Home | Bollywood | Marathi Cinekatta | aagri community complains against chala hawa yeu dya team

'चला हवा येऊ द्या'मधील 'त्या' पात्रामुळे आगरी बांधवांच्या भावना दुखावल्या, कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अशी मागणी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 02:41 PM IST

माफी मागण्यासाठी दिली 7 दिवसांची मुदत, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार

 • aagri community complains against chala hawa yeu dya team

  एन्टटेन्मेंट डेस्क. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेने आक्षेप घेतला आहे. कार्यक्रमातील आगरी पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केला आहे. या कार्यक्रमातील एका भागात आगरी पात्र चुकीच्या पद्धतीने रंगवल्याने आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी एका लेखी पत्राव्दारे हे सर्व चॅनलपर्यंत पोहोचवलं आहे.

  5 आणि 6 नोव्हेंबररोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या या भागात आगरी पात्र दाखवण्यात आलं होतं. यामधील विनोदी पात्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे चुकीचं नाही. पण आगरी पात्राद्वारे आगरी समाजावर चुकीची टीका टीप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं मत आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेनं व्यक्त केला आहे.

  यामुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि यासाठी येत्या 7 दिवसात कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी पत्रातून दिला आहे.

  पत्रात नेमके काय?
  आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे गैर नाही. त्यासाठी आगरी बोलीभाषिक वैशिष्ट्याचा वापर करणेही चूक नाही. पण आगरी पात्राद्वारे आगरी समाजावर चुकीची टिका टिप्पणी करण्याचा कोणालाही (आपल्याला सुद्धा ) अजिबात अधिकार नाही.

  आपण दाखवलेत की, भरभरुन दागिने घातलेला हा 'अधोक्षज' स्टेजवर येतो, पण त्याला स्वत:चे धड नाव उच्चारता येत नाही. त्यावरुन विनोदाच्या नावावर त्याची आपण केलेली टिंगळटवाळी ही निषेधार्ह अशीच आहे. उच्चारताही न येणारे तथाकथित अधोक्षज नाव आगरी समाजात कोणाचे असते, हा संशोधनाचा विषय नसावा!( म्हणजे आगरी माणूस काहीही करुन पूर्वग्रहदूषित मनोवृत्ती मूळे अडाणीच दाखवायचा का ??? )

  आता आगरी माणूस हा भरभरुन दागिने घालतो, ती आमची परंपराच आहे, संस्कृती आहे. कोणी एक नाही तर सर्व समाजच भरभरुन दागदागिने घालतो ! ते समाजाचेच वैशिष्ट्य असताना, त्यावर अशी टिप्पणी कशी केली जाऊ शकते ??? बरं आगरी माणसाने स्व-कष्टाने रात्रन्-दिवस खपून आपल्या मीठ - शेती - रेतीतून हे मिळवले आहेत. त्याने कधी कोणाला लुटलेले नाही लुबाडलेले नाही. डाका घालायला तो काहीदरोडेखोर नाही. सासऱ्याला लुबाडून - नडून, ते हुंड्यातूनसुद्धा मिळवलेले नाही.

  प्रत्येकाचे सौंदर्याचे मापदंड वेगवेगळे असू शकतात. म्हणून अमूकच बरोबर आणि तमूक म्हणजे हास्यास्पद /चूकीचे असे म्हणता येत नाही. मुळात भरभरुन दागिने घालण्याला हसणे, हे असुयेतूनच येउ शकते. कारण दागिने घालण्यासाठी जिगर लागते, ते आमच्याकडे आहे. आम्ही लपवत नाही , आमच्याकडे स्वकमाईचे व स्व कष्टाचे असल्याने आम्हाला त्याचा अभिमान आहे म्हणून आम्ही त्यांना मिरवतो, कोणाला त्याची जळण नसावी.

  मी जाहीर निषेध करतो ह्या विकृत चित्रण करणाऱ्या व माझ्या समाजाला एव्हड्या खालच्या पातळीवरील दाखवणाऱ्या आपल्या हिडीस मनोवृत्तीचा...


  तसेच आपणास माझ्या समाजातर्फे जाहीर इशारा देतोय की येत्या आठवढाभरात ... जर आपण माझ्या समाजाच्या असे विकृतीकरण करून केलेल्या सादरीकरणामूळे दुखावल्या गेलेल्या भावणामुळे जाहीर माफी मागावी, अन्यथा आपल्या संपुर्ण टिम ला माझ्या समाजाच्या भडकलेल्या भावनांना सामोरे जावे लागेल... व त्यामुळे जर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपली असेल...


  तसेच दिलेल्या मुदतीत आपण माझ्या समाजाची आपल्या कार्यक्रमात जाहीर माफी मागितली नाहीत तर आपणावर व आपल्या संपूर्ण टीमवर माझ्या समाजातर्फे योग्य ती दिवाणी तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.

Trending