आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या धडकेने टेम्पोखाली येऊन तरुणी मृत्युमुखी, \'झायलो\' चालक गुपचूप तर टेम्पोचालक बेदरकारपणे पळाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाविद्यालयात जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीच्या दुचाकीला भरधाव झायलोने मागून धडक दिली. जोरात धडक बसताच विद्यार्थिनी रस्त्यावर पडली. त्याच वेळी समोरून वेगात आलेल्या विटांच्या टेम्पोने तिला चिरडले. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उस्मानपुरा भाजीवाली बाई चौकात हा भीषण अपघात झाला. वैभवी सुनील खिरड (वय १६) असे मृत तरुणीचे नाव असून ती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. 

 

बुधवारी सकाळी ते साडेआठच्या सुमारास तिच्या मोपेडवर (एमएच २० बीआर ०१९१) महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. शहानूरमियाँ दर्गा चौकाकडून ती पीर बाजारच्या दिशेने निघाली. पीर बाजारच्या अलीकडील चौकात भाजीवाली बाई पुतळा चौकासमोर अाल्यानंतर वैभवीच्या दुचाकीला पांढऱ्या रंगाच्या झायलो एसयूव्ही वाहनाने मागून जोरात धडक दिली. धडक बसताच वैभवीचा तोल गेला व ती रस्त्यावर कोसळली. त्याच वेळी तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून भाजीवाली बाई चौकाकडे भरधाव येणाऱ्या विटांचा टेम्पो वैभवीला चिरडून गेला. या भीषण अपघातात तिचा जागेवरच मृत्यू झाला. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. वैभवी रस्त्यावर पडून होती. काही वेळाने परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली तसेच उस्मानपुरा पोलिसांत वर्दी दिली. त्याचप्रमाणे तिच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात आले. तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. 


उस्मानपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून दोन्ही वाहनचालकांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा सर्व प्रकार समोरच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. परंतु त्यात वाहन क्रमांक अस्पष्ट दिसत असून 'स्मार्ट सिटी'च्या मदतीने दोन्ही वाहनांचा शोध पोलिस रात्री उशिरापर्यंत घेत होते. 


डाव्या कानाला मार, मेंदूला जखम 
आधी एका वाहनाची धडक बसल्यावर काही कळायच्या आतच खाली कोसळलेल्या वैभवीच्या अंगावरून विटांनी भरलेला टेम्पो गेला. चाक डोक्यावरून गेल्याने डाव्या बाजूला कानाजवळ गंभीर दुखापत होऊन मेंदूला गंभीर जखमा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वैभवीच्या दुचाकीचा आरशाजवळील थोडा भाग मोडला गेला. दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच तंत्रनिकेतन महाविद्यालयात शाेककळा पसरली हाेती. 

 

तीन कुटुंबांमध्ये एकमेव मुलगी 
खिरड बंधूंच्या तीन कुटुंबांमध्ये वैभवीचे वडील सुनील वगळता सर्वांना मुले आहेत. तिन्ही कुटुंबांमध्ये वैभवी एकटी मुलगी असल्याने सर्वांचीच लाडकी होती. अभ्यासात हुशार व मनमिळाऊ वैभवीच्या मृत्यूने ती राहत असलेल्या परिसरात सर्वच सुन्न झाले होते.

 

अभियंता होण्याचे स्वप्न भंगले... 
वैभवीला दहावीत तिला ८७ टक्के गुण मिळाले होते. अभियंता होण्याचे स्वप्न असलेल्या वैभवीची शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल शाखेसाठी निवड झाली होती. वैभवीच्या अपघाताची घटना कळल्यावर संपूर्ण महाविद्यालयावर शोककळा पसरली होती.

 

झायलो चालक क्षणभर थांबला 
अपघातानंतर एसयूव्ही चालक थोडा वेळ थांबला व कोणी बघितले नाही हे लक्षात येताच पोबारा केला. तर टेम्पो बेदरकारपणे वेगात पसार झाला. सकाळची साडेआठ वाजेची वेळ असल्याने गर्द नव्हती, त्यामुळे वाहनचालक पळून गेले, असे एका स्थानिक विक्रेत्याने सांगितले. 

 

वर्षभरात १६ अपघात 
भाजीवाली बाई चौकात या वर्षभरात एकूण १६ गंभीर अपघातांचे कॉल आमच्यापर्यंत आल्याचे व्ही ग्रुपचे राजेश चंचलाणी यांनी सांगितले. या ठिकाणी किमान तीन दिवसांनी एका अपघात असे प्रमाण आहे, असे ते म्हणाले. चंचलाणी व सदस्यांनी शहरातील वाहतुकीचा अभ्यास केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...