पुणे- ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोनदा खासदारकी दिली आणि आता राज्यपालपदाची भेट दिली, त्या श्रीनिवास पाटील यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी असताना आणि पिंपरीचे आयुक्त असताना केलेल्या कामकाजाची तपासणी होणे गरजेचे आहे. तसेच नागपूरसह पुण्यात पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिलेल्या मुंबई पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन भाजपात डेरेदाखल झालेले डॉ. सत्यपालसिंह यांच्याही कारकिर्दीत झालेल्या कामकाजाची तपासणी झाली पाहिजे अशी भूमिका पुण्यातील आम आदमी पार्टीचे नेते मारुती भापकर यांनी घेतली आहे.
भापकर म्हणाले, सनदी अधिकार असलेले श्रीनिवास पाटील हे पूर्वीपासून पवार कुटुंबियांचे चाहते होते हे आता स्पष्ट झाले आहे, त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत काही भूखंडांचे वाटप किंवा अन्य काही वादग्रस्त निर्णय घेतले होते. आता त्या निर्णयाची तपासणी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. याशिवाय सत्यपाल सिंह हे देखील उजव्या विचारसरणीचे असल्याचेच स्पष्ट झाले आहे. नागपूर येथे पोलिस आयुक्तपदावर असताना त्यांचा भाजप आणि संघ परिवारासोबत राबता होता. पुढे सिंह यांच्या पुण्यातील कारकिर्दीत तत्कालीन गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनीही सिंह यांच्यावर जाहीर आरोप केले होते. बागवे यांच्या दलित नेत्याला तुच्छतेने वागणूक देण्यामागे सिंह यांची उजवी विचारसरणीच होती असे म्हणावे लागेल.
मुंबई पोलिस दलात आयुक्तपदी काम करीत असताना सिंह पोलिसांना मी 'खरा जिहाद' शिकवला आहे, अशी शेकी मिरवत असे. मुंबई पोलिस दलातही सिंह यांच्या या वक्तव्याची आजही चर्चा होते. त्यामुळेच उजव्या विचारसरणीला विरोध असणाऱ्या अन्य कोणावर सत्यपाल सिंह यांच्याकडून अन्याय झाला आहे काय? याबाबत चौकशी करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.
याचबरोबर सध्या प्रशासकीय सेवेत असलेले अनेक वरिष्ठ अधिकारी राजकीय नेत्यांच्या आणि राजकीय पक्षांच्या दावणीला बांधले गेले आहेत. यात फक्त सत्ताधारी पक्षाचाच समावेश नसून, विरोधी पक्षाशीही काही अधिका-यांचे घनिष्ठ संबंध आहेत. आजही अनेक अधिकारी विशिष्ट राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली कामे करीत आहेत. त्यांची स्वतंत्र नोंद घेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे मतही भापकर यांनी व्यक्त केले.