आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- ऑल इंडिया रेडिओचे राष्ट्रीय केंद्र (चॅनल) बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. यासोबतच पाच शहरांतील विभागीय प्रशिक्षण अकादमीची कार्यालये तत्काळ बंद करण्यात आली आहेत. खर्चात कपात करण्यासोबत ही सेवा तर्कसंगत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत सेवा देणारे हे रेडिओ केंद्र १९८७ मध्ये सुरू करण्यात आले होते. लोकांना राष्ट्रीय मुद्द्यांची ओळख करून देण्यात या केंद्राची मोलाची भूमिका होती. रात्री या केंद्रावर हिंदी, उर्दु आणि इंग्रजी भाषेत अनेक प्रकारचे कार्यक्रम प्रसारित होत. कारखान्यातील मजूर, शेतकरी, लष्करातील जवान, चालक आणि विद्यार्थ्यांसारख्या श्रोत्यांकरिता कार्यक्रम प्रसारित व्हावेत, हा या रेडिओ केंद्राचा उद्देश होता. या केंद्रावरील मुशयऱ्याशिवाय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होते. ७६% लोकसंख्या आणि ६४% क्षेत्रात या स्टेशनचे कार्यक्रम ऐकता येत होते.
प्रसार भारतीने २४ डिसेंबर २०१८ रोजी आकाशवाणीच्या महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय रेडिओ केंद्र (एआयआर) बंद करण्यासोबतच अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, शिलाँग आणि तिरुवानंतपुरम येथील विभागीय प्रशिक्षण अकादमी (आरएबीएम) बंद करण्यात आल्या आहेत. ऑल इंडिया रेडिओच्या महासंचालकांनी काढलेल्या एका आदेशात म्हटले आहे की, टोडापूर आणि नागपूर इत्यादी राष्ट्रीय केंद्रांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय आरएबीएममधील कर्मचाऱ्यांना इतरत्र केंद्रांवर गरजेनुसार सामावून घेतले जाईल. दरम्यान, खर्चातील कपातीचे दुसरे उपाय करणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करून अनेक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. भारतात १९२३ मध्ये रेडिओ क्लब ऑफ मुंबई केंद्रावरून पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला होता. यानंतर १९२७ मध्ये प्रसारण सेवा स्थापन करण्यात आली. १९३६ मध्ये या सेवेला ऑल इंडिया रेडिओ नाव देण्यात आले. आज याची २०० हून अधिक रेडिओ केंद्रे आहेत. ऑल इंडिया रेडिओ या केंद्रांसोबत जाहिरात प्रसारण, एफएम केंद्र आणि विदेशी प्रसारण केंद्राचेही संचालन करते.
चॅनल्सकडे आहे कार्यक्रमांचा खजिना, डिजिटाइझ केला जाणार
३२ वर्षे चाललेल्या ऑल इंडिया रेडिओच्या राष्ट्रीय केंद्राकडे कार्यक्रमांचा समृद्ध खजिना आहे. यात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, एन. राजमसारख्या संगीतज्ञांच्या रेकॉर्डिंग्ज आहेत. प्रसार भारतीने ३ जानेवारीला एक आदेश जारी करून राष्ट्रीय केंद्र व आकाशवाणीच्या सर्व महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना डिजिटाइझ करून ते जतन करण्यासाठी दिल्लीस्थित अर्काइव्ह सेंटरला पाठवण्यास सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.