आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाकलेलं इजिप्शियन महिलाविश्व

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी इजिप्त बघायला जायचं ठरवलं तेव्हा इजिप्तमध्ये राहणाऱ्या परिचितांकडूनच काही सूचना आल्या. जसं की खांदा झाकेल असे कपडे हवे, पाय उघडे नको, एकटीने कुठे फिरायचं नाही किंवा कुणावर विश्वास ठेवून कुठे जायचे नाही, काही प्यायला दिलं तर प्यायचं नाही, शक्यतो ग्रुपमध्येच राहायचं, वगैरे. आपल्या देशात जसं कुठेही आणि कधीही फिरता येतं तसं तिथे नाही फिरता येत, निदान परदेशी स्त्रियांना तरी. भाषा हा मुख्य अडसर असला तरी तिथल्या सर्वसाधारण पुरुषांची विचारसरणी अजूनही संकुचित आहे त्यामुळे तिथे राहणाऱ्या स्त्रियांना पण बंधने आहेतच.


तिथे फिरत असताना शाळाकॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसल्या. तरुणांपेक्षा तरुणींची संख्या जास्त जाणवली फक्त त्यांनी हिजाब बांधून डोकं झाकलेलं होतं. त्यांचा चेहरा तेवढा दिसायचा. गुडघ्यापर्यंत कुडता आणि खाली घट्ट जीन्स. संपूर्ण पाश्चिमात्त्य पोशाख तरुणी आता करायला लागल्या आहेत. फरक इतकाच की, जीन्सच्या वर जे घालण्यात येते ते संपूर्ण हात झाकेल असे असते. काहींनी पंजे पण झाकून घेतले होते. मुलींचे केस लांब असावेत हे जाणवायचं, पण स्पष्ट कळलं नाही कारण केस दिसतच नाहीत.


आठ दिवसांत फक्त दोन बायका दिसल्या गाडी चालवताना. बायका संपूर्ण बुरख्यात. एखाद्या बाईचाच चेहरा उघडा. पण चेहेऱ्यावर नाजूक भाव नाहीच, खूप राठ भाव जाणवले. मुली बघून हसायच्या, इंग्रजीत बोलायच्या, त्यांना बघून जिवंतपण वाटायचा. पण तिथल्या वयस्कर बायकांचे चेहरे भावहीन असायचे. काही मुली आपल्या वयाने बऱ्याच  मोठ्या जोडीदारांसोबत दिसल्या तेव्हा काळजी वाटायला लागली. मी एकीला विचारायचं धाडसही केलं की, तो कोण आहे, तर तो तिचा नवरा होता जो तिच्यापेक्षा खूप वयस्कर होता. नंतरदेखील हे दृश्य अनेकदा दिसलं. असो.


आजची ही परिस्थिती आहे, पण प्राचीन इजिप्शियन कालखंडात काही विलक्षण कर्तबगार राण्या होऊन गेल्या. तेव्हा प्रामुख्याने राजांकडे सत्ता असायची. राज्याबद्दलचे, प्रजेबद्दलाचे, अगदी कोणत्या देवाची पूजा करायची, प्रजेने राजाला कुठे, कधी, कसे भेटायचे याबाबत नियम राजाने ठरवलेले असायचे. जो राजा राज्य करायचा त्याची राणी म्हणून त्या स्त्रीला विशेष महत्त्व असायचे; पण त्या कालखंडात अशाही काही स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी पुरातन इजिप्तची सत्ता समर्थपणे सांभाळली. त्या स्त्रिया मोजक्याच होत्या पण विलक्षण कर्तबगार होत्या. म्हणजे ज्या काळात पुरुषांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात असायचे त्या काळात या स्त्रियांनी इजिप्तच्या संस्कृतीमध्ये फार मोठे स्थान मिळविले आहे. इजिप्शियन राजाची म्हणजे फेरोची बायको म्हणून राणीला विशेष अधिकार होतेच पण त्या कालखंडात अशा राण्या होऊन गेल्या ज्यांनी राजांच्या बरोबरीने राज्यसत्ता चालविली. त्या स्त्रियांना त्या वेळच्या समाजात मोठा मान होता. त्यातल्या काही होत्या मरनीएथ, हॅटशेपसूट, नेफरटीटी, नेफरटारी, आणि बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेली क्लिओपात्रा, इ.


क्लिओपात्राच्या घराण्याची सत्ता संपल्यानंतर बराच काळ इजिप्तवर आक्रमणे होत राहिली, ग्रीकांकडून, मुस्लीमांकडून आणि इंग्रजांकडून. तोवर इजिप्तचा सुवर्णकाळ लयाला गेला होता. काही विचित्र मुस्लीम समजुतींमध्ये समाज गोवला गेला. स्त्रियांवर अनन्वित लैंगिक अत्याचार झाले. मधल्या मोठ्या कालखंडात स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली. स्त्रियांना स्वतःच्या म्हणजेच मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले. शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक रूढी यामुळे स्त्रियांना गुरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती तरी त्या काळच्या स्त्रियांना ते सहन करण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्यानंतर म्हणजे गेल्या दहा वर्षात तिथली परिस्थिती बायकांच्या बाबतीत जरा, अगदी जरा बदलली आहे. बायका हक्कांसाठी लढायला लागल्या आहेत हे चित्र दिसून येते. आता इजिप्त बदलत चालले आहे. मुली शिकत आहेत, स्वतंत्र व्हायचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या घरात काय परिस्थिती आहे हे जाणून नाही घेता आले पण तिथल्या सर्वसामान्य गृहिणींना अजूनही काही दिव्यांना समोरे जायला लागत असणार यात शंका नाही. Female genital mutilation या प्रथेवर २००८मध्ये कायद्याने बंदी आणली असली तरी आत्ताआत्तापर्यंत उघडपणे सुरू होती, अजूनही खेडेगावांमध्ये चालू आहे असा अंदाज आहे. 


एकंदरीत इजिप्तमध्येच जी मध्यमवयीन पिढी आहे त्यांच्यात शिक्षणाचा अभाव जाणवतो. पण सद्य परिस्थितीत तिथला तरुण वर्ग विशेषतः मुली शिकत असल्यामुळे त्यांना अधिकाराची जाणीव होत आहे. मात्र इजिप्तमधल्या स्त्रियांना तो पूर्वीचा मान मिळवायला अजून काही शतके तरी लोटणार आहेत. तिथे ज्या बायकांना बघितले त्यांचे ते भावहीन चेहरे मात्र डोळ्यांसमोरून जात नाहीत.

इजिप्तमध्ये प्राचीन काळी झालेल्या राण्या
राणी मरनीएथ (Merneith) साधारणपणे इ.स.पूर्व २९२०मध्ये ती सत्तेवर होती. जेव्हा राजा Djet मरण पावला तेव्हा उत्तराधिकारी म्हणून त्यांचा जो मुलगा होता, तो खूप लहान होता म्हणून या राणीने इजिप्तचे अधिकारपद भूषविले होते. मध्यकालाच्या सुरुवातीला राणी Neithikret ही हुशार राणी होऊन गेली. तिचा कार्यकाल साधारण इ.स. पूर्व २१४८ ते मृत्यू इ.स. पूर्व २१४४. त्या वेळच्या अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये या राणीचा उल्लेख आहे.


फेरोंच्या काळात हॅटशेपसूट ही एकमेव स्त्री फेरो-राणी होऊन गेली. तिचा जन्म इ.स. पूर्व १५०८ आणि  मृत्यू इ.स. पूर्व १४५८मध्ये झाला असे ऐतिहासिक दस्तऐवजांवरून समजते. ती अतिशय कर्तृत्ववान होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर लहान सावत्र मुलाला गादीवर बसवून त्याच्या नावाने तिने राज्यकारभार केला आणि ती सर्वेसर्वा झाली. तिने जवळजवळ वीस वर्षे राज्यकारभार केला. आपण खुद्द ‘आमून’ देवाची मुलगी आहोत असा ठाम दावा तिने केला होता. ती पुरुषांसारखाच पोशाख करी आणि हनुवटीवर पुरुषांसारखी खोटी दाढीही लावत असे. तिने तिच्या पित्याच्या स्मरणार्थ कर्नाक येथे नव्वद फूट उंच विजयस्तंभांची स्थापना केली. ही एकमेव राणी आहे जिचा महाल व्हॅली ऑफ किंग्जमध्ये आहे. ज्या ठिकाणी हा महाल आहे त्या भागाला Deir el-Bahari म्हणतात. चंद्राकृती ग्रॅनाइटच्या डोंगरात कोरीव काम करून तो महाल घडवला आहे. आणखी एक राणी नेफरटीटी, जी इजिप्शिअन कालखंडातील अतिशय कर्तबगार आणि अतिशय सुंदर राणी होऊन गेली. तिचा जन्म इ.स. पूर्व १३७० आणि मृत्यू इ.स. पूर्व १३३०मध्ये झाला, असे मानण्यात येते. सूर्याची पूजा करण्याचा नियम राजा Akhenaten ने घालून दिला होता. जनतेचा मोठा रोष पत्करून नेफरटीटी हिने सूर्याची पूजा चालू ठेवली होती.


त्यानंतर जिचे नाव डोळ्यासमोर येते ती नेफरटारी ही दुसऱ्या रामसिसची बायको, जी शिकलेली होती आणि रामसिस याला राज्यकारभारामध्ये मदत करत होती. तिचा मोठा प्रभाव त्याच्या शासनावर होता. या राणीची कबर रामसिस याने व्हॅली ऑफ किंग्जमध्ये घडवलेली आहे. तिथल्या अनेक सुंदर कबरींपैकी एक म्हणून नेफरटारीच्या कबरीकडे बघितले जाते. त्यानंतर ३०० वर्षांहून जास्त काळ क्लिओपात्रा सातवी या राणीच्या राजघराण्याने इजिप्तवर शासन केले. तिचा जन्म इ.स.पूर्व ६९ मधला आणि मृत्यू इ.स.पूर्व ३० मधला. तिची राणी म्हणून कधीच औपचारिकरीत्या घोषणा झाली नसली तरी तिने राज्यकारभारात मदत केली होती. अतिशय बुद्धिमान राण्यांपैकी ती एक होती. ती ग्रीक होती.

अभिरुची ज्ञाते, पुणे
abhiruchidnyate@gmail.com

बातम्या आणखी आहेत...