बनावट स्टँप घोटाळ्यातील / बनावट स्टँप घोटाळ्यातील 7 आरपीएफ अधिकारी निर्दोष मुक्त, 49 साक्षीदारांची साक्ष व CBI पुरावे देण्यास ठरली असमर्थ

Dec 31,2018 07:55:00 PM IST

नाशिक- संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या देशातील सर्वात मोठा तब्बल 32 हजार कोटी रुपयांच्या बनावट स्टँप घोटाळ्यातील मुख्य आरोपी मयत अब्दुल करीम तेलगी आणि एसआरपीएफचे सात कर्मचाऱ्यांवर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात तेलगी वगळता सात कर्मचाऱ्यांना न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी मुक्त केले. तब्बल अठरा वर्षे सुरु असलेल्या या खटल्यात 49 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार आणि सीबीआयचे प्रभारी तपासी अधिकारी पुरावे सिद्ध करु न शकल्याने प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.आर. देशमुख यांनी सोमवार (दि.31) सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून होते.

देशातील बहुचर्चित तेलगी घोटाळा म्हणून ओळख असलेला स्टॅम्प घोटाळ्याचा निकाल नविन वर्षाच्या पुर्व संध्येला न्यायालयाने हा निकाल लागला. इंडिया सिक्युरीटी प्रेसमधून रेल्वेच्या वँगनमधून कोट्यवधी रुपयांचे स्टॅम्प गायब करण्यात आले होते. अब्दुल करीम तेलगी यानं आरपीएफ अधिकाऱ्यांच्या मदतीने ३२ हजारांचा स्टॅम्प घोटाळा केल्याचा आरोप होता. मात्र हेच आरोप सिद्ध करण्यास सीबीआयला अपयश आल्याने या खटल्यातील सातही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अँड. एम.वाय काळे, अँड. अक्षय बंकापूर, अँड. अतुल कर्डिले, अँड. मयूर काळे, अँड. भावेश सैंदाणविसे यांनी कामकाज पाहिले. मुरली पगारे यांनी पाठपुरावा केला. सीबीआय कडून अँड. आर. आर. भटनागर यांनी युक्तीवाद केला.

असा होता खटला
25 ऑगस्ट 2014 रोजी सीबीआय ने अब्दुल करीम तेलगी याच्यासोबत एसआरपीएफचे रामभाऊ पुंजाराम पवार (रा. करंजगाव निफाड), बिरजी किशोर तिवारी (रा. जगताप मळा, नाशिकरोड), विलासचंद्र राजाराम जोशी (रा. मुलुंड), प्रमोद श्रीराम ढाके (रा. नवी मुंबई), मोहम्मद सरवार (रा. मनमाड), विलास जनार्दन मोरे (रा. उपनगर), आणि ज्ञानदेव रामू वारके (रा. यावल, जळगाव) यांच्या विरोधात 25 ऑ'गस्ट 2004 मध्ये न्यायलयात दोषारोपपत्र सादर केले होते. 5 फेब्रुवारी 2015 मध्ये संशयितांवर आरोप निश्चित झाले. या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर आयुक्त दर्जाचे आणि उच्च दर्जाचे सात अधिकारी निलंबित करण्यात आले होते.

मुख्य आरोपी तेलगीचा मृत्यू
या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार तेलगी चा 2017 मध्ये शिक्षा भोगत असतांना आजारी पडला. बंगळूर येथे व्हिक्टोरीया हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला. यानंतर अब्दुल करीम तेलगीची पत्नी शाहिदा हिने विशेष न्यायालयाकडे अर्ज करुन तेलगीची मालमत्ता सरकार जमा करण्याचा अर्ज दिला होता. यामध्ये तेलगीची पत्नीला देखील स्टॅम्प घोटाळा प्रकरणात आरोपी केले होते. काही दिवसांनी न्यायालयाने तीची जामिनावर मुक्तता केली होती.

काय होते प्रकरण?
इंडिया सिक्युरीटी प्रेसमधून कोट्यवधींचे स्टॅम्प रेल्वे वँगनमधून गायब करण्यात आले होते. ३२ हजार कोटींचा हा घोटाळा तेलगीने आरपीएफ अधिकाऱ्यांच्या मदतीने केला होता. भंगार बाजारातून स्क्रँप मशिन विकत घेत यावर करोडो रुपयांचे बनावट स्टॅम्प छापून ते खऱ्या स्टॅम्प प्रमाणे विक्री करत देशाच्या मुद्रांकाला खिंडार पाडले होते. याप्रकरणात तत्कालीन गृह मंत्री, आमदारांसह राजकीय नेत्यांचे नावे समोर आले होते.

स्टॅम्प चोरी सिद्ध नाही
न्यायालयापुढे जे पुरावे आले. जे कागदपत्र सादर केले ते दोन्ही एकत्र पाहिले असता आरोपींच्या विरोधात गुन्हा सिद्ध होईल असा एकही पुरावा प्रभारी तपासी अधिकारी देऊ शकले नाही. ४९ साक्षी दारा ज्या मध्ये मुख्य साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना कागदपत्राच्या आधारे सिद्ध करता आले नसल्याचे न्यायालयात प्रभावी युक्तीवाद केला. न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
- अँड. एम.वाय काळे आरोपींचे वकील

कोण होता तेलगी?
अब्दुल करीम तेलगी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोडवरील रहिवाशी, तेलगीचे वडील तो लहान निधन झाले. आई भाजीपाला विक्री करून त्याला शिक्षण दिले. तेलगी सात वर्ष सौदी मध्ये होता. नंतर भारतात आला. बनावट सरकारी कागदपत्रे बनवण्यास सुरवात केली. देशात स्टॅम्प पेपरला फार महत्व असल्याने त्याने स्टॅम्प बनवण्यास सुरवात केली. त्यावेळी सुमारे चारशे एजंट कामाला होते. याच एजंट मार्फत बँका, विमा कंपनी, आणि स्टॉक ब्रोकरेज फार्म,मोठे उद्योगपती यांना विक्री केले. याप्रकरणात बड्या राजकीय नेत्यांचे नावे आली होती.

X