खेलाे इंडिया / नंदुरबारच्या अभय गुरवने जिंकले सुवर्णपदक; पूर्वाची सुवर्ण झेप; पूजा, मधुरा वायकर ठरली चॅम्पियन

हॉलीबॉल : महाराष्ट्राच्या महिला संघाचे आव्हान संपुष्टात

प्रतिनिधी

Jan 13,2020 09:39:00 AM IST

गुवाहाटी : महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी तिसऱ्या सत्रातील खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये साेनेरी यशाचा पल्ला गाठण्याची लय चाैथ्या दिवशीही कायम ठेवली. महाराष्ट्राच्या युवा धावपटू अभय गुरव, पूर्वा सावंत, सायकलपटू मधुरा धारकर आणि पूजा दानाेळेने आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली. यासह महाराष्ट्राच्या संघाला पदक तालिकेतील आपला दबदबा कायम ठेवता आला. महाराष्ट्राच्या कबड्डी संघानेही स्पर्धेतील आव्हान कायम ठेवताना आगेकूच केली आहे.


महाराष्ट्राच्या अभय गुरव व पूर्वा सावंत यांनी अनुक्रमे उंच उडी (२१ वर्षांखालील मुले) व तिहेरी उडी (१७ वर्षांखालील मुली) या प्रकारात सोनेरी झेप घेत शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राच्या आकाश सिंग याने १७ वर्षांखालील मुलांमध्ये १०० मीटर्स धावण्यात रौप्यपदक मिळविले, तर कीर्ती भोईटे हिने २१ वर्षांखालील मुलींमध्ये १०० मीटर्स धावण्यात कांस्यपदकाची कमाई केली.


अभयची विक्रमाशी बराेबरी


अभयने उंच उडीत २.०७ मीटर्स अशी कामगिरी करीत स्पर्धा विक्रमाची बरोबरी केली. गतवर्षी हरियाणाच्या गुरजितसिंगने पुण्यात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता. अभयने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले. गतवर्षी त्याला दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते. तो मूळचा चोपडा येथील रहिवासी असून सध्या तो नंदुरबार येथे मयूर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याने कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.


महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील संघाने तिस-या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी उत्तर प्रदेशाचे आव्हान ३८-२० असे सहज संपुष्टात आणले. अन्य एका उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलांना मात्र स्पर्धेत वर्चस्व राखल्यानंतरही अखेरीस राजस्थानकडून ५१-५५ असा पराभव पत्करावा लागला.


हॉलीबॉल : महाराष्ट्राच्या महिला संघाचे आव्हान संपुष्टात


महाराष्ट्राच्या महिला संघाचे हॉलीबॉलमध्ये रविवारी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. संघाला सामन्यात पश्चिम बंगाल संघाकडून पराभव पत्करावा लागला. पश्चिम बंगालने १८-२५, १०-२५, १४-२५ असा सरळ तीन सेट्समध्ये सामना जिंकला. या पराभवामुळे महाराष्ट्राच्या बाद फेरी गाठण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. या सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंना उंचीचा फायदा घेता आला नाही. तसेच बचावात्मक तंत्र व सांघिक समन्वय यामध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेल्या चुका पश्चिम बंगालच्या पथ्यावर पडल्या. त्या तुलनेत बंगालच्या खेळाडूंनी जोरदार स्मॅशिंग व अचूक प्लेसिंगचा सुरेख खेळ केला.
महाराष्ट्राच्या संघाने पटकावले सायकलिंगमध्ये दाेन सुवर्ण


सायकलिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी सुवर्णपदकाने सुरवात केली. कोल्हापूरच्या पूजा दानोळे हिने १७, तर मुंबईच्या मधुरा वायकर हिने २१ वर्षांखालील गटात अनुक्रमे १५ आणि २० कि.मी. रोड रेस शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. यासह महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी या खेळ प्रकारात आपला दबदबा कायम ठेवला आहे.


गुवाहाटीपासून जवळपास ४० कि.मी. दूर असलेल्या सोनापूर हम रस्त्यावर ही शर्यत पार पडली. महाराष्ट्राचे सायकलपटू छाप पाडणार असा विश्वास सुरुवातीलाच प्रशिक्षक दीपाली पाटील यांनी व्यक्त केला होता. तो त्यांच्या खेळाडूंनी सार्थ ठरवला. मुलांमध्ये अपयश आले असले, तरी मुलींनी त्याची भरपाई केली.


सर्व प्रथम मधुराने २० कि.मी. अंतराची शर्यत ३० मिनिटे ३६ सेकंद अशी वेळ देत जिंकली. या वेळी तिचा सायकलिंगचा वेग तब्बल ताशी ३९ प्रति कि. मी. इतका होता. तिने कर्नाटकाच्या मेघा गुगड (३१ मि. ०५ सेकंद), सौम्या अंतापूर (३१ मि.३३ सेकंद) यांना मागे टाकले.


मुलींच्या १७ वर्षांखालील अशी सोनेरी कामगिरी इचलकरंजीच्या पूजा दानोळे हिने केली. या दरम्यान तिने १० कि.मी. अंतर ताशी ३७ कि.मी. वेगाने २४ मिनिटे १८ सेकंद वेळेत पार केले.या अटीतटीच्या शर्यतीत तिने दिल्लीच्या लिआक्रेस एंजनो (दिल्ली), रीत कपूर (चंडिगड) या दोघींना मागे टाकले. एंजनो २४ मि.५९ सेकंद वेळेसह रौप्य, तर रीत २५.१८ सेकंद वेळेसह कांस्यपदकाची मानकरी ठरली.

X
COMMENT