आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रूपेश कलंत्री
आरे वसाहत (मुंबई) - मेट्रो कारशेडसाठी पुढील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही आरे कॉलनी परिसरात बाहेरच्या लोकांना सोमवारी प्रवेश देण्यात आला नाही. एकीकडे मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, आपल्याच भागात जा-ये करण्यात येणाऱ्या अडचणी आणि भविष्यात आपल्या घरापर्यंत सरकार पोहोचेल याच्या भीतीने आदिवासींमध्ये आक्रोश दिसून आला. चार पायांच्या वाघाचा आम्हाला कधीच धोका वाटत नाही, पण जमिनी बळकावणारे दोन पायांचे हिंस्त्र पशू जास्त धोकादायक असल्याचा संताप आदिवासींनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाचा पर्यावरण प्रेमींना काहीसा दिलासा देणारा निर्णय सकाळी आला. त्यानंतर आरेतील जमावबंदी आणि प्रवेशबंदी उठवण्यात आली असावी असे सर्वांनाच वाटत होते. मात्र सर्वत्र पोलिस आणि नाकाबंदी. स्थानिकांनाच ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जात होता. मात्र दिव्य मराठीने फक्त प्रवेश मिळवला नाही तर खडकपाडा गाठले. आदिवासी कार्यकर्ते संतोष माळी, किसन साठे यांना गाठले. त्यांनाही बाहेरून आत येताना आमच्यासारखीच कसरत करावी लागल्याने ते त्रस्त होते. त्यात ऐन परीक्षेच्या दिवसांमध्ये होणारी फरफट शाळकरी मुलेही सांगत होती.
विशेष म्हणजे आपल्या गैरसोयीबरोबर वृक्षतोडीबाबत शिवानी यादव म्हणाली, “पडत्या पावसात आमच्या घरावर झाडाची फांदी अर्धवट तुटून पडली. बीएमसीकडे परवानगी मागितली तर बोलतात कायद्याने तोडता येणार नाही. मग मेट्रोवाल्यांनी इतकी झाडं तोडली. त्यांच्यासाठी आकाशातून कायदे पडले काय ? मेघना दाभाडेही आमच्याच जंगलात आम्हाला कशी बंदी घालता असा सवाल करते. संतोष काळेंचा संयम सुटतो. समोरच्या झाडावर पडलेले ओरखाडे दाखवत त्यांनी सांगितले, हे वाघाच्या नखाच्या खुणा आहे. झाडावर चढून कोंबड्या फस्त करतो. मात्र,त्याचं अन्न तो खातो, आम्हाला त्याची भीती नाही. जंगल हिरवा देव आहे. वाघ दैवत आहे. धोका या दोन पायांच्या पशूचा आहे.’तापलेल्या वातावरणात किसन साठे, शितल साठेही बोलत्या झाल्या. आदित्या ठाकरेंवर टीका करताना, हाती के दिखाने के दात और खाने के दात अलग होते है, असे म्हणतात. हळूहळू एनजीओचे सदस्य, लहान मुलेही गर्दी करतात आणि आता आम्ही थांबणार नाही हा निर्धार करतात. फडणविसांना जंगल दिसत नसेल तर त्यांनी एकदा इथं येऊन बघावं. मात्र आमच्या जमिनी हिसकावू नये, असा इशाराही देतात.
मेट्रोला विरोध नाही
टोकाचा विरोध सुरू असताना आमचा विकासाला, मेट्रोला विरोध नसल्याचे आदिवासींनी आवर्जून सांगितले. झाडे तोडू नका, आधी बळकावल्या तशा आता पुन्हा आमच्या जमिनी गिळू नका, हीच मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुखद धक्का :
इतका संताप, राग व्यक्त होत असताना कानी लेझीमचा आवाज आला. न्यायालयाच्या निकालामुळे आनंद व्यक्त होत असेल असे वाटले. पण टायनी मिरॅकल संस्थेकडून दसऱ्याच्या कार्यक्रमाची तयारी करून घेतली जात होती. थोड्या वेळापूर्वी पर्यावरणाविषयी बोलणारी मुले पदलालित्यात रमली होती. त्यांचा निरोप घेऊन वेस्टर्न हायवेकडून बाहेर पडलो तर विविध चॅनलच्या ओबी व्हॅन, पत्रकार आणि बोटावर मोजण्याइतके पर्यावरणप्रेमी आत कधी जाता येईल याची वाट पाहत होते. आत काय चालले आहे याची त्यांना काळजी होती. आणि त्याचे उत्तर आमच्याकडे होते. कापलेल्या झाडांचे अवशेषही कादाचित आता दिसणार नाहीत अशी कामे तेथे जेसीबीच्या मदतीने सुरू होती. आदिवासींमध्ये बाहेर चेकपोस्टवर एकच स्थिती होती, थोडीसी खुशी और बहोत गम...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.