Home | Magazine | Rasik | abhijeet deshpande's article on Woman in the house

.... तोचि दिवाळी दसरा

प्रा. अभिजित देशपांडे | Update - Nov 11, 2018, 07:05 AM IST

दैनंदिन रहाटगाडग्यात काहीशी मागे पडलेली घराची आवराआवर करून त्याची नव्याने नेटकी टापटीप व सजावट होऊ लागते.

 • abhijeet deshpande's article on Woman in the house

  सण म्हटला, की घरातली स्त्री दररोजच्यापेक्षा काहीशी अधिकच स्वयंपाकघरात गुंतून पडते. फराळापासून ते दोन्ही वेळची साग्रसंगीत जेवणे, शिवाय पाहुणे-येणारे जाणारे-नातेवाईक, रितीभाती, घराची अधिकची टापटीप... हे तर परंपरेने आपण स्त्रीचेच कर्तव्यक्षेत्र मानले आहे, नाही का? आणि नेहमीपेक्षा जास्त राबूनही, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना पुरे पडत, त्यांचे विविध मूड सांभाळत, परंपरा सांभाळत... सर्वांत जास्त आनंदी- उत्साही- हसतमुख तिनेच राहायचे. म्हणजे, सर्वार्थाने या आनंदाचे ओझे कुणावर? - तर घरातल्या बाईवरच...का? कशासाठी?

  सणासुदीचा मोसम आला, की घराघरांतून चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण फुलू लागते. दैनंदिन रहाटगाडग्यात काहीशी मागे पडलेली घराची आवराआवर करून त्याची नव्याने नेटकी टापटीप व सजावट होऊ लागते. आवर्जून नव्या वस्तूंची खरेदी करीत नवीन कपडे आणि गोडाधोडाने उत्सवाचा माहोल निर्माण करायचा रितीरिवाज आपण परंपरेने इमानेइतबारे नेटाने पाळत राहतो. पण या आनंदाचे-उत्सवाचे सगळ्यात जास्त ओझे कुणाच्या खांद्यावर येऊन पडते ? - तर घरातल्या बाईच्या.


  मुळात, आपले धार्मिक रितीरिवाज, परंपरा आणि एकूणच समाजव्यवस्था व त्या अनुषंगाने आपली कुटुंबव्यवस्था- अत्यंत जाचक पुरूषी आहे. याची परीक्षा करायची तर आपण आपल्या नियमित जगण्यातले काही साधे प्रश्न स्वत:लाच विचारून पाहू. घरातल्या लगबग कामांची पहाट कोण सुरू करतो ? घरातला पुरूष की बाई ? साधा चहा-पण तोही आयता गरमागरम आणि तोही घरातल्या कुणा पुरूषाने (वडील, नवरा, भाऊ, मुलगा, दीर... कुणीही...) केलेला - असा किती जणींच्या वाट्याला येतो? सकाळी सकाळी आयती हातात मिळालेली न्याहारी करीत चहाचे घोट घेत ताजं वर्तमानपत्र चाळावं, वाचावं-असं बाईला नसेल वाटत? सर्वांच्या गरजा –इच्छा आणि वेळा सांभाळत घरातलं अन्नछत्र आयुष्यभर तेही विनामोबदला आणि अथकपणे चालवणं- ही जबाबदारी फक्त बाईचीच का? आणि तिच्या या कर्तृत्वक्षेत्रासाठी किती आणि कितीवेळा कौतुकाचे शब्द तिच्या वाट्याला येतात? घरातल्या लहानमुलांची संगोपनाची सर्वतोपरी तोडीस तोड जबाबदारी आईइतकीच बापाची अथवा घरातल्या कुठल्याही पुरूषाची नसतेच का? “कितीही शिकलीस सवरलीस तरी पोरीच्या जातीला घरकाम चुकत नाही...सासरी तरी हे करावंच लागणार...”, म्हणून मुलीला गृहकृत्यदक्ष राहायला शिकवणारे आईबाप आपल्या मुलग्यांना घरकामासाठी किती तयार करतात? घरातली कोणती आणि किती कामं पुरूषांना आवश्यक मानली जातात? अशी किती कामं पुरूष आनंदाने नि जबाबदारी म्हणून स्वत:हून करतात?


  अजूनही लहान मुलाच्या हातात कौतुकाने खेळण्यातली कार, बॅटबॉल वा मोबाइल गेम्स सोपविणारे आपण सुशिक्षित मुलींच्या हातात मात्र नेमकी बाहुली आणि भातुकलीची खेळणीच कशी काय ठेवतो? लुटुपुटुच्या खेळातसुद्धा मुलींना आपण संसारच का बरं करायला लावतो? क्रिकेट, फुटबॉल... असे मैदानी खेळ मुलींचे नसतातच असे आपण गृहीत धरले आहे का? आपल्या लेखी, घराचं अंगण असो की शाळा-महाविद्यालये-नगरांची खुली मैदाने मुलींसाठी अजूनही का बरे खुली झाली नाहीत? तिथे युगानुयुगे मुलांचाच कब्जा का असतो? घराच्या छोट्या मोठ्या निर्णयांमध्ये - जसे की, घराला रंग कोणता द्यायचा इथपासून ते घराची खरेदी विक्री वा तत्सम घरातले कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना, या प्रक्रियेत घरातल्या बाईल्या कितपत सहभागी करून घेतले जाते? का नाही सहभागी करून घेतले जात? बाईला निर्णय घेता येत नाही (असा पुरूषांचा समज आहे) म्हणून की त्यांतून पुरूषसत्ता डळमळीत होण्याची भीती पुरूषाला वाटते म्हणून? बाई जर एवढे घर सांभाळते, नोकरी-व्यवसाय करणारी असली तरी, मग तरीही बाईला कुटुंबप्रमुख म्हणून स्थान का नाही? कुटुंबप्रमुख असणं - हे कर्तेपणावरून ठरावं की स्त्री-पुरूष असण्यावरून? घराच्या अर्थकारणात-आर्थिक प्रक्रिया व निर्णयांत बाईला कितपत सहभागी करून घेतलं जातं?


  कर्तबगार बाईला ऑफिसमध्ये स्वाभाविक कर्तृत्वाला वाव मिळत सहजपणे पदाच्या यशाच्या सन्मानाच्या सहज पायऱ्या चढता येतात, की तिथेही बाईला पुरूषी अडथळे पार करीतच पुढे जावे लागते? ऑफिसमध्ये बाई बॉस असलीच, तर मग ती का बरे पुरूष कर्मचाऱ्यांना डाचू लागते? बॉस असणं ही काय जन्मजात पुरूषी मालकीची बाब आहे का? बाहेरच्या जगात कर्तृत्वाची शिखरं पार करणाऱ्या बाईला घरीतील जबाबदाऱ्या चुकल्या आहेत का? निदान आजारपणात तरी बाईला पुरूषाच्या तुलनेत पुरेशी विश्रांती,योग्य ती देखभाल किती घरांतून मिळते? बाई कितीतरी बाबतीत दुबळी असते - हे पुरूषी व्यवस्थेचे सोयीचे लाडके मत आहे की पुरूषी व्यवस्थेनेच तिला तशी दुबळी ठेवली आहे? पुरूषाला जशी कार्यालयीन कामात हक्काची आठवड्याची सुट्टी आणि शिवाय इतरही काही भरपगारी रजा मिळतात, तसे बाईला घरकामांतून - बैलाला बैलपोळ्याला मिळते तितकी तरी- काही विशेष रजा, कामांतून सुट्टी मिळते का? का मिळत नाही? का मिळू नये? बाई शरीराने-मनाने थकत नसेल का? घरातले देवधर्म असोत की उपासतापास त्याचेही ओझे जास्त बाईवरच का येते?


  असे दर पावलांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, दृश्य-अदृश्य बंधनांनी जखडलेले आयुष्य बाईच्या वाट्याला येते, ही वस्तुस्थिती नाकारताच येणार नाही. तरीही पुरूष तर या व्यवस्थेचे समर्थन करतात, कारण ते त्यांच्या हिताचेच असते. पण स्त्रियादेखील ‘ बाईचं जगणं हे असंच कष्टाचं असतं’ (जणू काही हा स्वाभाविक नियमच आहे.) अशी भाषा करू लागतात, तसं वागू - जगू लागतात, तेव्हा त्याचा अर्थ परंपरा-रूढी या नावाने त्या पुरूषी व्यवस्थेचा बळीच ठरलेल्या असतात. पुरूषीव्यवस्था आपल्या सोयीसाठी त्यांना वापरून घेत असते आणि हे त्यांना कळतदेखील नाही. ‘पुरूष हा आपला स्वामी आणि कुटुंब हेच आपलं सर्वस्व’ मानून राबणारी स्त्री आपल्या व्यक्तिमत्त्वातील क्षमतांचा विकास कसा बरं करू शकेल? आणि जे जगणं फक्त कर्तव्याने - जबाबदारीच्या ओझ्याने जखडलेलं असतं, तिथे स्वाभाविक क्षमतांच्या विकासांना संधीही मिळत नाही. किंबहुना, अशी संधी बाईला मिळूच नये, अशी सोयच केलेली असल्याने, ते जगणं आनंदी-उल्हसित कसं असू शकेल? स्त्रियांवर होणारा हा व्यवस्थात्मक अन्याय परंपरेच्या नावाखाली जवळपास सर्वच जाती धर्म प्रांत भाषांत पाहायला मिळतो.


  कुटुंब ही एक व्यवस्था आहे. स्त्री - पुरूष सहसंबंधातून ती आकाराला येते. हे सहजीवन जर समता- सहभाव-सहकार्य यांवर आधारित असेल, तर ते नाते अधिक अर्थपूर्ण तर असेलच पण ते कुटुंबही मानसिकदृष्ट्या सुदृढ असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या मग वय-गुण-क्षमता-कर्तृत्व यांनुसार न्याय्य पद्धतीने वाटल्या जातील. या सहजीवनात कष्टही दोघांचे-दु:खही दोघांचे- आनंदही दोघांचा. तरच खऱ्या अर्थाने कुटुंबही निर्मळ आनंदी राहील. शिक्षणातून पारंपरिक व्यवस्थेला प्रसंगी प्रश्न विचारणारी स्त्री जशी निर्माण होणे गरजेचे आहे, तसा स्त्रीला समजून-उमजून घेणारा, तिला खऱ्या अर्थाने साथ देणारा पुरूषही घडायला हवा. सहजीवातून सहविकास आणि सहविकासातून सहआनंद हेच प्रगल्भ कुटुंबाचे सूत्र असले पाहिजे. आणि हे सूत्र प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आता पुरूषालाच उचलावी लागेल. कुटुंबव्यवस्थेतील स्त्रीवरचा भार हलका करावा लागेल. बरोबरीने घ्यावा लागेल. तिचे कष्ट समजून घ्यायचे तर तर तिचे कष्ट समजून घेऊन ते वाटून घ्यावे लागतील.

  स्त्रीने आजवरचे हे ओझे निमूटपणे पेलले आहे, तेव्हा पुरूषालाही कुरकुर न करता या कर्तव्याला सामोरे जावे लागेल. लक्ष्मी-सरस्वती-दुर्गा पुजायच्या असतील तर घरातल्या बाईला आधी घराचे अर्थकारण-ज्ञान आणि सत्ता यांत सामावून घ्यावे लागेल. घरातल्या बाईची जेव्हा लक्ष्मी-सरस्वती-दुर्गा म्हणून सन्मानाने प्रतिष्ठापना केली जाईल, तोच खरा कुटुंबाचा दिवाळी-दसरा असेल.

  - प्रा. अभिजित देशपांडे

  abhimedh@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ९८१९५७४०५०

Trending