ICC world cup / भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दर तासाला होत आहेत तब्बल ७२० ट्विट, आजच्या सामन्याबद्दल साेशल मीडियावरील युद्धाचा वृत्तांत

भारताला ‘पाकचा बाप’ म्हणणाऱ्या जाहिरातीला ३७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज
 

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 16,2019 09:19:00 AM IST

मैदानापासून ते टीव्हीवरच्या जाहिराती आणि समाजमाध्यमांपर्यंत भारत-पाकिस्तानमधील महायुद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. हॅशटॅग अॅनॅलिटिक्स राइटटॅगच्या अहवालानुसार क्रिकेट सामन्याच्या एक दिवस अगाेदर शनिवारी ट्विटरवर दर मिनिटाला जवळपास १३ नवीन ट्विट पाेस्ट केल्या जात हाेत्या. याचा अर्थ प्रत्येक तासाला जवळपास ७२० नवीन ट्विट्स. यामध्ये #IndVsPak, #IndvPak आणि #IndiaVsPakistan सारख्या हॅशटॅगसह अनेक नव्या ट्विट्सचा समावेश आहे. शनिवारी वर्ल्डकपमध्ये श्रीलंका आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात सामना हाेता. पण या सामन्याशी निगडित दर तासाला केवळ २१ ट्विट झाले. याचा अर्थ भारत-पाकिस्तानपेक्षा ८८ टक्के कमी ट्विट झाले. वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त ट्विट #CWC19 च्या बराेबरीने केले जात आहेत. गेल्या २४ तासांत जवळपास ८४० नवीन ट्विट करण्यात आले.

दुसऱ्या बाजूला भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याशी संबंधित जाहिरातींचीही बरीच चर्चा आहे. भारतातील विश्वचषक सामन्याचे अधिकृत प्रसारणकर्ते असलेल्या स्टार स्पाेर्ट््सने एक आठवड्यापूर्वी भारत-पाक सामन्याची एक जाहिरात सुरू केली. त्यामध्ये भारताला पाकिस्तानचा बाप असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही जाहिरात एकट्या यूट्यूबवरच आतापर्यंत ३७ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आली आहे. ही जाहिरात ६ भाषांत अपलाेड करण्यात आली आहे. विशेष गाेष्ट म्हणजे पूर्ण विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या एक मिनिटाच्या अन्य जाहिराती ३० दिवसांत ३० लाख वेळा बघितल्या गेल्या.

भारत-पाकिस्तान जाहिरातीने मात्र हा आकडा पाच दिवसांतच आेलांडला. भारत आणि आॅस्ट्रेलिया सामन्याच्या जाहिराती एका आठवड्यात ११ लाख वेळा बघितल्या गेल्या. पाकिस्तानमध्ये भारत-पाक सामन्यावर एक जाहिरात बनवली आहे. ती विंग कमांडर अभिनंदन यांची खिल्ली उडवणारी जाहिरात असल्याचे सांगितले जात आहे. ही जाहिरात तेथील जॅझ टीव्ही चॅनलने तयार केली असून त्यांचे यूट्यूबवर पेज नाही. आता भारतात या जाहिरातीला उत्तर म्हणून यूट्यूबर्स व्हिडिआे बनवत आहेत. सेव्हन नावाच्या एका चॅनलने माैका-माैका नावाचे दाेन व्हिडिआे तयार केले असून आठवडाभरातच ते ३३ लाख वेळा बघण्यात आले आहेत. एका व्हिडिआेने तर एक दिवसातच १२ लाख व्ह्यूजचा टप्पा आेलांडला. अशा प्रकारे उत्तरादाखलच्या व्हिडिआेंचा भडिमार सुरू आहे.

X
COMMENT