आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजित, बाला, सागर विजयी; औरंगाबादचा अरबाज पराभूत, जालन्याचा विलास डाेइफाेडे ठरला अपयशी; माती विभागात झाला पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटातील तिसऱ्या फेरीत युवा आंतरराष्ट्रीय मल्ल अभिजित कटके, गत महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख, सागर बिराजदार, अंकित गुंडने प्रतिस्पर्ध्यावर मात करत आगेकूच केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलावर झालेल्या स्पर्धेत केसरीच्या माती गटात बुलडाण्याच्या बाला रफिकने वर्धाच्या उमेश शिसोडेला चितपट केले. या थोडक्यात झालेल्या मात्र रोमांचक सामन्यात उमेशने सुरुवात आक्रमक करत बालावर एकेरी पट काढण्याचा जबरदस्त प्रयत्न केला. धूर्त बालाने त्याची पकड सोडवत स्वत:चा दुहेरी पट टाकत त्याला चिटपट करत सामन्यात बाजी मारली. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरच्या संग्राम पाटीलने वाशीमच्या सुनील शेवतकरला शानदार लढतीत २-१ गुणांनी हरवले.

विलासचे स्वप्न भंगले

केसरी स्पर्धेत गेल्या तीन वर्षांपासून जालन्याचे अाशास्थान असलेल्या विलास डोईफेडेने यंदाही निराश केले. तिसऱ्या फेरीत त्याला पुणे शहरच्या तानाजी झुंजुरकेकडून चितपटने पराभूत व्हावे लागले. सामन्यात सुरुवातीला विलासने २-० ने आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर विलासचा खेळ मंदावला.

येलभरने समीरला हरवले

गादीच्या केसरी गटात माजी उपमहाराष्ट्र केसरी मुंबई उपनगरच्या सचिन येलभरने कोल्हापूरच्या समीर देसाईला हरवले. हा रोमांचक सामना पाहायला मिळाला. समीर चुकीचा खेळत असल्याने त्याचा नकारात्मक गुण सचिनला मिळाला. त्यानंतर देसाईने एकेरी पटवर एक गुण वसूल करत १-१ ने बरोबरी साधली. विश्रांतीनंतर आक्रमक होत सचिनने एकेरी पटवर चार गुणांची कमाई करत लढत जिंकली.

युवा आदर्श गुंड विजयी

केसरी गटात पहिल्यांदा उतरलेल्या युवा मल्ल आदर्श गुंडने अवघ्या २३ सेकंदात तिसरा सामना जिंकला. आदर्शने रायगडच्या कुलदीप पाटीलला सलग ३ भारंदाज डाव मारत विजय साकारला. गादीच्या केसरीत लातूरच्या सागर बिराजदारला अमरावतीच्या गुलाब आगरकरने विजयासाठी झुंजवले. सामन्यात सागरने ४-१ ने विजय मिळवला. त्याल एक एक गुण घेण्यासाठी कसरत करावी लागली. गुलाबने आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत सागरला रोखून धरले होते. पहिला गुण गुलाबने घेतला. त्यानंतर सर्व गुण सागरने घेत सामना ४-१ ने आपल्या खात्यात जमा केला.

सिकंदरची जबरदस्त खेळी

मूळ सोलापूरचा असलेला आणि वाशीमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिकंदरने जबरदस्त ढाक मारत सर्व प्रेक्षकांना एकच जल्लोषाची संधी दिली. त्याने सामन्यात अहमदनगरच्या सागर मोहोळकरला ८-० ने पराभूत केले. तो किताबाच्या शर्यतीत उतरु शकतो.

अरबाज शेख पराभूत

गादीच्या ९२ किलो वजन गटात औरंगाबादच्या अरबाज शेखला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला पुणे शहरच्या प्रसाद सत्सेने एकतर्फी लढतीत ८-० गुणांनी नमवले. अरबाज सामन्यात गुण मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.

अभिजितने सोलापूरच्या मल्लाला हरवले

आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित कटकेने केसरी गटात सोलापूरच्या योगेश पवारला ४-० ने पराभूत करत पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यात विजयासाठी अभिजितला पूर्ण वेळ खेळावे लागले. पहिल्या एकेरी पटवर त्याने २ गुण आणि त्यानंतर एक-एक गुण घेत बाजी मारली.

 

बातम्या आणखी आहेत...