आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
समाजात सर्वत्र नीतिमूल्यांचा र्हास होताना अद्यापही प्रामाणिकपणा लोप पावला नाही, असे दिसते. मागील महिन्यातील 23 जानेवारी रोजी मला आलेला हा अनुभव सांगावासा वाटतो. मी नेहमीप्रमाणे दुकानात बसलो होतो. सकाळी अकराची वेळ होती. नुकतेच एक ग्राहक रोखीने माल खरेदी करून गेले होते. त्यानंतर एक जण पाच ते दहा मिनिटांनी भगवे वस्त्र परिधान केलेला, डोक्याच्या जटा, वाढलेली दाढी, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात भिक्षापात्र अशा वेशात दुकानासमोर उभा राहिला. मी त्याच्याकडे पाहून त्याला एक-दोन रुपये देण्यासाठी वळणार, तेवढ्यात त्याने खाली वाकून एक हजारांच्या तीन नोटा उचलल्या अणि माझ्यासमोर धरल्या. मला नेमका प्रकार समजेना. एक-दोन रुपयांची अपेक्षा ठेवणारा हा भिक्षेकरी एक-एक हजाराच्या नोटा मला कुठून काढून देत आहे? ही हातचलाखी आहे की आणखी काही? मला क्षणभर गोंधळल्यासारखे झाले. मला गोंधळलेले पाहून ते भिक्षेकरी साधू म्हणाले, कोणाचे तरी पैसे खाली पडलेले होते, तेच उचलून दिलेले आहेत. त्याच्या या प्रामाणिकपणामुळे मी बराच प्रभावित झालो आणि त्याला शंभर रुपये बक्षीस देऊ लागलो; पण त्याने बक्षीस घेण्यास नम्रपणे नकार दिला आणि मी दिलेले फक्त दोन रुपये घेऊन निघून गेला. त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे मी पाहतच राहिलो. काही वेळांनी तो मघाचा ग्राहक दुकानात आला. घाबर्या चेहर्याने त्याने माझे काही पैसे पडले आहेत का? अशी विचारणा केली. तेव्हा मी चटकन त्याचे तीन हजार रुपये काढून दिले. ते पाहून त्याला खूप आनंद झाला. तो वारंवार माझे आभार मानू लागला. तेव्हा मी त्याला घडलेला प्रकार सांगितला आणि त्या साधूच्या प्रामाणिकपणाबद्दलही सांगितले. ते ऐकून त्या ग्राहकानेही मनातल्या मनात त्या साधूचे आभार मानले. सध्याच्या काळात चांगली कमाई असलेल्या माणसालाही पैशांचा मोह राहतो. या पार्श्वभूमीवर त्या साधूचा प्रामाणिकपणा नजरेत भरल्याशिवाय राहत नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.