आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी एकादशीला दिंड्यांतील वीणेकरी, टाळकऱ्यांनाच दर्शन पास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर  - वारकरी सांप्रदायातील महाकुंभ मेळा म्हणून आषाढी एकादशीचा सोहळा ओळखला जातो. हा अविस्मरणीय सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत मजल दरमजल करीत पंढरीत दाखल होत असतात. केवळ विठूरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या वारकरी भाविकांच्या भावना पायदळी तुडवत मंदिरात घुसखोरी करणाऱ्या तथाकथित व्हीआयपी तसेच सरकारी बाबूंना रोखण्यासाठी यंदा निमंत्रण पासची संख्या केवळ २१०० इतकी नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. 


दरम्यान, मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पासबाबत माहिती देताना मंदिराचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले की, गेल्या वर्षी इतकेच २१०० निमंत्रण पास यंदाही छापण्यात आले असून, पायी येणाऱ्या दिंड्या, पालख्यांमधील विणेकरी, टाळकऱ्यांनाच या निमंत्रण पत्रिका देण्यात येतात. प्रत्येक मानाच्या दिंडी प्रमुखांकडे या निमंत्रण पत्रिका सुपूर्द केल्या जातात, या शिवाय मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करणाऱ्यांना तसेच देणगीदारांना व शहराचे नगराध्यक्ष, नगरसेवक यांनाही निमंत्रणपत्रिका देण्यात येतात. 


मध्यंतरीच्या काळात मंदिर समितीकडून किती निमंत्रणपत्रिका छापल्या जातात, हे जाहीर केले जात नसत. मंदिर समितीकडून मोठ्या प्रमाणावर पास छापले जात होते. त्यामुळे वाटपामध्ये गैरप्रकार घडत असत. अनेक वेळा काही महाभागांनी मंदिर समितीच्या पासप्रमाणे हुबेहूब पास छापून दर्शनाचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे वारकरी आणि भाविकांनी स्वागत केले आहे. 


धनाढ्यांना पासची विक्री
काही मंडळींनी पासची धनाढ्य मंडळींना विक्री करून पैसे मिळवल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. मंदिराचे कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे सचिन ढोले यांनी गेल्या वर्षी हाती घेतली. त्या वेळेसपासून निमंत्रण पत्रिकांची संख्या जाहीर केली जात आहे. दरम्यान, व्हीआयपींच्या घुसखोरीवर मोठ्या प्रमाणावर आळा बसेल. 


अकरानंतर पासधारकांना दर्शनासाठी सोडणार
एकादशी दिवशी दर्शन घडावे म्हणून यात्रेत सहभागी झालेले सर्वसामान्य वारकरी अनेक तास पदस्पर्श दर्शन रांगेत उभे असतात. सकाळी नऊपासून पासधारकांना दर्शनाची वेळ दिलेली असते. त्यामुळे सर्वसामान्य भाविक दर्शन रांगेत विठ्ठल दर्शनाची आस लावून तसाच थांबलेला असतो. त्यामुळे यंदापासून एकादशी दिवशी सकाळी ११ नंतर पासधारकांना दर्शन देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...