आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी देशभरात किमान १०० जागा लढवणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आम आदमी पार्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात किमान १०० उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरेतील पंजाब, हरियाणा व दिल्लीतून उमेदवारांना उभे करण्यात येईल. तशी तयारी केली जात आहे, असे आपचे नेते संजय सिंह यांनी रविवारी सांगितले. 


२०१४ मध्ये पक्षाने सर्व जागी उमेदवार उभे केले होते. तेव्हा ४०० उमेदवार रिंगणात होते. परंतु सर्व जागा लढवण्याचा काहीही उपयोग होत नाही याची जाणीव पक्षाला झाली आहे. म्हणूनच यंदा आम्ही ८० ते १०० जागा लढवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अपेक्षित निकाल येऊ शकतील, अशी अपेक्षा सिंह यांनी व्यक्त केली. संजय सिंह हे पक्षाचे उत्तर प्रदेश तसेच बिहारचे राज्य प्रभारीदेखील आहेत. पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यांत पक्षाचा प्रभाव आहे. त्यामुळे २०१९ मध्ये पक्षाला जास्तीत जास्त जागी विजय मिळावा, असे प्रयत्न आपने सुरू केले आहेत. यंदाच्या निवडणुकीत पंजाबमधून आमचे चार खासदार निवडून येतील, असा दावा सिंह यांनी केला. हरियाणामधून खाते उघडण्याचा प्रयत्न आप करत आहे. 


हरियाणा हे केजरीवाल यांचे मूळ राज्य आहे. हरियाणातून जास्तीत जास्त आप उमेदवार विजय व्हावेत, असे पक्षाचे प्रयत्न आहेत. पक्षाचे नेते नवीन जयहिंद यांनी हरियाणात चांगली संघटनात्मक बांधणी केली आहे. त्यामुळे हरियाणात 'आप'ला सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या यशाची अपेक्षा आहे. गुजरातमधून काही उमेदवार उभे करण्याची तयारी 'आप'ने सुरू केली आहे. 


मध्य प्रदेश, यूपीतही काही ठिकाणी आजमावणार 
'आप' मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहारमध्ये काही ठिकाणी पक्षाला असलेला जनाधार आजमावून पाहणार आहे. त्यामुळेच या भागात आप काही उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले. उत्तर प्रदेशात आप १० ते १५ जागी निवडणूक लढवणार आहे. 


काँग्रेससोबत आघाडी करण्याची अफवा 
नवी दिल्ली तसेच पश्चिम दिल्ली भागासाठी काँग्रेस व आम आदमी पार्टीने अद्याप प्रभारींची नियुक्ती केली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांत आघाडी झाल्याची अफवा आहे. मात्र अद्याप त्याबाबत काही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे आपच्या सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...