आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालिका दर्शनासाठी जाताना सात मुलांना कारने उडवले; एक ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरानगर - पहाटे साडेतीनच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या सात लहान मुलांना भरधाव जाणाऱ्या कारने चिरडल्याने झालेल्या अपघातात अकरा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेली दोन मुले गंभीर जखमी झाली अाहेत. रविवारी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते साईनाथ चौफुली या रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित कार चालकाच्या विरोधात 'हिट अँड रन' चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत अाहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा गावातील सात मुले कालिका मातेच्या दर्शनासाठी पायी निघाले असताना लाल रंगाच्या कारने भरधाव वेगात मुलांच्या अंगावर गाडी घातली. यात विशाल नामदेव पवार (रा. कोळीवाडा, माळी गल्ली, वडाळा गाव) हा मुलगा कारच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असलेले साहिल खंडू कडाळे, रोहन बापू मोरे, कृष्णा दत्तू खाेडे, राहुल बापू मोरे, ऋषिकेश सुनील वाघ, अश्विन दत्तू खाेडे (रा. कोळीवाडा, माळी गल्ली, वडाळा गाव) जखमी झाले. सर्व जखमी ११ ते १३ वर्ष वयाेगटातील अाहेत. हा अपघात पाहून लाेकांनी अारडाअाेरडा केला. त्यावेळी रस्त्याने जाणारे रोहित खडाम यांनी तत्काळ नागरिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. विशाल पवार यास डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले. दोन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. एका मुलास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

कुटुंबियांचा अाक्राेश 
भरधाव कार चालवून मुलांना चिरडणाऱ्या चालकास पाेलिस अटक करीत नाहीत, ताेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतल्याने पहाटे जिल्हा रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सरकारवाडा आणि इंदिरानगर पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढत कारचालकावर कठोर कारवाईचे अाश्वासन दिल्यावर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

 

सीसीटीव्हीचा अभाव 
इंदिरानगर परिसरात लोकप्रतिनिधींनी प्रभागातील चौकाचौकात सीसीटीव्ही लावले आहेत. मात्र, सीसीटीव्हीची गरज असलेल्या ठिकाणांकडे दुर्लक्ष होत अाहे. अशा गंभीर घटना टाळण्यासाठी किंबहुना घडलेल्या प्रकाराचातपास गतीने होण्यासाठी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

 

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने अाईचा हंबरडा, परिसरात हळहळ 
अपघाताचे वृत्त समजताच विशालच्या अाई अाणि वडिलांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तेथे विशालचा मृतदेह बघताच अाई-वडिलांनी हंबरडाच फाेडला. एकुलत्या एक मुलाचे अपघाती निधन झाल्याने अाईच्या ताेंडून शब्दही फुटत नव्हता. त्याची माेठी बहीणही त्याला जवळ घेऊन उठविण्याचा प्रयत्न करत हाेती. यावेळी विशालच्या मित्रांच्या कुटुंबियांनाही अश्रू अनावर झाले हाेते. वडाळा गावातील केबीएच विद्यालयात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विशालच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात अाहे. त्याचे वडिल सेंट्रींगचे तर अाई घरकाम करून त्याचे शिक्षण पूर्ण करीत हाेते. परिस्थितीशी अशा प्रकारे संघर्ष करत उदरनिर्वाह करणाऱ्या पवार कुटुंबीयांवर संकट काेसळले असून संबंधित कारचालकाला अटक करून कठाेर शासन करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. 

 

साईनाथ चौफुली बनतेय मृत्यूचा सापळा 
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक आणि साईनाथ चौफुली या दोन ठिकाणांवर नेहमीच अपघात हाेत असूनही पाेलिस व महापालिकेकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याने परिसरातील रहिवाश्यांकडून संताप व्यक्त केला जात अाहे. पाेलिसांनी या चाैकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली असली तरी वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने वाहतूक कोंडी व अपघाताच्या घटना घडताना दिसत अाहेत. या ठिकाणी वाहतूक पाेलिसांनी नियमित कारवाई केल्यास वाहनधारकांना शिस्त लागू शकते. मात्र, पाेलिस फक्त हेल्मेटच्या नावे काेपऱ्यात कारवाई करताना दिसतात. चौफुलीवर सिग्नलपासून काही अंतरावर वाहनांचा वेग कमी होण्यासाठी गतिरोधक टाकण्यात आले होते. मात्र, ते भुईसपाट झाले आहेत. प्रशासनाने वेळीच गतिराेधक टाकल्यास काही प्रमाणात का हाेईना अपघात राेखण्यास मदत हाेऊ शकते. 

 

अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक 
साईनाथ चौफुली सिग्नलवरून वडाळा, इंदिरानगरमार्गे पाथर्डी, लेखानगरकडे अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक सुरू असते. अवजड वाहनांना सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ६ ते १० या वेळत प्रवेश बंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या वेळात ही वाहतूक सुरूच राहत असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या वाहनांकडेही पाेलिसांकडून दुर्लक्ष हाेत असल्याचा अाराेप हाेत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...