आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Wonderful Home For The World class Dance, Article By Shrikant Saraf In Divyamarathi

कलायान: अवघे विश्वचि नृत्याचे अद्‌भुत घर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे सारे या कलाकारांनी अवघ्या एक ते सव्वा तासाच्या मुडियट्ट नृत्यातून मांडले

श्रीकांत सराफ
shrikant.saraf@dbcorp.i
n
 
नृत्य करणारे काही कलावंत तुमच्यातून म्हणजे प्रेक्षागृहातून येतील, अशी उद्घोषणा महागामीच्या संचालक पार्वती दत्ता करत होत्या. तेव्हा नाट्यजगताशी नाळ जुळलेल्या अनेकांना 'यात काय विशेष?' असे वाटले. त्यामुळे ते काहीसे सुस्तावून बसले होते. पण, काही मिनिटांतच त्यांनी जे काही पाहिले, अनुभवले ते जिवाचा थरकाप उडवणारे होते. बरं, केवळ थरकाप उडाला असता तरी समजू शकले असते, पण केरळचे नर्तक आणि त्यांच्यासोबतचे वादक त्यापुढे गेले होते. त्यांनी सत्याचा असत्यावर विजय होतोच, असे मूलभूत तत्व कालिका देवी-राक्षस युद्धातून सांगताना पाहता पाहता रंगमंचाभोवतीचा अवकाशही ताब्यात घेतला. थरकापाचे रुपांतर अद्‌भूततेमध्ये केले. मग आणखी एक पाऊल पुढे टाकत केवळ वाद्यांचा ठेका बदलत, चेहऱ्यावर भाव-भावनांच्या प्रत्यंचा खेचत रोमांच उभा केला आणि अखेरच्या टप्प्यात त्याच रंगमंचावर रसिकांमध्ये साहसही जागृत केले...

हे सारे या कलाकारांनी अवघ्या एक ते सव्वा तासाच्या मुडियट्ट नृत्यातून मांडले, तेव्हा दाट झाडांनी वेढलेल्या महागामीचा परिसर आश्चर्यचकित, आनंदित झाला. 'अवघे विश्वच नृत्याचे अद्‌भूत घर' असाच भाव रसिकांच्या मनात उमटला. पण, हे केवळ या मुडियट्ट नृत्यापुरते मर्यादित नव्हते, तर औरंगाबादमध्ये आठ दिवसांपूर्वी झालेल्या महागामीच्या शारंगदेव महोत्सवातील प्रत्येक सादरीकरणाबाबत हेच म्हणावे लागेल. सर्व नृत्य प्रकार स्वतंत्र भाषेत, शैलीत काहीतरी संदेश देणारे होते. तरीही त्याचा मूळ धागा अतिशय पक्का, कसदार होता. तो म्हणजे हे जीवन असंख्य घटनांनी, चढ-उतारांनी, सुख-दुःखाने काठोकाठ भरले आहे. त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चालावेच लागते. काही क्षणांशी लढणे भाग पडते. पण, अंतिम विजय सत्याचा, चांगुलपणाचाच होतो. मात्र, त्यासाठी अविरतपणे कष्ट केलेच पाहिजेत. मेहनतीनेच तुम्ही पुढे जाऊ शकतात, असे स्पष्ट निर्देश त्यात होते. त्यामुळे वरवर पाहता हा महोत्सव म्हणजे नव्या पिढीसाठी भारतीय नृत्य परंपरेची ओळख असा असला, तरी त्यातून सर्वांसाठी जीवनातील एक मूळ तत्व, नृत्याच्या वैश्विक परिभाषेतून देण्याचा प्रयत्न होताच. आणि प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता तो प्रयत्न यशस्वी होताना दिसला.

नृत्य म्हणजे केवळ मनोरंजन नाही. किंवा वाद्यांच्या तालांवर शरीराला नव-नव्या आकारात वाकवणे नाही, तर नृत्यही नाटक, सिनेमा, कथा, कादंबरीप्रमाणे एक कथानक घेऊन तयार होते. त्यातही व्यक्तिरेखा असतात. त्या टप्प्याटप्प्याने विकसित होतात. या नृत्य प्रवासात नर्तकाला काहीतरी सांगायचे असते. वादकांना विशिष्ट तालातून वातावरण निर्माण करायचे असते. हे कळण्यापर्यंत या महोत्सवाने नृत्य अभ्यासक, रसिकांना आणून ठेवले आहे. आजकाल कुणाला कोणाचेच समजून घ्यायचे नाही. माझे तेच खरे, असे मानणाऱ्या उजव्या, डाव्या, मध्यममार्गी लोकांचा चोहोबाजूंनी गलबला झाला आहे. अशा स्थितीत या महोत्सवातून अतिशय शांतपणे, सखोलतेने नेमका विषय समजून घेत, समजावून सांगितला गेला. याचे पूर्ण श्रेय या महोत्सवाचा पसारा अतिशय कल्पकतेने, सातत्याने, न थकता मांडणाऱ्या महागामीच्या संचालक पार्वती दत्ता यांना आहे. भारतीय शास्त्रीय लोकनृत्य म्हणजे एक महान संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. आणि तो जतन करण्याची जबाबदारी आताच्या लोकांची आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेकडो वर्षांपासून नृत्य कलेला जिवंत ठेवणाऱ्यांना जगवणे, सर्वांसमोर आणणे हे आपले कर्तव्यच आहे, या ठाम जाणिवेतून त्यांचे काम सुरू आहे. म्हणून त्यांनी कायम छोटेखानी शहरातील लोकांपासून दूर असलेल्या नृत्य प्रकारांनाही प्राधान्य दिले. सतत काहीतरी नवीन, वेगळे करण्याचा त्यांचा ध्यास दरवर्षी नृत्याची एकेक नवी दालने खुले करत आहे. गेल्या काही वर्षात जागतिक कीर्तीच्या अनेक नृत्य कलावंतांना निमंत्रित केले. त्यांच्या सादरीकरणातून रसिकांच्या मनाला तृप्तता मिळवून दिलीच. शिवाय, भारतीय शास्त्रीय नृत्यातील नवे काही जाणून घेण्यासाठी तळमळणाऱ्यांची थेट कलावंतांशी चर्चा घडवून त्यांना एक निश्चित दिशाही दाखवून दिली.

आजकाल कुणाला कुणाचेच काहीच समजून घ्यायचे नाही. माझे तेच खरे असे मानणाऱ्या उजव्या, डाव्या, मध्यममार्गी लोकांचा चोहोबाजूंनी गलबला झाला आहे. अशा स्थितीत महागामी महोत्सवातून अतिशय शांतपणे अन् सखोलतेने नेमका विषय समजून घेत, रसिकांना समजावून सांगितला गेला.