आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद : कैलासनगरमधील दादा कॉलनीत अवैध धंद्यातून फेरोज अनिस खान (३२) याचा चाकूने ११ वार करत खून झाला. तो बांधकाम ठेकेदार होता. सोमवारी (१९ ऑगस्ट) भरदुपारी या गजबजलेल्या परिसरामध्ये गँगवॉरमधून हा प्रकार झाल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच कैलासनगरसह घाटी परिसरात मोठा जमाव जमला होता. वाळूच्या व्यवसायासाठी हप्ता देत नसल्याने हल्ला झाल्याची फिर्याद फेरोजचा भाऊ अफसर याने दिली. हुसेन खान इब्राहिम खान ऊर्फ बाली, हुसेनचा मुलगा इम्रान, पुतण्या उस्मान अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली.
अफसरने जिन्सी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास आम्ही सर्वजण घरी असताना हुसेन ऊर्फ बाली, त्याचा मुलगा आणि पुतण्या आमच्या घरी आले. माझा भाऊ फेरोजला बाहेर बोलावले आणि संजयनगर गल्ली क्रमांक एक येथे नाल्याशेजारी असलेल्या सामाजिक सभागृहात घेऊन गेले. बराच वेळ झाला तरी भाऊ परत कसा आला नाही म्हणून मी त्याला पाहण्यासाठी तिकडे गेलो तेव्हा इम्रान, उस्मानने फेरोजला पकडून ठेवले होते. हुसेन त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार करत होता. 'तू आम्हाला वाळूचा हप्ता का देत नाहीस?' असे म्हणत आरोपी वार करत होते. तेव्हा मी व इतर नागरिकांनी त्यांच्या तावडीतून फेरोजला सोडवत घाटीमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक जोगदंड हे तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक बिरारे कर्मचाऱ्यांसह घाटीमध्ये दाखल झाले. याप्रकरणी मुख्य आरोपी हुसेन ऊर्फ बाली व त्याच्या मुलाला अटक करण्यात आली.
ठेकेदारी आणि राजकारणही : फेरोजला तीन भाऊ असून तो सर्वात मोठा होता. याच भागातील मुलीशी त्याचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले. त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तो दोन भाऊ, आई-वडील, पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. वाळूसह तो बांधकाम व्यवसायात ठेकेदारीही करीत होता. सोबतच स्थानिक राजकारणातही त्याचा वावर होता.
अवैध धंद्यातून कैलासनगरमधील दादा कॉलनीत युवकाचा खून करण्यात आला. इन्सेट : मृत फेरोज अनिस खान. दुपारी एक वाजता भावाच्या डोळ्यादेखत पोटामध्ये केले वार.
वाळू व्यवसायासाठी हप्ता देत नसल्याने हल्ल्याची फिर्याद.
आरोपी हुसेन खान इब्राहिम खान
आरोपी -इम्रानखान हुसेनखान
आरोपी उस्मान खान इस्माइल खान
सामाजिक सभागृह नव्हे, अवैध धंद्यांचा अड्डा
येथील सामाजिक सभागृहात सर्व अवैध धंदे चालतात. दारे, खिडक्या मोडलेल्या अवस्थेत आहेत. जुगार, नशेखोरी, टवाळक्यांसाठी या सभागृहाचा वापर होतो. यापूर्वी येथे दोन खून झालेले असून हा तिसरा खून असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या भागातील नागरिकांनाही याचा त्रास होतो. विशेष म्हणजे पोलिस ठाण्यापासून फार तर एक किलोमीटर अंतरावर हे सभागृह आहे. तरीही येथे अवैध धंदे बिनदिक्कतपणे सुरू होते.
दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन
या प्रकरणात फिर्याद आणि वस्तुस्थिती यात काही तफावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींना गाठले. काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही खोलात जाऊन विचारणा केली तेव्हा त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी :
- फेरोज मनपाच्या सभागृहात खुलेआमपणे पत्त्याचा क्लब चालवत होता.
- त्यावर कारवाईसाठी शनिवारी पोलिसांचे पथक आले होते, पण त्याची टीप मिळाल्याने जुगारी पळून गेले होते.
- क्लबची माहिती हुसेननेच पोलिसांना दिली असावी, असा फेरोजला संशय होता.
- त्यावरून तो रविवारी सकाळी हुसेनच्या घरी पोहोचला होता. पण तो जालन्याला गेल्याचे त्याच्या पत्नीने सांगितल्यावर फेरोज परतला.
- रविवारी सायंकाळी हुसेनने फेरोज खानविरुद्ध धमकावल्याची तक्रार दिली.
- सोमवारी सकाळी पुन्हा फेरोज काही साथीदारांसह सामाजिक सभागृहाजवळच राहणाऱ्या हुसेनच्या घरी पोहोचला.
- दोघांमध्ये बाचाबाची झाली.
- हुसेनने चाकूने फेरोजवर सपासप वार केले. पहिला वार जांघेत केल्याने फेरोज पहिल्याच फटक्यात घायाळ झाला.
- त्यानंतर एकापाठोपाठ एक ११ वार केले.
- जखमी अवस्थेत फेरोजने आपल्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, १५ ते २० फुटांपर्यंत चालल्यानंतर तो कोसळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.