आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिजित कुलकर्णी
‘गांधी का मरत नाही?’ असे नावापासूनच कुतूहल निर्माण करणाऱ्या या पुस्तकाची मांडणी खरोखरच अत्यंत वेगळ्या स्वरूपात केली गेली आहे. विशेषत: गांधी हत्येमागच्या कारणांचा शोध आणि गांधीजींचा दुस्वास करणाऱ्या मंडळींकडून पसरवलं जाणारं तिरस्काराचं विष हा आजवर जवळपास अस्पर्श राहिलेला विषय या पुस्तकाच्या निमित्ताने वानखडे यांनी तार्किकतेने पुढे आणला आहे.
आजवर जगात सर्वाधिक साहित्य ज्या ज्या लोकांवर प्रसिद्ध झाले आहे अशांमध्ये खरे तर महात्मा गांधींचा क्रमांक अव्वल असणार. भारतात तर गांधींवर जेवढी पुस्तके लिहिली गेली तेवढी अन्य कुणावरच लिहिली गेलेली नाहीत. त्यामुळे चंद्रकांत वानखडे यांचे गांधींवरील पुस्तक म्हणजे त्यात आणखी एकाने भर अशी अनेकांची धारणा होऊ शकते. पण ‘गांधी का मरत नाही?’ असे नावापासूनच कुतूहल निर्माण करणाऱ्या या पुस्तकाची मांडणी खरोखरच अत्यंत वेगळ्या स्वरूपात केली गेली आहे. विशेषत: गांधी हत्येमागच्या कारणांचा शोध आणि गांधीजींचा दुस्वास करणाऱ्या मंडळींकडून पसरवलं जाणारं तिरस्काराचं विष हा आजवर जवळपास अस्पर्श राहिलेला विषय या पुस्तकाच्या निमित्ताने वानखडे यांनी तार्किकतेने पुढे आणला आहे.
गांधी या विषयाचा आवाकाच मुळात मोठा आहे. त्यातही वानखडेंच्या पुस्तकाचा काळ सुरू होतो गांधींपूर्वीच्या भारतापासून. त्यातून विषयाची पार्श्वभूमी तयार होते. त्यानंतर ‘मेकिंग ऑफ महात्मा’ प्रकरणात दक्षिण अाफ्रिकेतील त्यावेळची स्थिती गांधीजींचे नेतृत्व घडायला कशी कारक ठरली त्याचा आढावा आहे. मग गांधींची अहिंसा, धार्मिकता, ते जातीयवादी होते का, मिठाचा सत्याग्रह वगैरे महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेत गांधीविरोधक नेमके याच मुद्द्यांच्या आडून कशी कुजबूज मोहीम राबवत त्यांना बदनाम करत होते त्याची मांडणी केली आहे. एकीकडे भल्याभल्यांना गांधींची मोहिनी पडत असताना दुसरीकडे चिमूटभर मंडळींना का होईना गांधी का नकोसे वाटत होते त्याची चर्चा टप्प्याटप्प्यावर करत पुस्तक पुढे सरकते. गांधी कुठल्याच चौकटीत कसे बाध्य होत नाहीत आणि ते अनेकांना कसे सोयीचे नाहीत हे सांगताना पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात एवढे होऊनही ‘गांधी का मरत नाही ?’ याचा वेध घेण्यात आला आहे.
पुस्तकाच्या विषयाचे प्रयोजन प्रस्तावनेत लेखकाने स्पष्टपणे मांंडले आहे. गांधीजींवर जगभरातील माणसांनी पराकोटीचे प्रेम केले तरी त्यांचा द्वेष करणारी, निंदानालस्ती करणारी मंडळीही टीचभर का होईना, पण होती. ही मंडळी गांधींबद्दलचा अपप्रचार सातत्याने करत राहिली. ते फेकत राहिले आणि इतर लोक त्याला बळी पडत राहिले. गांधी हत्येला ‘वध’ म्हणताना ते हत्येची कारणे देत राहिले आणि गांधीस्नेही, गांधीप्रेमी मात्र प्रतिवाद करण्याऐवजी मूग गिळून राहिले. परिणामी कालौघात अशा लोकांना गांधींविरोधी तिरस्काराचे विष जनमानसात पसरवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले. हे त्यांनी का केले, गांधी त्यांना वारंवार आडवे का जात होते, त्यांच्या आशा-आकांक्षांचा गांधींमुळे कसा चुराडा होत होता आणि त्याच मानसिकतेतून त्यांनी गांधींना कसे संपवले आदी प्रश्नांची चर्चा करण्याचा उद्देश वानखडे प्रस्तावनेत नमूद करतात. त्यामुळे जिज्ञासा वाढते आणि पुस्तक संपवताना आजवर कधीच पुढे न आलेले अनेक मुद्दे िवचारप्रवृत्त करतात. विशेषत: आजच्या काळात अशा पुस्तकाची प्रासंगिकता अधिक महत्त्वाची आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.