आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटात दडवलेल्या सोन्यासाठी अपहरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई : विमानतळावरील सीमा शुल्क विभागाचे अधिकारी जेव्हा दोन महिला विमान प्रवाशांच्या पोटात लपवलेले सोने काढून घेण्यासाठी त्यांना एका रुग्णालयात घेऊन आले तेव्हा त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांच्याकडील संपूर्ण सोने काढून घेतल्यानंतर अपहरणकर्त्या टोळीने त्यांना शहरात सोडून दिले. चित्रपट स्टाइल ही घटना मंगळवारी चेन्नईत घडली. दोन्ही महिला प्रवासी जेव्हा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपला पासपोर्ट घेण्यास आल्या तेव्हा सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या दोघींना अटक करण्यात आली आहे.


विमानतळावरील सूत्रांनी सांगितले की, सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी संशयावरून फातिमा आणि टेरेसा या दोन महिलांची चौकशी केली. या दोन्ही महिला मंगळवारी सायंकाळी कोलंबोहून येथे आल्या होत्या. आपण सोन्याने भरलेल्या टॅब्लेट खाल्ल्या आहेत, असे या दोघींनी चौकशीदरम्यान मान्य केले. या महिलांना एनिमा देऊन त्यांच्या पोटातील सर्व सोने काढता यावे यासाठी अमृत त्रिपाठी आणि रेणुकुमारी या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना खासगी कारने एका खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यांची कार जेव्हा रुग्णालयाजवळ आली तेव्हा त्याच वेळी दुसऱ्या कारमधून आलेल्या अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. गुंडांनी अमृत यांना जखमी केले आणि दोन्ही महिला प्रवाशांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांच्या टोळीने चेन्नईतच एनिमा देऊन दोन्ही महिलांच्या पोटातून सोने काढल्यानंतर बुधवारी पहाटे त्यांना सोडून दिले. त्यानंतर दोन्ही महिला आपला पासपोर्ट घेण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आल्या. तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दोन्ही महिला प्रवाशांच्या अपहरणाची चौकशी सुरू केली आहे व अपहरणकर्त्या टोळीला शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय कारवाई सुरू
सोने काढण्यासाठी दोन्ही महिला प्रवाशांना सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी खासगी रुग्णालयात नेल्याबद्दल सीमा शुल्क विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय कारवाई सुरू केली आहे.