आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘साबू’ ते "चाचा चौधरी’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटमधील एन्साक्लोपीडिया असलेला धोनी भारतीय संघाचा चाचा चौधरी आहे. २००७ पर्यंत धोनीला चाचा चौधरी न समजता ‘साबू' समजायचे, आपल्या जबरदस्त ताकदीने तो मोठमोठे फटके हाणायचा.  २००७ नंतर संघाचं कर्णधारपद मिळाल्यावर धोनीमध्ये पूर्वीपासूनच असलेल्या चाचा चौधरीचं जगाला दर्शन झालं. आता तर या सुपर कम्प्युटर से तेज चलनेवाला दिमाग असलेल्या धोनी चाचांचं वर्ल्डकप २०१९ मध्ये खूप महत्त्वाचं योगदान असणार याबाबत शंका नाही.

 

अनेक युद्ध खेळलेला, प्रॅक्टिकल अनुभव असलेला, युद्धनीती समजणारा, युद्धनीती कोळून प्यायलेला जसा एखादा सेनापती असतो, जो वयोमानानुसार तितका प्रत्यक्ष युद्ध द्वंद्वात प्रभावशाली राहिलेला नसतो पण अनुभवांचे अतिमहत्त्वाचे बोल सांगून स्वतःचे महत्त्वपूर्ण योगदान देत राहतो असा सध्या महेंद्रसिंग धोनी आहे.

 

वर्ल्डकप हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण... हा क्षण एकदा तरी अनुभवणे हे प्रत्येक खेळाडूंचे स्वप्न... ‘पोस्ट वर्ल्डकप' म्हणजे वर्ल्डकपनंतर खूप काही घटना घडतात. अनेक मोठे खेळाडू वर्ल्डकपनंतर निवृत्त होतात. काही काळासाठी एक प्रकारची पोकळी निर्माण होते. महेंद्रसिंह धोनी आपला चौथा आणि शेवटचा वर्ल्डकप खेळायला इंग्लंड आणि वेल्सच्या भूमीवर पोहोचलाय.


२००३ च्या वर्ल्डकपमध्ये निवड न होऊ शकलेला महेंद्रसिंह धोनी २००७ च्या वेस्ट इंडीजमधील वर्ल्डकप संघात एक प्रमुख खेळाडू बनला होता. तरुण असलेला पण नवोदित नसलेला धोनी तोवर आपल्या कामगिरीने सर्व भारतीयांचा लाडका झाला होता. २००७ च्या वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, युवराज सिंग आदी प्रमुख खेळाडू होते. धोनी अगदीच तरुण असल्याने संघ बैठकीत इतर सीनियर खेळाडू सल्लागार भूमिकेत असत. धोनी मोकळेपणाने हेलिकॉप्टर शॉट्स आणि आपल्या अपारंपरिक खेळात मश्गुल असायचा. २०११ च्या वर्ल्डकपमध्ये धोनी स्वतः परिपक्व खेळाडू आणि कर्णधार असल्याने बैठकीचा, सल्लामसलतीचा तो केंद्रबिंदू होता. तीच परिस्थिती २०१५ च्या वर्ल्डकपची. परंतु इंग्लंडमध्ये या महिन्यापासून सुरू होणारा वर्ल्डकप महेंद्रसिंह धोनीसाठी महत्त्वाचा तर ठरणारच आहे, परंतु त्यात भारतीय संघासाठीही धोनी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. एक बॅट्समन, विकेट कीपर म्हणून धोनी ‘किलर’ आहेच, पण एक ‘मेंटर’ म्हणूनही तो प्रभावी फॅक्टर ठरणार आहे. या वर्ल्डकपमध्ये महेंद्रसिंह धोनीकडे संघाला द्यायला भरपूर काही आहे. 

 

चौथ्या नंबरची संगीत खुर्ची 
कस्तुरी हरीण कस्तुरीच्या सुगंधामुळे त्याच्या शोधात सगळीकडे वणवण फिरतं, पण कस्तुरी त्याच्याजवळच असते. भारतीय क्रिकेट संघाची ही स्थिती गेली साडेचार वर्षे आहे. खरं तर सहा ते सात वर्षांपासून आहे, म्हणता येईल. अनेक वर्षांपासून भारतीय एकदिवसीय संघ चौथ्या क्रमांकावरील बॅट्समन शोधतोय. काखेत कळसा असताना भारतीय संघ, कॅप्टन कोहली आणि शास्त्री गुरुजी गावाला वळसा घालताहेत. तो कळसा आहे महेंद्रसिंह धोनी. चौथ्या क्रमांकावरील कस्तुरी धोनी आहे. एकदिवसीय क्रिकेट संघात चौथ्या क्रमांकाच्या खुर्चीची कायम ‘संगीत खुर्ची” होत राहिली आहे. एक काळ होता जेव्हा भारतीय संघात कसोटीमध्ये सलामीच्या जागेचं कायम भिजत घोंगडं असायचं, तसंच गेल्या कित्येक वर्षे एकदिवसीय संघात चार क्रमांकावरील बॅट्समनचं आहे. 
चौथ्या क्रमांकासाठी आजवर कित्येक फलंदाज आले आणि गेले. कोणी ढगातील विजेप्रमाणे चमकले, तर काहींनी चौथ्या क्रमांकावर उत्तर गवसलंय असं जाणवतानाच पुन्हा निरुत्तर व्हायला लावलं. धोनीने कॅप्टन्सी सोडल्यापासून कोहली आणि संघ व्यवस्थापन  चौथ्या नंबरवरील बॅट्समनचा शोध घेतंय. त्यांच्याकडे धोनी आहे, पण ते त्याला पूर्वापार परंपरेनुसार पाचव्या सहाव्या क्रमांकावरच खेळवत आहेत वर्ल्डकप २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या क्षणी धोनी आऊट झाला आणि भारताने मॅच हरली तेव्हाच वाटलं होतं की, आता यानंतर धोनीने स्वतः पुढील चार वर्षे म्हणजे २०१९ वर्ल्डकपपर्यंत चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यास यावं.
एकदिवसीय संघात चौथा क्रमांक हा महत्त्वाचा असतो. कसोटीमध्ये चौथ्या क्रमांकाला भारतीय संघात खूप महत्त्व दिलं जातं, चौथ्या क्रमांकाची जागा “मानाची जागा” समजली जाते. महान सचिन तेंडुलकर चौथ्या क्रमांकावर खेळायचा, सध्या कॅप्टन विराट कोहली कसोटीमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करतो. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघात मात्र चौथ्या क्रमांकाला अजूनही योग्य न्याय दिला गेला नाही.  सेकंड डाऊन येणारा बॅट्समन हा खासच हवा. कारण सेकंड डाऊन म्हणजे चौथा क्रमांक हा विशेष असतो. तो संघाच्या बॅटिंगचा कणा असतो. चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या बॅट्समनला वरच्या आळीतील म्हणजे फळीतील बॅट्समन्ससोबत, मधल्या फळीतील बॅट्समन्ससोबत आणि तळातील बॅट्समनसोबत खेळण्याचं कसब हवं असतं. त्याच्यात कठीण परिस्थितीत वेळ निभावून नेत, भागीदारी करता येण्याची कला, मानसिक सुदृढता हवी असते. ‘रनिंग बिटवीन द विकेट' हवं असतं. खेळाची, संघाची त्या क्षणाला असलेली परिस्थिती जोखण्याचं कसब हवं असतं. परिस्थितीनुसार आपल्या खेळात लवचिकता आणणं  महत्त्वाचं असतं. कधी इनिंग उभारावी लागते, कधी संघाची इनिंग यशस्वीरीत्या संपवावी लागते म्हणजे फिनिशरची भूमिका निभावावी लागते. त्याच्याकडे वेळ पडल्यास मोठे आक्रमक फटके हवे असतात. ‘अॅट विल' फोर किंवा सिक्स मारू शकण्याचं कसब असावं लागतं. 


हे संपूर्ण गुण, कौशल्ये, कसब महेंद्रसिंह धोनी या खेळाडूमध्ये आहेत.


भारतीय संघ आणि व्यवस्थापन मात्र अजूनही जुन्या काळातच अडकलं आहे. धोनीला ते अजूनही फक्त' ‘मॅच ‘फिनिशर’  समजताहेत. खरं तर धोनीसारख्या बॅट्समनने ज्याला क्रिकेटचं प्रचंड ज्ञान आहे, परिस्थिती जोखण्याची कसब आहे, जो शांतपणे खेळू शकतो, इनिंग ‘बिल्ड अप’ करू शकतो त्याला चौथ्या क्रमांकाशिवाय खाली पाठवणं आणि फक्त पंधरा ते वीस बॉल्स खेळायला लावणं  हा कायदेशीर अपराध ठरावा. धोनी फक्त शेवटच्या ओव्हर्समधील २० बॉल्स खेळण्यासाठी नाही. कारण तो संघाला याहून खूप काही देऊ शकतो. या वर्ल्डकपमध्ये तो हे सगळं काही देईल.


विराट कोहलीने उतावीळपणाने नऊ महिन्यांपूर्वीच अंबाती रायडू वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळणार असल्याचं घोषित केलं होतं. आज अंबाती रायडू वर्ल्डकप संघातही नाही. यापूर्वी मनीष पांडे, श्रेयस अय्यर, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, हार्दिक पंड्या अशा अनेक बॅट्समन्सला चौथ्या क्रमांकावर संधी देऊन झाली. पण कोणीही तिथे योग्य कामगिरी करून स्थिरावू शकला नाही. 


या क्रमांकासाठी फक्त महेंद्रसिंह धोनीच सर्वोत्तम पर्याय आहे. याच्या दोन बाजू आहेत वा कारणे आहेत. एक बाजू ही की धोनीसारख्या गुणवान बॅट्समनचीच तिथे गरज आहे. मॅचमधील किमान अर्धेअधिक ओव्हर्स तो खेळून मोठी खेळी करत संघाला विजयी करू शकतो वा संघाची मोठी धावसंख्या रचू शकतो. दुसरं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. जे धोनी अंधभक्तकांना पटणार नाही, पण ते सत्य आहे. ते म्हणजे, एम एस धोनी हा आता पूर्वीसारखा ‘फिनिशर’ राहिला नाही हे कटू वास्तव आहे. सध्याच्या इंटरनेट आणि सोशल माध्यमांच्या काळात संघापेक्षा खेळाडूंच्या आणि नेत्यांच्या अंध समर्थकांची संख्या अति वाढली आहे. पूर्वी भारतीय संघाचे चाहते असत, आता कोहलीयन्स, धोनीयन्स, पंतीयन्स, रोहितीयन्स झाले आहेत. असो. हे अंधपणे आपल्या आवडत्या खेळाडूचीच पाठराखण करत असतात. महेंद्रसिंह धोनीने आजवर मॅच फिनिशरची अत्यंत कठीण जबाबदारी यशस्वीरीत्या पेलवली. पाचव्या , सहाव्या क्रमांकावर येऊन अनेक सामने एकहाती जिंकून दिलेत. स्वतःच्या पूर्वी अनेक तरुण खेळाडूंना बॅटिंगला पाठवत त्यांना अनुभव दिला आणि स्वतः मागे राहून पाठिंबा देत राहिला. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' म्हणणाऱ्या महेंद्रसिंह धोनी आता मात्र काहीसा थकला आहे. धोनीला ‘स्टार्ट’ घ्यायला वेळ लागतो. धोनी आता सुसाट धावणारी स्पोर्ट्स कार राहिली नसून ‘मारुती एट हँडरेड’ झाली आहे. पिकअप कमी झालाय. त्यामुळे धोनीच्या खांद्यावरून ‘फिनिशर’ची कठीण जबाबदारी आता कमी करायला हवी. इतके वर्षे त्याने ती जबाबदारी समर्थपणे पेलली. धोनीला आता “चौथ्या क्रमांका”वर बॅटिंगला पाठवून त्याला जास्तीत जास्त बॉल्स खेळायला मिळावे. तो संपूर्ण इनिंग सांभाळू शकेल, शिवाय सेट व्हायला पुरेसा वेळसुद्धा मिळेल. त्याच्या करिअरच्या शेवटच्या काळात तरी त्याला चौथ्या नंबरवर खेळायला लावून त्यांच्यावरील फिनिशर चा भार हलका करणं गरजेचं आहे. या वर्ल्डकपमध्ये धोनी हा फॅक्टर चौथ्या क्रमांकावर खूप महत्त्वाचा ठरू शकतो.

 

चाचा चौधरी धोनी 
"चाचा चौधरी का दिमाख कम्प्युटरसे भी तेज चलता हैं!" भारतीय संघातील चाचा चौधरी महेंद्रसिंह धोनी आहे. खेळाचं संपूर्ण ज्ञान असलेला, परिस्थितीबाबत  पूर्णपणे जागरुक असलेला हा क्रिकेटर आहे. प्रचंड अनुभव पाठीशी आहे, सामन्यात काही 'क्रंच मोमेंट्स' असतात त्या मोमेंट्सला कसं हाताळायचं हे धोनीला पूर्णपणे माहीत असतं. शिवाय वर्ल्डकप इंग्लंडमध्ये होणार असल्याने सामन्यादरम्यान किंवा सामन्यापूर्वी पाऊस येण्याची शक्यता कायम असणार आहे. अशावेळी डकवर्थ आणि लुईस हे क्रिकेटमधील गणितीय दानव कोणत्याही संघाचं होत्याचं नव्हतं करू शकतात असा आजवरील अनुभव आहे. पावसाची शक्यता असताना संघनिवड कशी करावी, तेव्हा कोणते निर्णय घ्यावे यात महेंद्रसिंह धोनी महत्त्वाचा ठरू शकतो. कारण अशावेळी कॅप्टन कोहली संघ निवडीत चुका करतो हे गेल्या इंग्लंड दौऱ्यात दिसलं आहे. धोनी यशस्वी माजी कर्णधार असल्याने त्याचे सल्ले तापट आणि कधीकधी काहीसा उथळ वागत असलेल्या विराट कोहलीला अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. ससाणा पक्ष्याची नजर जशी आसमंतात सर्वकाही चाणाक्षपणे टिपत असते तसा धोनी स्टंप्सच्या मागे राहून आपल्या ‘हॉक आय'ने मैदानातील सगळं काही चाणाक्षपणे टिपत असतो. त्याच्या सिस्टीममध्ये तो डेटा जाऊन त्यातून योग्य ते सोल्युशन, क्लुप्ती  बाहेर येत असते. म्हणूनच धोनी संघात असताना कधीकधी कॅप्टन विराट कोहली सामन्याच्या उत्तरार्धात निश्चिंतपणे सीमारेषेवर लॉंग ऑनवर उभा असतो. कोहली आणि धोनीतील असलेली केमिस्ट्री, हार्मनी, ताळमेळ आणि एकमेकांबद्दल असलेला विश्वास यामुळे धोनीकडून क्षेत्ररक्षक आणि बॉलर्सना दिल्या जाणाऱ्या सूचना याबद्दल विराट कोहली निश्चिंत असतो.

 

डीआरएस, "धोनी रिव्ह्यू सिस्टिम’
थर्ड अंपायरकडे दाद मागणारं, डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम नाव असलेलं हे तंत्रज्ञान आता भारतात धोनी रिव्ह्यू सिस्टिम म्हणून ओळखलं जातं. कोणत्याच कर्णधाराचं धोनीइतकं या रिव्ह्यू सिस्टिम यशाचं प्रमाण नाही. कित्येक वेळा विराट कोहली भावनिक होऊन किंवा बॉलरवर विश्वास टाकून ऑन फिल्ड अंपायर्सच्या निर्णयाविरोधात थर्ड अंपायरला दाद मागतो. त्यात भारताचा रिव्ह्यू वाया जातो. पण धोनी जेव्हा रिव्ह्यू घ्यायला सांगतो किंवा त्याला विरोध करतो तेव्हा ते निर्णय बहुतेक वेळा अचूक ठरतात. सामन्याच्या नाजूक वेळी हे धोनी रिव्ह्यू सिस्टिम या वर्ल्डकपमध्ये खूप प्रभावी आणि निर्णायक ठरू शकतं.

 


धोनीचेे हिंदी  
यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी सोबत मिळून आजवर फलंदाजांची शिकार केली. “दे हंट इन द पेअर”!  पण त्यांच्या यशामागे एक क्रिकेट कोळून प्यायलेला माणूस आहे, तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी. 


“दंडा के बाहर डाल ना!’
“ये आगे का अच्छा खेलता है! इसको बाहर वाला डालना अगला!”
“ये अभी पिछे आ के खेल रहा है, सिधा डाल इसको एक! (चहलला फ्लिपर, कुलदीपला टॉप स्पिन टाकायला सांगताना महेंद्रसिंह धोनी.)
“ अभी जोरसे कॅच आने वाली है! तयार रहना ! बाद मे बोलना नही!”


धोनी हा सतत हिंदीतून चहल आणि कुलदीपला बॉलिंगवेळी सूचना देत असतो. क्रिकेट विश्वातील अनेक बॅट्समन्स चहल आणि कुलदीपच्या मनगटाकडे बघून, तो बॉल कोणता आहे हे ओळखू शकत नाही, पण धोनी ते स्टंप्सच्या मागे राहून ओळखतो. त्यामुळे तो चहलच्या गुगलीवेळी मिडल लेगस्टंपकडे, कूलदिप “रॉन्ग वन” टाकताना  बॉल बॅट्समनने खेळण्यापूर्वी धोनी ऑफस्टंपच्या बाहेर आलेला असतो. कारण धोनी हा चहल - कुलदीपचे मनगट ‘रीड’ करतो, वाचतो. पण बॅट्समन मात्र पूर्णपणे ‘क्ल्यूलेस’ असतात.

 
वनडे सिरीजपासून “ट्वेंटी २०” मॅचेसमध्ये धोनी सतत बॉलर्स, फिल्डर्सना विदेशी बॅट्समनला बोलणं समजू नये म्हणून हिंदीतून सूचना देत असतो. अशा वेळी तो एक शब्दही इंग्लिशमधून बोलत नाही. स्टंपला दंडा म्हणतो. चहलच्या गुगलीला अंदरवाला म्हणतो. स्ट्राईकवर असलेल्या बॅट्समनबद्दलही तो बॉलरला सतत सांगत असतो. बॅट्समन कसा खेळतोय, तो कोणता शॉट मारू शकतो, बॅट्समन आत्मविश्वासाने खेळतोय की गोंधळलेला आहे हे बॉलर्सना हिंदीतून सांगत राहतो. या वर्ल्डकपमध्ये कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि पर्यायाने त्यांना मेंटर करणारा स्टंप्समागील धोनीसुद्धा. 

 

क्रिकेटमधील इन्साक्लोपिडीया असलेला महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा चाचा चौधरी आहे. २००७ पर्यंत धोनीला चाचा चौधरी न समजता ‘साबू' समजायचे, आपल्या जबरदस्त ताकदीने तो मोठमोठे फटके हाणायचा. २००७ नंतर संघाचं कर्णधारपद मिळाल्यावर धोनीतील पूर्वीपासूनच असलेल्या चाचा चौधरीचं जगाला दर्शन झालं. आता तर या सुपर कम्प्युटर से तेज चलने वाला दिमाख असलेल्या धोनी चाचाचं वर्ल्डकप २०१९ मध्ये खूप महत्त्वाचं योगदान असणार याबाबत शंका नाही. २०११ चा वर्ल्डकप सचिन तेंडुलकरसाठी जिंकायचा असं टीमने ठरवलं होतं, आज हाच चंग भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनीसाठी बांधलेला आहे. पूर्वी दुसऱ्या खेळाडूने जिंकलेल्या बाईकवर किंवा कारने इतर खेळाडूंना बसवून मैदानात फेरी मारणारा महेंद्रसिंह धोनी, सामना किंवा चषक जिंकल्यावर सीनियर खेळाडूला आपल्या खांद्यावर बसवून मैदान फिरवून आणणारा धोनी, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात त्यांना सामन्याच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये कॅप्टन बनवणाऱ्या धोनीसाठी हा वर्ल्डकप जिंकून त्याला भेट देण्याची संपूर्ण भारतीय संघाला इच्छा आहे. असं झालंच तर प्रत्येकाच्या एका डोळ्यात वर्ल्डकप जिंकल्याचे आनंदाश्रु असतील तर दुसरीकडे तरुण खेळाडूंनी आपल्या खांद्यावर उचललेला निवृत्त होणारा धोनी बघताना दु:खाश्रू असतील. हा वर्ल्डकप जिंकणं हेच महेंद्रसिंह धोनीसाठी सर्वोत्तम 'फेअरवेल' असेल.

 

धोनी एक बॅट्समन 
समालोचक आकाश चोप्रा कायम म्हणतो तसा महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा विमा आहे. परिस्थिती बिघडली की व्यक्ती विम्याचा उपयोग करते. महेंद्रसिंग धोनी हा असाच कठीण समय येता  कामास येणारा विमा आहे. एरवी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करणारा धोनी समजा इंग्लिश वातावरणात भारतीय टीमचे सुरुवातीला दोन किंवा तीन बॅट्समन्स लवकर बाद झाले तर अशावेळी ‘डॅमेज कन्ट्रोल’ करायला महेंद्रसिंग धोनी नावाचा ‘अँकर’ वरती बॅटिंग करायला येऊ शकतो. अशावेळी धोनी डॅमेज कंट्रोल करणार हे निश्चित असतं.


अभिजित दिलीप पानसे
abhijeetpanse.flute@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९६२३३३४७९०
 

बातम्या आणखी आहेत...