आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधांसाठी कर्मचाऱ्यावर दबाव टाकणारे एसीबीप्रमुख फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - अनैतिक संबंध ठेवण्यासाठी महिला पोलिस कर्मचाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) नागपूर विभागाचे अधीक्षक प्रद्युम्न पाटील हे मंगळवारी दुपारीच रजा टाकून गायब झाले. त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती नागपूरच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

 

गेल्या वर्षी जूनमध्ये पाटील यांनी नागपूर एसीबीचे अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारली. या कार्यालयाकडे सध्या सिंचन घोटाळ्यातील महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास आहे. या घोटाळ्याच्या तपासासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्थापन झालेल्या विशेष चौकशी समितीचे प्रमुख म्हणूनही पाटील यांच्याकडे जबाबदारी आहे. गुन्हा दाखल होताच पोलिस पथक प्रद्युम्न पाटील यांना अटक करण्यासाठी गेले. मात्र, ते पाेहोचण्यापूर्वीच पाटील घरातून फरार झाले होते. सध्या त्यांचा काहीच ठावठिकाणा नाही. पाटील यांचे कुटुंब पुण्यात राहते, तर ते एकटेच नागपुरातील निवासस्थानी राहायचे, असे सूत्रांनी सांगितले. २९ वर्षीय पीडित महिला कर्मचाऱ्याने पाटील यांच्याविरुद्धची पहिली तक्रार यंदा ऑक्टोबर महिन्यात एसीबीच्या विशेष समितीकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयानेच सर्व कार्यालयात अशी विशेष समिती नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. मुंबईतील उपअधीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांकडून याची चौकशी करण्यात आली. तक्रारीत तथ्य आढळून आल्याने एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांच्या मंजुरीनंतर नागपुरातील सदर पोलिस ठाण्यात पाटील यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 

महिला कर्मचाऱ्याला जाळ्यात ओढण्याचा होता प्रयत्न 
२९ वर्षीय पीडित एसीबी कार्यालयातच कार्यरत आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, गतवर्षी ऑगस्ट महिन्यापासूनच अनैतिक संबंध ठेवण्यासाठी पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. ते सातत्याने तिला फोन, अश्लील संदेश, व्हिडिओ कॉल करायचे. बरेचदा आपल्या बंगल्यावर बोलावण्याचेही प्रयत्न केले. मात्र, पीडितेने सातत्याने नकार दिला. कार्यालयीन वेळेतही ते सातत्याने कक्षात बोलवायचे. त्यामुळे कार्यालयात बरीच चर्चा होती. यासाठी कक्षाच्या दरवाजाच्या काचेवर काळी फिल्म लावून घेतली होती. दरम्यान, पीडितेने काही पोलिस अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातल्यावर पाटील यांनी त्या अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांना बदली करण्याच्या धमक्या दिल्या. ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे प्रकार चालत राहिले. मात्र, पाटील यांच्या वागण्यात सुधारणा होत नसल्याचे लक्षात येऊन कंटाळलेल्या महिला कर्मचाऱ्याने अखेर तक्रार करण्याचा निर्णय घेतला. 

बातम्या आणखी आहेत...