Accident / भीषण अपघात : कंटेनर-बोलेराेच्या अपघातात चौघे ठार; मृतांत चालक, दोन महिलांचा समावेश

 नागपूर-औरंगाबाद महामार्गावर कंटेनर ठरला काळ

दिव्य मराठी

Jun 24,2019 09:01:00 AM IST

मेहकर - नागपूर येथून मुलीची भेट घेऊन औरंगाबादकडे येणाऱ्या क्षीरसागर कुटुंबाच्या जीपला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह चौघे ठार झाले. यात दोन महिलांचा समावेश आहे. शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास नागपूर-औरंगाबाद महामार्गावर अंजनी बुद्रुक फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला.


मूळ कन्नड येथील मनोहर क्षीरसागर औरंगाबादला स्थायिक आहेत. तीन दिवसांपूर्वी ते कुटुंबासह बोलेरो गाडीने विवाहित लहान मुलीला भेटण्यासाठी नागपूरला गेले होते. शनिवारी दुपारी ते परत निघाले. रात्री एकच्या सुमारास अंजनी बुद्रुक फाट्यावर समोरून येणाऱ्या कंटेनरने जीपला धडक दिली. पोलिस निरीक्षक राजू खर्डे यांनी अपघातानंतर नातेवाइकांशी संपर्क साधला. यानंतर क्षीरसागर यांचे साडू शशांक बीडकर व अन्य नातेवाइकांनी मेहकरच्या दिशेने धाव घेतली.

चौघांचा जागीच मृत्यू, मृतदेह क्रेनने काढले
मनोहर हरिभाऊ क्षीरसागर (७०), मुलगी मेघा क्षीरसागर (३५), पत्नी नलिनी मनोहर क्षीरसागर (६६) व चालक गजानन सुखदेव नागरे (२५) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चौघांचेही मृतदेह क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.


बोलेरो ५० फूट फरपटत गेली
कंटेनरचा वेग इतका प्रचंड होता की धडक बसल्यानंतर बोलेरो गाडी कंटेनरने पन्नास फूट फरपटत नेली. त्यामुळे कुणीही वाचू शकले नाही.

खडकेश्वर भागातील रहिवासी
शहरातील खडकेश्वर भागातील मनोहर क्षीरसागर यांना मेघा व मनाली अशा दोन मुली आहेत. त्यापैकी मनालीचा विवाह झाला असून ती नागपूरला आहे. ती एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहे, तर मेघा अ‍ॅमवे कंपनीच्या प्रॉडक्ट्सची विक्री करत होती.

क्षीरसागर हनुमान मंदिराचे पुजारी
क्षीरसागर समर्थनगर भागातील पुष्पनगरीतील हनुमान मंदिराचे पूर्वी पुजारी होते. मुलगी मेघा अ‍ॅमवे प्रॉडक्ट्सची विक्री करून उदरनिर्वाह चालवत होती. क्षीरसागर यांचे धाकटे बंधू वीज वितरण कंपनीत आहेत.

मुलगी पाहायला गेले... : क्षीरसागर कुटुंबाने गजानन नागरे याला मुलगा मानले आहे. तो मूळ कन्नड तालुक्यातील वासडी येथील रहिवासी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो क्षीरसागर कुटुंबासोबत राहतो. त्याच्यासाठी मुलगी पाहण्यास क्षीरसागर कुटुंबीय शनिवारी सकाळी वाशीमलाही गेले होते.

X