आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया खेलो' स्पर्धेत अभिषेक महाजनला सुवर्ण पदक, भाजीपाला चढ-उतार करताना रुजली वेटलिफ्टिंगची आवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रावेर - भाजीपाला विक्रीच्या दुकानावर भाजीपाला चढ-उतारासाठी मदत करणारा माझा अभिषेक महाराष्ट्राचे नेतृत्त्व करून वजन उचलण्यात सुवर्णपदक मिळवेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, ९ जानेवारीला टीव्हीवर वेटलिफ्टिंगमध्ये त्याला सुवर्णपदक मिळाल्याचा क्षण पाहून छाती अभिमानाने फुलली. जीवनातील सर्वोच्च आनंदाच्या क्षणी आभाळ ठेंगणे झाले. आता अभिषेकने ऑलिम्पिकमध्ये खेळून देशाचा अन् रावेरचा नावलौकिक वाढवला पाहिजे. यासाठी भाजीपाला विक्रीच काय वेळ पडली, तर हॉटेलमध्ये कपबशा धुण्याचे देखील काम करू, असे सांगताना अभिषेकचे वडील गणेश महाजन यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. 


अभिषेकचे वडील गणेश महाजन दिवसभरात भाजीपाला विक्रीतून तीनशे-साडेतीनशे रुपये कमाई करतात. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी रस्त्यावर दुकान थाटले आहे. येथे वांगी, कांदे, बटाटे यासारखा भाजीपाला चढ-उतार करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून अभिषेक त्यांना मदत करायचा. यातूनच त्याला वेटलिफ्टिंगची आवड लागली. योगेश महाजन यांनी ही आवड ओळखून अभिषेकला सरावासाठी मदत केली. यानंतर सुरू झालेला अभिषेकचा प्रवास थेट राष्ट्रीयस्तरावर सलग तीन सुवर्णपदक जिंकण्यापर्यंत आला आहे. मेहनतीची आवड व कठीण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द असलेल्या अभिषेकला मार्गदर्शनासाठी अनेकजण पुढे येतात. 


पुणे येथील 'खेलो इंडिया खेलो' या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत अभिषेकने १७ वर्षे वयोगटात २११ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय आणि रावेरात उत्साहाचे वातावरण आहे. याविषयी त्याचे वडील गणेश पुंडलिक महाजन यांना 'दिव्य मराठी'ने विचारणा केली असता, माझ्या मुलाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिकूंन तिरंगा दिमाखात फडकवावा, अशी इच्छा अाहे. यासाठी त्याला काहीही कमी पडू देणार नाही. भाजीपाला विक्रीच काय, वेळ पडल्यास हॉटेलात कपबशी धुण्याचे काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 


पुण्यातील स्पर्धेत राज्याचे नेतृत्व 
'खेलो इंडिया खेलो'मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करताना मुलांमध्ये उत्तर महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान अभिषेक महाजनने पटकावला. मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता. भारतातून निवडण्यात आलेल्या ११ खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला होता. जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या माध्यमातून त्याला सतत मार्गदर्शन मिळत आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार 
अभिषेक महाजन हा भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक मिळवेल, अशी खात्री त्याचे प्रशिक्षक संदीप महाजन यांनी व्यक्त केली. अभिषेकला सरावासाठी अजय महाजन, संजय महाजन, लखन महाजन, युवराज महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. प्रदीप मिसर, संजय मिसर, भास्कर महाजन, पद्माकर महाजन, हेमंत नाईक, डॉ.टी.बी.दलाल, उमेश पाटील, पी.के.महाजन यांच्यासह क्रीडा क्षेत्रातून अभिषेकचे कौतुक झाले. 

बातम्या आणखी आहेत...