) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. शीतल गौतम दावरे (३२), आरुषी गौतम दावरे (६), आराध्या गौतम दावरे (८, सर्व रा. ज्ञानेश्वरनगर, नाशिक) व सुशील खेडेकर (२५, रा. औरंगाबाद) हे जखमी झाले आहेत.

मूळ नाशिकच्या असलेल्या लीलाबाई यांचा मुलगा गौतम चित्तेगाव एमआयडीसीमधील एका कंपनीत कामगार असून तो चितेगाव परिसरात राहतो. त्याला भेटण्यासाठी लीलाबाईसह गौतमची पत्नी व दोन मुली काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे आल्या होत्या. शनिवारी नाशिकला परत जाणार होत्या. त्यासाठी दुपारी रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी रिक्षातून निघाल्या होत्या. आई, पत्नी, मुलींना रिक्षात बसवून गौतम दुचाकीने रेल्वेस्टेशनकडे निघाला होता. रिक्षा निघाल्यानंतर कांचनवाडीजवळील मुंबई हायवे टी पॉइंटजवळ कंटेनरने (सीजी ०४ एमक्यू ०८७२) रिक्षाला धडक दिली. हा कंटेनर बीड बायपासकडून एएस क्‍लबकडे जात होता. त्याने रिक्षाला समोरून धडक दिली. अपघातातील सर्व जखमींना घाटीत दाखल केले. मात्र, दाखल केल्यानंतर तासाभराने उपचार सुरू असताना लीलाबाईचा मृत्यू झाला. कंटेनरचा वेग अति असल्याने रिक्षाच्या समोरील भागाचा चुराडा झाला आणि रिक्षाचालकासह सर्व जखमी झाले. अपघातानंतर बराच वेळ वाहतूक जाम झाली होती. घटनेची माहिती कळताच सातारा पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

X
COMMENT