आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षणीय ‘अक्षरलिपी’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिजित सोनावणे  

भवतालाशी भिडणाऱ्या साहित्य निर्मिकांना सोबत घेऊन अल्पावधीत लोकप्रिय झालेला ‘अक्षरलिपी’चा यंदाचा दिवाळी अंकही लक्षणीय ठरला आहे. 
 
२०१७ मध्ये महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले व प्रतीक पुरी हे तीन तरुण संपादक एकत्र आले आणि त्यांनी एक दिवाळी अंक काढण्याचा निर्णय घेतला, जो नेहमीच्या दिवाळी अंकापेक्षा वेगळा असेल यावर त्यांचं एकमत होतं. हे वेगळेपण काय असेल हे नंतर विचारांती ठरत गेलं. त्यातील महत्त्वाचा भाग होता की यात रिपोर्ताज असतील जे सामाजिक प्रश्नांचा वेध घेतील... यात नवीन लेखकांचं साहित्य असेल... सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा परिचय यातून देण्यात येईल. शिवाय साहित्यिक-सांस्कृतिक घडामोडींशी हा दिवाळी अंक या ना त्या प्रकारे स्वतःला जोडून घेईल व त्यांतून मराठी साहित्य संस्कृती वाढवण्यासाठी स्वतःचा खारीचा वाटा उचलेल. ‘अक्षरलिपी’च्या पहिल्या अंकापासून या सर्व गोष्टींना जाणीवपूर्वक स्थान देण्यात आलं आहे. त्याला साजेसाच ‘अक्षरलिपी’ २०१९ चा हा तिसरा अंकही आहे. ‘अक्षरलिपी’च्या संपादकीयातून समकालिन महत्त्वाच्या गोष्टींना स्थान देण्यात येतं आणि त्यातून या अंकाचा त्या गोष्टींशी स्थानिक पातळीवर काय संबंध आहे याचीही माहिती मिळते. सध्या जगभरांत दोन महत्त्वाचे मुद्दे ऐरणीवर आले आहे. एक आहे पर्यावरणाचा व दुसरा आहे आर्थिक व त्याहीपेक्षा वैचारिक मंदीचा. हे दोन्ही मुद्दे सामान्य नागरिकाच्या जगण्याशी निगडीत आहेत. पण ते तसे आहेत याची जाणीव त्याला असतेच असं मात्र दिसत नाही. त्याला ती जाणीव करून देण्याचं काम ‘अक्षरलिपी’ आपल्या लेखांमधून करू पाहते आहे. जेणेकरून अशा अराजकच्या परिस्थितीत मानव व निसर्गाचा समतोल ढासळणार नाही व मानवांमधील परस्पर सौहार्द मतभेदाच्या वावटळीत विरून जाणार नाही याची दक्षता घेण्यास आपण सर्वच आपापला वाटा उचलू शकू.

या पार्श्वभूमिवर ‘अक्षरलिपी’तील लेखकांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून मांडण्याचं काम केलं आहे. सदर अंकात यावेळेस प्रगती बाणखेले, शर्मिला कलगुटकर, मिनाज लाटकर, मनोज गडणीस, शर्मिष्ठा भोसले यांचे रिपोर्ताज आहेत. प्रगती बाणखेले यांनी उस तोड करणाऱ्या लहान मुलांच्या शिक्षणाचा व  त्यांच्या जगण्याचा शोध घेतला आहे. शर्मिला कलगुटकर यांनी टीबीग्रस्त महिलांच्या जगण्याच्या वेदना उघड केल्या आहेत. मिनाज लाटकर यांनी दिल्लीतील तिबेटी निर्वासितांचं जगणं मांडलं आहे. मनोज गडणीस यांनी अत्तरांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कन्नौज शहराची सफर घडवली आहे. शर्मिष्ठा भोसले यांनी नागालँडमधील बिहारी-उत्तर भारतीय स्थलांतरीतांच्या जगण्याचा वेध घेतला आहे. या विशेष रिपोर्ताजच्या जोडीलाच काही विशेष लेखही अंकात आहेत. महेशकुमार मुंजाळे यांनी साडीचा ‘पदर’ या विषयावर एक अनोखी चर्चा केली आहे तर ह्रषिकेश पाळंदे यांनी त्यांच्या कादंबरीच्या निमित्ताने लेह-लडाखचा केलेला प्रवास शब्दबद्ध केला आहे. मुक्ता चैतन्य यांनी लहान मुलांमधील पॉर्नच्या वाढत्या व्यसनांची कारणं व त्यावरची उपाय योजना शोधण्याचा प्रयत्न केला आहे तर संदेश कुडतरकर यांनी "गे डेटिंग एप्स'ची दुनिया उलगडून दाखवली आहे. कवयित्री कल्पना दुधाळ यांनी जगणं व कविता यांचा संबंध कसा असतो हे सांगितलं आहे तर बभ्रुवाहन यांचा हसवता हसवता चिमटे घेणारी खरपूस लेखही अंकात आहे. सोबतीला सुरेंद्र रावसाहेब पाटील यांनी त्यांच्या आजोबांचे रेखाटलेले विलोभनिय व्यक्तिचित्रही आहे. यांच्या जोडीलाच मुकेश माचकर, प्रसाद कुमठेकर व मोनालिसा वैजयंती विश्वास यांच्या वेगळ्या विषयांवरच्या तीन दमदार कथा अंकात आहेत. श्रीकांत देशमुख यांच्या आगामी कादंबरीतला एक भागही वाचकांना वाचायला मिळेल. ‘अक्षरलिपी’चा सामाजिक वारसा जपण्याचा क्रम याहीवेळेस ‘सेवालय’ व ‘बालग्राम’ या दोन सामाजिक संस्थांच्या परिचयातून त्यांनी वाचकांपुढे आणला आहे. इंद्रजित खांबे यांनी केरळमधील ‘पुलीकाली’ या उत्सवावरचं केलेलं फोटो फिचर अंकाचं देखणेपण अधिकच वाढवणारं आहे. अंकाचं सुरेख मुखपृष्ठही त्यांचंच आहे. आपण काय करतोय व काय करायला हवं याची निश्चित जाणीव ‘अक्षरलिपी’च्या संपादकांना आहे. संपादक व संपादनाचे महत्त्व सध्या कमी होत जाण्याच्या काळात संपादनाकडे जातीनं लक्ष पूरवून काम करणारी ही टीम आहे.