आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात पाच नव्हे, किमान 50 वर्षे टिकतील अशीच विकासकामे करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आम्ही कुठेही विकासकामांच्या उद््घाटनाच्या फीत कापण्यास तयार असतो, मात्र औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींनी केवळ पाच वर्षांचा विचार करून विकासकामे करू नयेत. ही कामे पुढील ५० वर्षे टिकली पाहिजेत, असे सांगत गेल्या २५ वर्षांत शहराची बकाल अवस्था करून टाकणाऱ्या स्वपक्षाच्या लोकप्रतिनिधींना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी खडे बोल सुनावले. जसे आजोबांचे या शहरावर प्रेम होते तसेच माझेही असल्याचे आवर्जून सांगितले. 

 

ठाकरे यांच्या हस्ते रविवारी क्रांती चौकात स्मार्ट सिटी बस तसेच कांचनवाडीतील १६१ एमएलडी जल-मल शुद्धीकरण प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. क्रांती चौकातील कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष भागवत कराड, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, माजी आमदार व भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य, सभागृह नेता विकास जैन, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता जमीर अहमद कादरी, गटनेता गजानन बारवाल, प्रमोद राठोड, नासेर सिद्दिकी, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आदींची उपस्थिती हाेती. ठाकरे यांच्या आधी विधानसभा अध्यक्ष बागडे बोलणार हे निश्चित होते. मात्र, बागडे यांचे नाव घेताच अगोदर मी बोलतो, नंतर नाना आपले आशीर्वाद देतील, असे म्हणत ते बोलण्यासाठी उभे राहिले. मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी कर्तबगार आयुक्त दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. विकासकामांसाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे. तरुणांनीही शहराच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

 

खैरे म्हणाले १०० बस द्या : 
येत्या ३ जानेवारीपर्यंत शंभर बस उपलब्ध करून देण्याचे आदेश खैरे यांनी टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांना दिले. वास्तविक ३ जानेवारीपर्यंत केवळ ४३ बस देणार असल्याचे कंपनीने अगोदरच स्पष्ट केले आहे. 


अजानमुळे थांबवले भाषण :
दुपारी १.१६ मिनिटाला महापौर घोडेले यांचे भाषण सुरू असताना अजान सुरू झाली. तेव्हा ठाकरे यांनी भाषण थांबवण्याची सूचना केली. अजान संपल्यानंतर घोडेले यांनी भाषण सुरू केले. 

 

मंत्र्याचा बहिष्कार का? : 
भाजपचे सर्व स्थानिक नेते या कार्यक्रमास उपस्थित होते. दुसरीकडे सेनेचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते गैरहजर होते. त्यावर भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सेनेच्याच मंत्र्याचा बहिष्कार होता का‌, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सावंत आजारी असून रावते पंढरपूरला असल्याने येऊ शकले नाहीत, असे महापौरांनी स्पष्ट केले. 

 

नाराज, बहिष्काराची भाषा करणारे एकाच मंचावर : 
शनिवारी दुपारपर्यंत भाजपचे नेते या कार्यक्रमावर नाराज होते. दुसरीकडे एमआयएमनेही कार्यक्रमावर आमचा बहिष्कार असल्याचे सांगितले होते. मात्र, महापौर घोडेले यांनी रात्रीतून सर्वांची मनधरणी करून दोन्ही पक्षाचे नेते, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना एकाच मंचावर आणले. 

 

शिवसैनिकांनी बॅनरने झाकले सिग्नल, तासभर वाहतूक खोळंबली 
क्रांती चौकातील कार्यक्रमामुळे जालना रोडवरील वाहतूक तासभर खोळंबली. रेल्वेस्टेशनकडून पैठण गेट व अमरप्रीत चौकाकडे जाणारी वाहतूक सतीश मोटारकडे वळवण्यात आली. मात्र, चौक लहान असल्याने चारही बाजूने वाहने आल्याने ती पुढे निघण्यास विलंब झाला. ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिंग काही शिवसैनिकांनी सिग्नलसमोरच लावले. हा प्रकार वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी होर्डिंग हटवले. 

 

इम्तियाज यांनी केले ठाकरेंचे कौतुक 
आमदार इम्तियाज जलील म्हणाले, मला भगवा फेटा बांधत असताना काही जण फोटो काढत होते. मात्र ज्या तिरंग्याचा रंगच भगवा आहे त्याचा ताज डोक्यावर चढवणे ही अभिमानाची बाब आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. मात्र त्यांच्या आणि स्थानिक नेत्यांच्या विचारात मोठा फरक असल्याचा टोला त्यांनी लगावला. 

 

उद््घाटनानंतर बस पुन्हा टाटाच्या शोरूममध्ये 
द््घाटनानंतर लगेच सिटी बस शहरात धावतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र मनपाने बस ताब्यात घेऊन पासिंग करून घेतले नाही. त्यामुळे या सर्व बस टाटा कंपनीच्या वाळूज येथील गोडाऊनमध्ये नेऊन लावण्यात आल्या. स्मार्ट सिटी प्रकल्पातील ३६ कोटी रुपयांच्या निधीतून एसटी महामंडळाच्या साहाय्याने शहरात पाच वर्षे शहर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १०० बस घेण्यात येणार आहेत. पैकी पाच बस मिळाल्या अाहेत. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३८ बसेस तीन जानेवारीपर्यंत मिळणार आहेत. यापूर्वी मिळालेली एक बस आणि आजच्या चार बस शहरात आल्या असल्या तरी त्या मनपाला हस्तांतरित करण्यात आल्या नाहीत. पासिंग नसल्याने त्या रस्त्यावर धावणार नाहीत. तीन तारखेला येणाऱ्या बसेस सोबतच या बसेसचे हस्तांतर करण्यात येणार आहे. उद््घाटनानंतर ठाकरे यांनी बसमध्ये बसून पाहणी केली. 

बातम्या आणखी आहेत...