आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षादेश मान्यच, पण तिकीट का नाही ते कानात तरी सांगा : खडसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर - भाजपच्या तिसऱ्या यादीतही माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव नसल्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्टच झाले आहे. ‘तुम्हाला उमेदवारी द्यायची नाही, मात्र तुम्ही सांगाल त्याला देऊ, असे पक्षाने मला सांगितले आहे. पक्ष योग्य ताे निर्णय घेईलच. मात्र, मला उमेदवारी का नाही? हे पक्षाने सांगावे, कानात सांगितले तरी चालेल’, असे गुरुवारी कार्यकर्त्यांसमाेर बाेलताना खडसेंनी सांगितले. दरम्यान, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्जही घेतला आहे. मात्र, तिसऱ्या यादीत त्यांचेही नाव नव्हते.

गेल्या तीन दिवसांपासून मुक्ताईनगरमध्ये खडसे समर्थकांनी ठिय्या दिला आहे. ‘नाथाभाऊ, पक्षाकडून तुमच्यावर अन्याय हाेत आहे, आता तुम्ही अपक्ष लढा’ असे साकडे घातले जात आहे. त्यांच्या भावना खडसेंनी समजून घेतल्या. या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खडसे म्हणाले, ‘गेल्या ४० वर्षांपासून भाजपचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जो आदेश दिला तो मला मान्य, अमान्य, कटू असला तरी तो मानला. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे सांगितले असता ताेही दिला. यापुढेही पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. मुक्ताईनगरमधून मीच उमेदवार असावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांना मी शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पक्ष माझ्या बाबतीत योग्यच निर्णय घेईल, असेही मी त्यांना सांगितले आहे. गेल्या तीन दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते माझ्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांनी खडसे यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती व त्यांनी पक्षाने तिकीट दिले नाही तर अपक्ष लढावे, असाही आग्रह धरला. मात्र, खडसेंनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
 

खडसेंना उमेदवारी का नाही... म्हणत रावेरमध्ये दाेघांचा आत्मदहनाचा प्रयत्न 
गावागावात भाजपचा विस्तार करणाऱ्या खडसेंना उमेदवारी देताना डावलण्यात येत आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी, या मागणीसाठी रावेर येथील स्टेशन रोडवरील भाजपच्या कार्यालयासमोर नाना नथ्थू महाजन (४०) व अतुल सुभाष महाजन (३९) या दोन कार्यकर्त्यांनी गुरुवारी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, इतर कार्यकर्त्यांनी त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. या वेळी खडसे यांनीही नाना महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांची समजूत घातली. भाजपची बदनामी होईल. आपल्याला त्रास होईल, असे कोणतेही कृत्य समर्थकांनी व कार्यकर्त्यानी करू नये. त्यांनी शांत राहावे, असे आवाहन केले. दरम्यान, मुक्ताईनगर येथे सलग दुसऱ्या दिवशी खडसे समर्थकांनी रास्ता रोको आंदाेलन करत खडसेंवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला.
 

टाेकाचे पाऊल उचलू नकाेस !
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नानांशी खडसेंनी मोबाइलवरून संपर्क साधला. ‘तुम्ही संघाचे कार्यकर्ते, असा टाेकाचा निर्णय घ्यायचा नाही. तुम्ही हवे आहात,’ अशा समजुतीच्या सुरात त्यांनी समजूत काढली. इतरांनीही असे करू नये, असे खडसे म्हणाले.