आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आम आदमी' नेता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'मवाळ हिंदुत्वा'चा पुरस्कर्ता अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यास प्राधान्य देणारे भाजपचे, कदाचित देशातील पहिले राजकारणी ठरावेत ते गाेव्याचे मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकर. धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी राजकारणाला पसंती देणाऱ्या पर्रीकरांसमाेर राजकीय अस्थिरता आणि भ्रष्टाचाराच्या गर्तेत लाेटलेल्या गाेव्याला पूर्वपदावर आणण्याचे अाव्हान होते. लोकांचा पक्षावरील विश्वास उडाला तेव्हा त्यांनी जनतेत जीव ओतला. मध्यमवर्गीय आणि संरक्षित मतदारांची मने जिंकून ते या वर्गाचे हीरो ठरले. 


भाजपमध्ये मनाेहर पर्रीकरांना आव्हान देणारे कुणी नव्हते हा त्यांचा व्यक्तिविशेष ठरावा. गोवा विधानसभेत भाजपच्या तिकिटावर निवडून गेलेल्या पहिल्या ४ आमदारांपैकी मनाेहर पर्रीकर हे एक होते. त्यांचे साहसी व्यक्तिमत्त्व, अायअायटीचा गाठीशी असलेला अनुभव यामुळे त्यांची देशभर वेगळी छाप पडली. भाजपमधील कट्टरवाद्यांचा आवाज त्यांनी गोव्यात घुमू दिला नाही ही विशेषत्वाने नमूद करण्यासारखी बाब ठरावी. अति उजव्या विचारसरणीचा व्यक्ती अशी स्वत:ची प्रतिमा लाेकमनावर बिंबणार नाही याची पुरेपूर काळजी ते घेत. हे गोव्यातील भाजप आहे आणि इथे गोष्टी वेगळ्या पद्धतीने होतात,' असे ते नेहमी म्हणत असत. त्यामुळेच पर्रीकर एक असामान्य राजकारणी किंबहुना 'साेशिअो-पाॅलिटिकल इंजिनिअर' होते असेही म्हणता येईल. म्हणूनच बहुधा गाेव्याच्या राजकारणातील साऱ्या विसंगत प्रवृत्तींची माेट बांधण्याचे काम ते यशस्वीपणे करू शकले. मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी या युक्तीचा अवलंब करून पाहिला, परंतु सरकार गडगडले. ज्या लोकांना विश्वासाच्या बळावर पर्रीकरांनी स्वत:च्या पक्षात जागा दिली त्यांनीच एेनवेळी पाठ फिरवली. मात्र यामुळे ते कधी हताश झाले नाहीत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनाेहर पर्रीकर यांच्यात विश्वासू सहकारी पाहिला. म्हणूनच त्यांना दिल्लीचे निमंत्रण दिले. मात्र पर्रीकरांना तेथे उपऱ्यासारखे वाटत राहिले. संरक्षण मंत्रिपदावर बढती मिळाली, मात्र ते या जबाबदारीसाठी उत्सुक नव्हते. संरक्षणमंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांच्या कामाचे कौतुक जरूर झाले, मात्र दिल्लीच्या राजकारणाचा कठोर पिंड त्यांना मानवला नाही. म्हणूनच गोव्यात परतण्याची अायती संधी मिळताच त्यांनी कूच करणे पसंत केले. २०१७ मध्ये भाजपचा गोवा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरीही त्यांनी लोकांच्या मताविरुद्ध जात काही पक्षांसोबत आघाडी केली अाणि सरकार स्थापन केले. याच अाघाडीतल्या सर्व सहकारी पक्षांनी भाजपविरोधी प्रचार करून ही निवडणूक जिंकली होती. तरीही या मार्गाने सत्ता काबीज करण्यात ते यशस्वी झाले असले तरी केडर आणि साथीदार मात्र गमावले हाेते. अापल्या राजकीय कारकीर्दीत मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ मनाेहर पर्रीकर पूर्ण करू शकले नाहीत. त्यांच्या चारही कारकीर्दीतील हे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरावे. या वेळी मात्र प्रकृतीनेच त्यांना साथ दिली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते मुख्यमंत्रिपदी का होते, असा प्रश्न साहजिकच अनेकांना पडला असणार. त्यांची प्रकृती ढासळत असताना आयुष्यातले काही क्षण शांतपणे का व्यतीत करू दिले नसावेत? अशक्त, कृश अशा स्थितीत ते सार्वजनिक ठिकाणी का हजेरी लावत असत? सक्षम राजकीय वारसदाराकडे त्यांनी राज्याचा कारभार का सोपवला नसावा? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यापूर्वीच गाेवा भाजपची शकले झाली आणि नेमक्या याच वेळी मनाेहर पर्रीकर अनंताच्या प्रवासाला निघून गेले. 


मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक परिघावर मोठा परिणाम होणार हे निश्चित. आय.आय.टी उत्तीर्ण झालेले ते देशातील पहिले मुख्यमंत्री होते. प्रशासन आणि सुसंवादासाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय ठरावे. गाेवा भाजपकडे नेतृत्वाची दुसरी फळी नाही. केंद्रात भाजपचे सरकार आहे म्हणून गोव्यातील सरकार टिकले, अन्यथा कधीच गडगडले असते. एक मात्र खरे की, अागामी निवडणुकीत भाजपसमोर मोठ्या अडचणी निर्माण होणार हे मात्र स्पष्ट दिसते आहे. या निर्नायक स्थितीतून आणि पक्षांतर्गत कलहातून गोवा भाजप कशा पद्धतीने बाहेर पडतो याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. मनोहर पर्रीकरांच्या गूढ आजारपणामुळे गोवा सरकार आणि एकंदरच राज्यातील भाजपचेही आरोग्य बिघडलेले दिसते हे मात्र नक्की! 
 

बातम्या आणखी आहेत...