आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या उपचारासाठी शासकीय मदत मागणारा तरुण पोलिसांच्या नजरकैदेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरीनाथ काळे

फुलंब्री - साहेब मी काही अतिरेकी आहे काॽ मला गावातून पोलिसांच्या गाडीत नेत अपमानास्पद वागणूक दिली, माझा काय गुन्हा आहे. मी केवळ शासनाला मदत मागितली यात चुकले कायॽ असा सवाल मंगेशने पोलिसांनी गाडीत बसवून नेताना केल्याने गावात तणावाचे वातावरण हाेते. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान गेल्या वर्षभरापासून वडिलांच्या इलाजासाठी शासकीय मदतीची मागणी करणारा युवक मंगेश साबळे याला पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. दरम्यान, उपमहापौर विजय आैताडे व सभापती मेटे यांनी ग्रामस्थांची समजूत काढली, तर  बागडे यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला असून तालुकाभरात सोशल मीडियावर या घटनेचा निषेध व्यक्त हाेत आहे. 

गेवराई पायगा येथील संजय त्र्यंबक साबळे या शेतकऱ्याचे यकृत खराब झाले असून त्यांचा मुलगा मंगेश साबळे हा त्याच्या वडिलांना यकृताचा काही भाग देण्यास तयार आहे. परंतु यकृत प्रत्यारोपणाचा खर्च त्याच्या आवाक्याबाहेर असल्याने तो हतबल झाला आहे. यासाठी त्याने मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहायता मदतनिधीसाठी अर्ज दाखल केला होता. तसेच मतदारसंघाचे आमदार या नात्याने बागडे यांच्याकडे मदतीसाठी मागणी केली होती. बागडेंनी हाेकार दिल्याने ताे पुणे येथील नामांिकत रुग्णालयात दाखल झाला, परंतु मदत न मिळाल्याने त्याने तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी जमीन विकली होती. वडिलांना यकृताचा काही भाग मंगेश द्यायला तयार झाला होता, परंतु सदरील दवाखान्यात शासकीय मदत प्राप्त न झाल्याने त्याला वडिलांना घेऊन परत गावी यावे लागले. त्यानंतर  मुख्यमंत्री २८ आॅगस्ट राेजी महाजनादेश यात्रेनिमित्त फुलंब्री येथे आले असताना त्यांच्या सभेत त्याने वडिलांना मदत मिळावी म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यास सभा संपेपर्यंत नजर कैदेत ठेवले होते. त्यावेळी ही त्याला मदत न मिळाल्याने त्याने औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. तेव्हा त्याला मदतीचे आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले होते. त्यानंतरही मदत न मिळाल्याने त्याने काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील हडकाेच्या दूरदर्शनच्या टाॅवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी मदतीचे आश्वासन देऊन खाली उतरवले होते. यावेळी अनेक दानशूर लोकांनी त्यास मदत केली होती.

दरम्यान, बुधवार रोजी विधानसभा अध्यक्ष यांच्या प्रचारानिमित्त गेवराई पायगा येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंगेश हा काही गडबड करेल या भीतीने पोलिसांनी त्यास दुपारी एक वाजता उचलून वडोदबाजार ठाण्यात नजर कैदेत ठेवले होते व सभा संपताच सोडून दिले. परंतु ग्रामस्थांचा राग अनावर झाला होता, मंगेशला अटक का केलीॽ असा सवाल ग्रामस्थांनी बागडे यांना विचारला. 

दरम्यान, बागडे यांनी मंदिरात जाऊन कार्यक्रम सुरू केला तर उपमहापौर विजय औताडे व पं.स. सभापती सर्जेराव मेटे हे ग्रामस्थांची समजूत काढत होते. यामुळे बागडे यांनी कार्यक्रम आटोपता घेत काढता पाय घेतला. या वेळी मंगेश साबळेचे आजारी वडील नुसते रडत होते, तर घरी आल्यावर मंगेश हा जमलेल्या लोकांना साहेब मी अतिरेकी आहे का, का मला गावातून पोलिसांच्या गाडीतून घेऊन जात अपमानास्पद वागणूक दिली, असा सवाल तो करीत होता.
 
माझ्या वडिलांच्या आजाराचे या लोकांनी राजकारण केले. मदत तर मिळाली नाहीच परंतु एका अतिरेक्याप्रमाणे गावातून पोलिस घेऊन गेले व आणून सोडले. वडिलांच्या उपचारासाठी मदत मागणे हा गुन्हा आहे का. मी मदतच मागतोय. आज माझा खूप अपमान झाला.
-मंगेश साबळे, पीडित युवक.
 

सभा संपेपर्यंत नजरकैदेत ठेवले
बुधवारी हरीभाऊ बागडे यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त गेवराई पायगा येथे सभा होती. या सभेत मंगेश हा लोकांना जमा करून गोंधळ घालणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही त्याला समजावून सांगितले. परंतु सभेत जाणार असा हट्ट धरीत होता. त्यामुळे सभा संपेपर्यंत त्याला ठाण्यात नजरकैदेत ठेवले होते. नंतर त्याला गावात नेवून सोडले.- संतोष तांबे, सपोनि, वडोदबाजार