आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरेशी तयारी नसल्याने आम आदमी पक्ष यंदाही निवडणुकीपासून दूरच; केजरीवालांचा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ४८ जागा लढवलेला आम आदमी पक्ष (आप) आगामी लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवणार नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. राज्यात आपच्या नेतृत्वाची निवडणुकीसाठी विशेष तयारी नसल्याने पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. आम आदमी पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ उमेदवार दिले होते. त्यातील ४७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती, तर मतांचा वाटा अवघा २.२ टक्के होता. या अपयशामुळे आपने राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीतून पळ काढत एकही जागा लढवली नव्हती. दरम्यान, आपमधून राजकीय विश्लेषक व समाजवादी नेते योगेंद्र यादव (दिल्ली) बाहेर पडले. त्यांच्याबरोबर राज्यात लोकसभेचे उमेदवार राहिलेले सुभाष वारे, मेधा पाटकर, संजीव साने, ललित बाबर, सविता शिंदे, सुभाष लोमटे, अण्णासाहेब खंदारे या समाजवादी साथींनी पक्ष सोडला. त्यामुळे चिमुकला आप संपल्यात जमा होता. जानेवारी २०१८ मध्ये केजरीवाल यांनी काँग्रेसचे माजी खासदार व बहुजन चेहरा असलेले ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली. २८ व २९ डिसेंबर रोजी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणी झाली. त्यात राज्यातील १९ जागा लढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी स्वतंत्र विदर्भाचे नेते श्रीहरी अणे यांच्या विदर्भ राज्य आघाडीशी 'आप'ने आघाडी केली आहे, असे 'आप'चे राज्य अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले. 

 

३१ जानेवारीपर्यंत निर्णय होणार 
दिल्लीत कार्यकारिणीत पाच राज्यांतील लोकसभेच्या ३३ जागा लढवण्याचा निर्णय झाला आहे. इतर राज्यांतील जागांचा निर्णय त्या त्या राज्यांवर सोपवला आहे. आम्ही १६ जागांबाबत नेतृत्वाला कळवले आहे. ३१ जानेवारीपर्यंत निर्णय होईल, असे आपचे राज्य सेक्रेटरी उन्मेष बागवे यांनी सांगितले. 

 

२०१४ मधील एकही उमेदवार सध्या 'आप'सोबत नाही 
२०१४ मध्ये राज्यातील 'आप'चे बहुसंख्य नेते समाजवादी होते. त्यातील जवळपास सर्व योगेंद्र यादव यांच्या स्वराज्य इंडियाशी जोडले गेलेत. त्याचाही फटका 'आप'ला बसला आहे. २०१४ च्या निवडणुकीत ज्यांना 'आप'ने उमेदवारी दिली होती त्यातील कोणीही आज सोबत नाही. त्यामुळे २०१९ च्या लोकसभेला हा पक्ष कसा सामोरे जाणार हा प्रश्नच आहे. लोकसभा निवडणुका लढवल्या तर एकही जागा जिंकणे शक्य नाही, नाही लढवल्या तर उरलेसुरले कार्यकर्ते पळ काढतील, अशा कैचीत राज्य आपचे नेते आहेत. 

बातम्या आणखी आहेत...