आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हुतात्मा'चा एसी बंद पडल्याने रेल्वेला 'घाम', प्रवाशांना पैसे परत; सोलापूर-पुणे प्रवासात सी १ डब्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसच्या सी १ डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बुधवारी सकाळी बंद पडली. त्यामुळे प्रवाशांबरोबरच सोलापूर रेल्वे प्रशासनालाही चांगलाच घाम फुटला. प्रवासाच्या सुरुवातीलाच यंत्रणा बंद पडल्याने प्रवाशांना तिकिटाची पूर्ण रक्कम परत देण्याची नामुष्की रेल्वेवर आली. 


प्रवाशांनी वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याची तक्रार केल्यानंतर दिल्लीतील रेल्वे बोर्डाने याची दखल घेतली. परिणामी, मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांनी याची गांभीर्याने दखल घेतली. सोलापूरच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. बुधवारी दिवसभर डीआरएम कार्यालयातील वातावरण चांगलेच गरम होते. 


मंगळवारी रात्री पुण्याहून सोलापूरला हुतात्मा एक्स्प्रेस दाखल झाल्यानंतर नेहमीप्रमाणे देखभाल दुरुस्तीसाठी हुतात्माचा रेक पीटलाइनला नेण्यात आला. देखभाल व दुरुस्तीवेळी गाडीतील सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित होत्या. गाडी फिट असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. गाडी फलाट एकवर घेत असताना अचानक इन्व्हर्टरमध्ये बिघाड झाला आणि सी १ डब्यातील पूर्ण यंत्रणा बंद झाली. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यंत्रणा सुरू करण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. साडेसहा वाजल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. तोपर्यंत प्रवाशांनाही डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याचे ध्यानी आले. काही प्रवाशांनी ट्विटरवर तक्रारी केल्या तर काहींनी कॅप्टनकडे तक्रार केली. कोणत्याही परिस्थिीतीत वातानुकूलित यंत्रणा सुरू होणार नसल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकिटाची पूर्ण रक्कम देण्याचे ठरवले. त्यानुसार प्रवाशांना इएफटी देण्यात आले. पुणे स्थानकावरील बुकींग ऑफिसमधून तिकीट रकमेचा परतावा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...