आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुत्तरित प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसपास खूप काही घडत असतं. काही घटना, प्रसंग विचार करायला भाग पाडतात. काही प्रश्न निर्माण करून जातात. ज्याची उत्तरं शोधण्याची जबाबदारी समाज म्हणून तुमची-आमची असते...

 

तीन दिवसांपूर्वी परभणीहून औरंगाबादला सचखंडने येत होतो. समोरच्या  सीटवर एक सात वर्षांचा मुलगा अश्रू गाळत होता. मात्र, त्याचा आवाज अजिबात नव्हता. मी विचारले, काय झालं? तो म्हणाला, बाबा मला सोडून गेले. त्यावर मी म्हणालो, तुझे बाबा कुठे बाहेर गेले असतील. ते नाही आले तरी मी तुला तुझ्या घरी सोडेन. त्यावर तो म्हणाला, मला माझं घर माहिती नाही. तेवढ्यात समोरून वयस्कर गृहस्थ आले. त्याच्याकडे पाहून मी म्हणालो, तुम्ही सोडून गेलात म्हणून तुमचा मुलगा रडतोय. त्यावर ते म्हणाले, हा माझा नातू आहे. तुला सोडून जाईन, असं मी त्याला रागाच्या भरात अनेकदा म्हणत असतो. त्यामुळे तो रडत असेल. काय सांगावे साहेब मोठी कहाणी आहे. असं म्हणून त्या आजोबांनी बोलायला सुरुवात केली, ‘अठरा वर्षांपूर्वी  परभणीहून औरंगाबादला आलो. वडगाव कोल्हाटीला स्थायिक झालो. दोन मुलं आहेत. मोठ्याचं लग्न झालं. मात्र, मोठ्याचा मुलगा म्हणजे हा सहा महिन्यांचा असताना त्याची माय कोणासोबत तरी पळून गेली. तेव्हापासून हा माझ्या अंगाखांद्यावर खेळलाय. मीच सांभाळ करतो त्याचा. माझ्या मोठ्या मुलाल दारूचं व्यसन आहे. तो स्वत:च्या या लहान मुलाकडे अजिबात लक्ष देत नाही. पैसाही देत नाही. दुसरं लग्न करून तो निघून गेला.’ 


एवढं बोलून आजोबा थांबले.  तोपर्यंत जालना आले होते. तेवढ्यात माझी नजर खाली गेली. त्यांचे दोन्ही पाय अधू होते. विचारलं तर म्हणाले, कंपनीत काम करताना दोन्ही पाय मशीनमध्ये अडकले होते. पायात  रॉड टाकलेत. हा खर्च कंपनीनं केल्याचं ते म्हणाले.  या सगळ्यादरम्यान तो छोटा मुलगा शांत बसून होता. आजोबांच्या डोळ्यात खूप काही साठलेले होते. ‘एक वीस बाय तीसचा प्लॉट मी याच्या नावावर करणार आहे. हा आता पहिलीत गेलाय.खूप शिकवायचं आहे याला.’ आजोबा बोलायचं थांबले. गेल्या काही वर्षांत या मुलाच्या आईसारखी प्रकरणं सगळीकडेच ऐकायला मिळताहेत. क्षणिक सुखासाठी काही महिला आमिषाला बळी पडत आहेत. त्यात दोष कुणाचा? पत्नी पळून गेल्यानंतर पुरुष दुसरे लग्न करून मोकळे होतात. मात्र, त्यानंतर या महिला, मुलांचे काय होते? ज्याला आजोबांसारखे नातेवाईकच नाहीत त्यांचे काय?

बातम्या आणखी आहेत...