आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांच्या शिवराळ भाषेच्या ऑडिओ, व्हिडिओंचे प्रचारासाठी ‘भांडवल’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिल्ह्याच्या राजकारणातील परंपरागत  राजकीय संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने अधिकच गडद होऊ लागला आहे. पक्ष कोणताही असो, जिंतूरच्या राजकारणात बोर्डीकर-विरुद्ध भांबळे हा संघर्ष सातत्याचा आहे. या संघर्षाने निवडणुकीच्या प्रचारात अगदी वैयक्तिक पातळीवर टीका-टिप्पणी करण्यापासून ते एकमेकांनी कार्यकर्त्यांना केलेल्या शिवराळ भाषेचे ऑडिओ-व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जाऊ लागले आहेत.

जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक ते मुंबईची कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुक्यातील सहकारी संस्थांवर बोर्डीकरांचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ. विजय भांबळे यांनी त्यांच्या या सत्ता स्थानांना सुरुंग लावण्याचे निकराचे प्रयत्न केले. या प्रयत्नांतून भांबळे २०१४ मध्ये विधानसभेत जाण्यात यशस्वी झाले.  तेथून हा संघर्ष अधिकच तीव्र झाला.  जिल्हा बँकेच्या ७.५० कोटी रुपयांच्या विमा घोटाळ्याचे शुक्लकाष्ठ बोर्डीकरांमागे लागल्याने त्यांनी कन्या मेघना साकोरे यांना राजकारणात सक्रिय केले.   मेघना बोर्डीकर ह्या भाजपकडून रिंगणात आहेत.  प्रचारात दोन्ही गटांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर चिखलफेक होऊ लागली आहे.  प्रामुख्याने समाजमाध्यमांवरून दाेघांचेही समर्थक जुने ऑडिओ-व्हिडिओ व्हायरल करू लागले आहेत. त्यात आ.भांबळे यांनी आपल्या तीन कार्यकर्त्यांना अत्यंत शिवराळ भाषेत धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ती मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमातून मतदारांकडे पाठवली जात आहे. 
 

बोर्डीकरांचाही व्हिडिओ व्हायरल
अशीच स्थिती माजी आ.बोर्डीकर यांच्या एका व्हिडिओवरून दिसून येते. या क्लिपमध्ये एका आंदोलनादरम्यान बोर्डीकर यांनी पोलिसांना अत्यंत शिवराळ भाषेत जाहीर सभेतून धमकावल्याचे व बाजूलाच असलेल्या त्यांच्या कन्या मेघना या देखील समर्थन करीत असल्याचा आशय आहे. परंतु हा व्हिडिओ  बोर्डीकर काँग्रेसमध्ये असताना केलेल्या आंदोलनादरम्यानचा असावा. या व्हिडिओतील अन्य काही पदाधिकारी हे काँग्रेसचे आहेत. विशेषतः मेघना बोर्डीकर या युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या हे ही दिसून येते.