आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमासाठी युवतीचे अपहरण, मुलीचे मित्रासमवेतचे फोटो कुटुंबीयांना दाखविण्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एका सोळा वर्षीय मुलीस तिच्या मित्रासोबत असलेले फोटो कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देत तिला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी तगादा लावत तिचे अपहरण केल्याचा प्रकार सोमवारी (दि. २४) गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात उघडकीस आला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संशयितास जेरबंद करून अवघ्या चार तासांत मुलीची सुखरूप सुटका केली. 


पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगी गंगापूरराेडवरील एका महाविद्यालयात अकरावीला शिक्षण घेते. सकाळी ती कॉलेजला गेली. सायंकाळी ती घरी आली नाही. तिच्या वडिलांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी इसमाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखत वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी सहायक निरीक्षक सारिका अहिरराव यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या. अहिरराव यांनी संशयित दिनेश सुरेंद्र सिंग (२८, रा. एमएचबी कॉलनी, अशोकनगर, सातपूर) यास चौकशीसाठी बोलावले. 


पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याने संशयिताने पीडितेला गंगापूररोडवरील एका स्वीटच्या दुकानासमोर सोडून दिले व ताे पाेलिस ठाण्यात दाखल झाला. पाेलिसांना व पीडित मुलीच्या कुटुंबीयांना संशयिताने त्याच्या लॅपटॉपमधील पीडितेचे व तिच्या मित्राचे फोटो दाखवले. त्यानेच तिचे अपहरण केले असावे असा बनाव रचत पोलिसांसह कुटुंबियांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने मुलीचे अपहरण केल्याची कबुली देत तिला सातपूर येथील फ्लॅटवर ठेवल्याची कबुली दिली. याच वेळी पीडितेचा तिच्या वडीलांना फोन आला. पीडिता गंगापुररोड येथे असल्याचे सांगितले. 


पथकाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत या मुलीला ताब्यात घेत तिला कुटुंबियांच्या ताब्यात दिले. तिची विचारपूस केली असता संशयिताने कॉलेजमध्ये येऊन 'तुझे फोटो वडिलांना दाखवतो' अशी धमकी देत 'तू माझ्या सोबत प्रेमसंबंध ठेव' असा दम देत बळजबरीने दुचाकीवर बसवत त्याच्या फ्लॅटवर नेत विनयभंग केल्याचे पीडितेने सांगितले. संशयिताला अटक करुन त्याच्या विरोधात पाेलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 


संशयिताचा जबाबात विसंगती 
संशयिताला चौकशीसाठी बोलावल्यानंतर तो तत्काळ पोलिस ठाण्यात आला. चौकशी केली असता त्याच्या जबाबामध्ये विसंगती आढळली. त्यानेच मुलीला ब्लॅकमेल करत प्रेमसंबध ठेवण्यासाठी अपहरण केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. मुलीस कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
- सारिका अहिरराव, सहायक निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे 

बातम्या आणखी आहेत...