आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव एसटी बस रिक्षाला धडकली; दोन्ही वाहने पडली 55 फूट विहिरीत, 23 ठार, 32 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टायर फुटल्याने रिक्षावर आदळली एसटी बस, 30 प्रवाशांना वाचवण्यात यश
  • विहिरीत पडलेली बस बाहेर काढण्यात अद्यापही अपयश

देवळा/ उमराणे - सौंदाणे-देवळा (जि. नाशिक) रस्त्यावरील मेशी फाट्यालगत धुळे-कळवण बस अतिवेगामुळे नियंत्रण सुटून अॅपेला धडकली. मंगळवारी दुपारी ४ वाजता झालेल्या या भीषण अपघातात अॅपेपाठोपाठ बसही रस्त्यालगत ५५ फूट खोल विहिरीत कोसळली. यात २३ जण ठार झाले. मृतांत मुंबईहून मुलगी पाहण्यासाठी आलेले एकाच कुटुंबातील ८ जण व अॅपेचालक अशा ९ जणांचा समावेश आहे. बसमधील चालक, इतर असे १४ जण दगावले. मृतांपैकी १९ जणांची ओळख पटली अाहे. ३२ जखमींवर उपचार सुरू आहेत. धुळे- कळवण बस मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान मेशी फाट्याजवळ आली. ती अॅपेरिक्षावर (एमएच १५ डीसी ४२३३) आदळली. धडकेनंतर अॅपेरिक्षा रस्त्यापासून ५० फूट अंतरावरील विहिरीत कोसळला. पाठोपाठ बसही उभी विहिरीत पडली. परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.

विहिरीजवळचा परिसर किंकाळ्यांनी हादरला
विहिरीपासून जवळच असलेल्या हॉटेलचे मालक गणेश दतू देवरे यांनी आवाज ऐकताच धाव घेतली. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही तत्काळ मदतकार्य चालू केले. किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला. माजी सभापती राजेंद्र देवरे, मित्रमंडळाचे कार्यकर्ते तसेच शेतकरी मदतीला धावून आले. 

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर काळाचा घाला
मुंबईत पोलिस दलात कार्यरत शकील मन्सुरी यांची पत्नी, सासू-सासरे, साडू-साली, मुलगा, पत्नीचे मामा, काका व चालक असे ९ जण अॅपेने देवळाहून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम अाटोपून येसगावकडे जात होते. मात्र, रिक्षाचालकासह एकाच कुटुंबातील ८ जणांपैकी कुणीच वाचले नाही.

मदतकार्य करणाऱ्यांनी बसची मागील काच फोडून दोरखंड लावत महिला वाहकासह १८ जखमी प्रवाशांना बाहेर काढले. मोठ्या क्रेनने बस विहिरीबाहेर काढल्यानंतरचे विहिरीतील दृश्य अत्यंत भीषण होते. दबलेल्या अॅपेमध्ये एक मृतदेह होता, तर उर्वरित मृतदेह पाण्यातून काढण्यात आले. रात्री ८ वाजता अॅपे विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

स्पीड गव्हर्नरचे काय? : महामंडळाच्या प्रत्येक बसला स्पीड गव्हर्नर असतो, त्यामुळे वेग नियंत्रित राहतो. परंतु, यंत्रणा असतानाही मग अतिवेगाने अपघात कसे घडतात? हा स्पीड गव्हर्नर चालक का तोडतात? आदी प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...