आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता अाेलांडताना नीलगाय वाहनावर धडकल्याने अपघात; जळगावचा तरुण ठार, दाेन जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पाणवठ्याच्या शाेधासाठी रस्ता अाेलांडण्यासाठी नीलगायीने झेप घेताच लक्ष विचलित झाल्याने दाेन चारचाकी समाेरासमाेर धडकल्या. त्यात जळगावच्या एका युवकाचा मृत्यू झाला. तर दाेन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. दरम्यान, या अपघातात नीलगायीचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता कुसुंब्याजवळ घडली. 

 

गणेश सुभाष साेनार (वय ३५, रा. जाेशीपेठ, जळगाव) असे या अपघातातील मृत तरुणाचे नाव अाहे. तर जितेंद्र सुरेश सपकाळे (वय ३८, रा. अजिंठा हाैसिंग साेसायटी) व चालक दीपक उत्तम साेनार (वय ३०, रा. हरिविठ्ठलनगर असे गंभीर जखमी झालेल्या दाेन जखमी तरुणांची नावे अाहेत. कुसुंब्याकडे जाण्यासाठी गणेश साेनारने दुचाकी अजिंठा चाैफुलीजवळ उभी केली हाेती. तेथून हे तिघे मित्र प्रवासी वाहतुकीच्या वाहनाने (क्रमांक एम.एच. ४६ झेड २४७०) प्रवासाला निघाले. दीपक हा व्हॅन चालवत हाेता. सायंकाळी ६.३० वाजता बाफना गाेशाळेजवळ एका नीलगायीने रस्ता अाेलांडण्यासाठी झेप घेतली. त्यामुळे लक्ष विचलित झाल्याने त्यांचे वाहन नीलगायीवर धडकलेे. याच वेळी कुसुंब्याकडून येणाऱ्या चारचाकीवर (क्रमांक एम.एच.०२ सी.एच. ३०४) त्यांचे वाहन अादळले. नीलगायीला धडक दिल्यानंतर व्हॅन तीन वेळा कलंडली. त्यात व्हॅनच्या डाव्या बाजूला बसलेले गणेश साेनार यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर जितेंद्र सपकाळे व दीपक साेनार हे गंभीर जखमी झाले. मृत गणेश व दाेघा जखमींना रिक्षेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताबाबत कळताच जोशीपेठेतील नागरिक व गणेशच्या मित्रांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. त्यांचा भाऊ योगेशने माझा आत्माच गेला, अशा शब्दात अाक्राेश केला. 

 

पाेलिस धावले मदतीला 
अपघातामुळे जळगाव-औरंगाबाद महामार्गावर वाहतुकीचा तासभर खोळंबा झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. मृत गणेश साेनार हा सराफ बाजारातील एकविरा ज्वेलर्समध्ये कामाला हाेता. त्याने एमआयडीसीतील हॉटेलही चालवायला घेतली होती, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व भाऊ असा परिवार आहे. 

 

नीलगायींपासून रहा दक्ष 
कुसुंबा परिसरात नीलगायींचे कळप अाहेत. वनविभागाने जंगलात पाणवठे केले अाहे. मात्र, जर पाणी मिळाले नाही तर पाणी व चाऱ्याच्या शाेधासाठी नीलगायी रात्री भटकंतीला निघतात. रस्ता अाेलांडताना त्या झेप घेतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. जंगलातून त्या रस्त्याच्या दिशेने येऊ नयेत यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू अाहेत, अशी माहिती वनरपरिक्षेत्र अधिकारी एन. जे. पाटील यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...