आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात अभिषेक पूजेच्या पासचा काळाबाजार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मंदिरातील कंत्राटी कर्मचाऱ्याने ५० रुपयांत अभिषेक पूजेचा पास भाविकांना ५०० रुपयांना विकण्याचा प्रकार शुक्रवारी (दि.१५) पहाटे महाद्वारासमोर घडला. यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तुळजाभवानी मंदिरात अभिषेक पूजेची वेळ मर्यादित आहे. सकाळी ६ ते १० व सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत अभिषेक पूजा करण्यात येते. मात्र, भाविकांची प्रचंड गर्दी आणि मर्यादित अभिषेक पूजेचे पास यामुळे अनेक भाविकांना अभिषेक पूजेपासून वंचित रहावे लागते. याचाच गैरफायदा घेत मंदिरातील कंत्राटी कर्मचारी अभिषेक पूजेच्या पासचा काळा बाजार करीत असून गरजू भाविकांना अभिषेक पूजेचे पास विकत असल्याचे बोलले जात आहे.
अभिषेक पूजेच्या पासच्या काळ्या बाजाराची घटना उघडकीस येताच पुजारी बांधवांनी तातडीने मंदिर संस्थानला कळवले असून हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिर संस्थान काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शुक्रवारी (दि.१५) मध्य रात्री १२ वाजेच्या सुमारास अभिषेक पासचे काउंटर सुरू करण्यात आले तर गर्दीमुळे निर्धारित पास संपल्याने पहाटे लवकरच बंद करण्यात आले. मात्र, पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान मंदिरातील कंत्राटी कर्मचाऱ्याने भाविकांना ५०० रुपयांना अभिषेक पास विकल्याची माहिती पुजाऱ्यांना समजली. या पासवर मध्यरात्री २ वाजून १ मिनिटांची वेळ असल्याचे सांगण्यात आले. याबाबत पुजाऱ्याने मंदिर संस्थानच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांची मनमानी
तुळजाभवानी मंदिरात अॅक्सिस कार्ड, स्वच्छता व सुरक्षेचे खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहेत. भाविकांनी श्रद्धेने तुळजाभवानी चरणी वाहिलेल्या लाखो रुपयांची उधळपट्टी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर करण्यात येत आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गैरव्यवहार आणि गैरवर्तनाचा भाविकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. भाविकांना मारहाणीसह दमदाटीचे प्रकारही यापूर्वी अनेक वेळा घडले.
पाससाठी भक्तांना जागून काढावी लागते रात्र
अभिषेक पूजा सकाळी ६ वाजता प्रारंभ होत असली तरी पूजेचे पास काउंटर मध्यरात्री १२ वाजता सुरू करण्यात येते. यासाठी रात्री १० वाजल्यापासून रांगा लागतात. सकाळच्या अभिषेक पूजेचे पास रात्री संपत असल्याने भाविकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागते. अभिषेक पूजेचे पास २ तास अगोदर देण्याची मागणी प्रकाश धट यांनी मंदिर संस्थांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच पास वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी समिती नेमण्याची मागणीही त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.